अखेर ‘ते’ प्रकरण सीआयडीकडे सुपूर्द
आज उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी : तपास अधिकारी बेंगळूरला रवाना
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील ‘त्या’ गावातील निंद्य प्रकाराला आठ दिवस पूर्ण झाले आहेत. सरकारने हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे सोपविले असून सीआयडीचे अधिकारी बेळगावात दाखल झाले आहेत. सोमवार दि. 18 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार असून या प्रकरणी आतापर्यंत झालेल्या तपासासंबंधी सरकार न्यायालयाला अहवाल देणार आहे. गेल्या रविवार दि. 10 डिसेंबर रोजी प्रेम प्रकरणातून एक तरुण व तरुणीने पलायन केल्यानंतर तरुणाच्या आईवर हल्ला करून बेदम मारहाण करण्यात आली होती. मानवी समाजाने शरमेने मान खाली घालावी, अशा पद्धतीची वागणूक तिला देण्यात आली. राज्य उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्वत:हून याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणी आतापर्यंत अकरा जणांना अटक झाली आहे. राज्य सरकारने पीडित महिलेला पाच लाख रुपये व 2 एकर 3 गुंठे जमीन देण्याचे जाहीर केले आहे. महिला आयोग व मानवी हक्क आयोगाच्या पदाधिकाऱ्यांनीही पीडित महिलेची भेट घेऊन या घटनेसंबंधी माहिती घेतली असून भाजपच्या पाच महिला खासदारांचा समावेश असलेल्या सत्यशोधन समितीनेही घटनास्थळी व पीडित महिला उपचार घेत असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन माहिती घेतली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा यांना संपूर्ण घटनेसंबंधी अहवाल देण्यात येणार आहे. एक-दोन दिवसांत मानव हक्क आयोगाचे आणखी एक पथक बेळगावला येणार असून पोलीस आयुक्तांनी काकतीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणी संपूर्ण राज्यभरात भाजपने आंदोलन छेडले आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीवेळी पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा, तपास अधिकारी व बेळगाव ग्रामीणचे एसीपी एस. व्ही. गिरीश यांना स्वत: हजर रहाण्याची सूचना उच्च न्यायालयाने केली असून आतापर्यंत झालेल्या तपासासंबंधीची माहिती घेऊन हे अधिकारी बेंगळूरला रवाना झाले आहेत. या कामकाजानंतर सीआयडी अधिकाऱ्यांना तपास अधिकारी प्रकरणाची कागदपत्रे सोपविणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
सीआयडीचे पथक डेरेदाखल : आज राष्ट्रीय मानव हक्क आयोग येणार
‘त्या’ निंद्य घटनेची चौकशी करण्यासाठी सीआयडीचे अधिकारी रविवारी सायंकाळी बेळगावात दाखल झाले आहेत. सोमवारी महिला अधिकाऱ्यांसह आणखी काही वरिष्ठ विमानाने बेळगावला येणार असून सोमवारपासूनच सीआयडी चौकशीला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. गेल्या रविवार दि. 10 डिसेंबर रोजी बेळगाव तालुक्यातील एका गावात घडलेल्या या अमानवीय घटनेची चौकशी सीआयडीकडे सोपविण्याचा निर्णय सरकारने रविवारी घेतला आहे. यापाठोपाठ सीआयडीचे पोलीस प्रमुख कार्तिक हे सायंकाळी बेळगावात दाखल झाले असून त्यांनी या घटनेसंबंधी माहिती मिळविण्याचे काम हाती घेतले आहे. सोमवारी विमानाने सीआयडीचे आणखी चार ते पाच अधिकारी बेळगावात येणार आहेत. यामध्ये दोन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे सोमवारपासूनच सीआयडीचे अधिकारी कामाला लागणार आहेत. आतापर्यंत या प्रकरणी अकरा जणांना अटक झाली आहे. आणखी दोघा जणांचा शोध घेण्यात येत आहे. हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा हे याच प्रकरणाच्या सुनावणीसाठी बेंगळूरला गेले आहेत. दरम्यान, मानवी हक्क आयोगाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक रविवारी बेळगावात दाखल झाले असून सरकारी विश्रामधाम येथे या पथकातील अधिकाऱ्यांनी तळ ठोकला आहे. दिवसभर त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली असून तपास अधिकाऱ्यांना पाचारण करून त्यांच्याकडून घटना जाणून घेतली आहे. सोमवारी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे डीआयजी सुनीलकुमार मीणा हे बेळगावला येणार आहेत. आयोगातील अधिकाऱ्यांनीही स्वतंत्रपणे चौकशी सुरू केली आहे. केंद्रीय गृहखात्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून केंद्रीय यंत्रणाही तपासात उतरल्या आहेत.
Home महत्वाची बातमी अखेर ‘ते’ प्रकरण सीआयडीकडे सुपूर्द
अखेर ‘ते’ प्रकरण सीआयडीकडे सुपूर्द
आज उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी : तपास अधिकारी बेंगळूरला रवाना बेळगाव : बेळगाव तालुक्यातील ‘त्या’ गावातील निंद्य प्रकाराला आठ दिवस पूर्ण झाले आहेत. सरकारने हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे सोपविले असून सीआयडीचे अधिकारी बेळगावात दाखल झाले आहेत. सोमवार दि. 18 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार असून या प्रकरणी आतापर्यंत झालेल्या तपासासंबंधी सरकार न्यायालयाला अहवाल […]