सीमाभागातील 865 गावांना आता 20 आजारांवरील उपचारासाठी आर्थिक मदत

महाराष्ट्र मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांची पत्रकार परिषदेत माहिती बेळगाव : मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीमधून पूर्वी केवळ 6 आजारांना आर्थिक मदत केली जात होती. मात्र आता 20 आजारांसाठी साहाय्यता निधीमधून आर्थिक मदत केली जाणार आहे. सीमाभागातील 865 गावांना ही योजना लागू असून गेल्या सात महिन्यांत अनेकांना आर्थिक मदत केली आहे. यापुढेही येथील […]

सीमाभागातील 865 गावांना आता 20 आजारांवरील उपचारासाठी आर्थिक मदत

महाराष्ट्र मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीमधून पूर्वी केवळ 6 आजारांना आर्थिक मदत केली जात होती. मात्र आता 20 आजारांसाठी साहाय्यता निधीमधून आर्थिक मदत केली जाणार आहे. सीमाभागातील 865 गावांना ही योजना लागू असून गेल्या सात महिन्यांत अनेकांना आर्थिक मदत केली आहे. यापुढेही येथील मराठी जनतेला आर्थिक मदत केली जाणार असून यासाठी मराठी जनतेने योग्य पाठपुरावा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष प्रमुख व मुख्यमंत्री विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
रेल्वेओव्हरब्रिज येथील मराठा मंदिरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हे आवाहन केले आहे. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच सीमावासियांच्या पाठीशी उभे आहेत. सीमाप्रश्नाच्या लढ्यामध्ये त्यांनी भाग घेऊन आंदोलन केले. दोन महिने कारागृहातही शिक्षा भोगली. येथील मराठी भाषिकांची परिस्थिती पाहूनच त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीअंतर्गत रुग्णांना आर्थिक मदत केली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रासह सीमाभागामध्ये 285 कोटींची वैद्यकीय मदत केली आहे. 36 हजार रुग्णांचे प्राण वाचविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे जमा करून टोल फ्री क्रमांक व व्हॉट्सअॅप हेल्पलाईनच्या माध्यमातून पाठवून द्यावीत, असे त्यांनी सांगितले. यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांक 8650567567 उपलब्ध करण्यात आला आहे.
लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत ही योजना लागू आहे. कोणताही उपचार घेण्यासाठी दवाखान्यात दाखल झाल्यानंतर तातडीने अर्ज करणे बंधनकारक आहे. यासाठी उत्पन्नाचा दाखला व मध्यवर्ती म. ए. समितीकडून पत्र देणे महत्त्वाचे आहे. बेळगावमध्ये केएलईचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल, अरिहंत हॉस्पिटलमध्ये ही सोय उपलब्ध आहे. आणखी काही हॉस्पिटलशी चर्चा सुरू असून लवकरच त्याठिकाणी उपचार केले जाणार आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीबरोबरच सिद्धविनायक ट्रस्ट या नावानेही अर्ज भरल्यास त्या ट्रस्टच्या माध्यमातूनही आर्थिक मदत करण्यात येते, अशी माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेत मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, शहर म. ए. समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, रमाकांत केंडुस्कर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, कोल्हापूरचे प्रशांत साळुंखे, लक्ष्मीकांत पाटील (निपाणी), महादेव पाटील, आनंद आपटेकर, प्रशांत भातकांडे, सागर पाटील आदी उपस्थित होते.
अर्थसाहाय्य करण्यात येणाऱ्या 20 आजारांची यादी…
कॉकलियर इम्प्लांट (वय वर्षे 2 ते 6), हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, बोन मॅरो प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, कर्करोग (केमोथेरेपी/रेडिएशन), नवजात शिशूंचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, भाजून जखमी रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण, खुबा प्रत्यारोपण.