एफआयएचा हार्दिक सिंगला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार,

सविता बनली सलग तिसऱ्यांदा सर्वोत्तम महिला गोलरक्षकाची मानकरी वृत्तसंस्था/ लॉसेन, स्वित्झर्लंड भारतीय पुरुष हॉकी संघातील मिडफिल्डर हार्दिक सिंग व महिला संघाची कर्णधार सविता पुनिया यांनी एफआयएच वर्षातील सर्वोत्तम खेळाडू व वर्षातील सर्वोत्तम महिला गोलरक्षक पुरस्कार जिंकला आहे. तज्ञांचे पॅनेल, राष्ट्रीय संघटना (राष्ट्रीय संघांचे कर्णधार, प्रशिक्षक, चाहते व मीडिया) यांच्या मतदानानंतर ही निवड मंगळवारी जाहीर करण्यात […]

एफआयएचा हार्दिक सिंगला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार,

सविता बनली सलग तिसऱ्यांदा सर्वोत्तम महिला गोलरक्षकाची मानकरी
वृत्तसंस्था/ लॉसेन, स्वित्झर्लंड
भारतीय पुरुष हॉकी संघातील मिडफिल्डर हार्दिक सिंग व महिला संघाची कर्णधार सविता पुनिया यांनी एफआयएच वर्षातील सर्वोत्तम खेळाडू व वर्षातील सर्वोत्तम महिला गोलरक्षक पुरस्कार जिंकला आहे.
तज्ञांचे पॅनेल, राष्ट्रीय संघटना (राष्ट्रीय संघांचे कर्णधार, प्रशिक्षक, चाहते व मीडिया) यांच्या मतदानानंतर ही निवड मंगळवारी जाहीर करण्यात आली. हार्दिकने आजवर 114 सामने भारतातर्फे खेळले असून तो भारतीय हॉकीमधील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. 2020 ऑलिम्पिकमध्ये भारताने मिळविलेल्या कांस्यपदकात त्याची कामगिरी महत्त्वाची ठरली होती. तेव्हापासून तो संघाचा नियमित खेळाडू बनला आहे. या वर्षात त्याला मिळालेले हे दुसरे सर्वात मोठा पुरस्कार आहे. 2022 मधील सर्वोत्तम खेळाडूचा हॉकी इंडियाचा बलबिर सिंग सिनियर पुरस्कारही याआधी त्याला मिळाला आहे. मिडफिल्डमध्ये तो अतिशय चमकदार प्रदर्शन करीत असून संघाचा तो एक प्रमुख खेळाडू बनला आहे. आपल्याला या पुरस्कारासाठी ज्यांनी मतदान केले, त्या सर्वांचा तसेच इथपर्यंतचा टप्पा गाठण्यास साह्या केल्याबद्दल हॉकी इंडियाचा देखील मी मनापासून आभारी आहे, अशी कृतज्ञ भावना हार्दिकने व्यक्त केली.
सविताने मात्र सलग तिसऱ्यांदा वर्षातील सर्वोत्तम महिला गोलरक्षकाचा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी 2021, 2022 मध्येही तिला हा पुरस्कार मिळाला होता. या वर्षभरात ती जबरदस्त फॉर्ममध्ये असून ऑस्ट्रेलियातील कसोटीपासून ते आशियाई क्रीडा स्पर्धेपर्यंत तिने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये भारतात झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 33 वर्षीय सविताने भारताला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. पुढील महिन्यात रांची येथे एफआयएच हॉकी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा होणार असून पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवित आपल्या संघाला ऑलिम्पिक पात्रता मिळवून देण्यासाठी ती आता प्रयत्नशील आहे. ‘सर्व सहकारी व साहायक स्टाफ यांच्या सहकार्यामुळे मी खेळाडू म्हणून मोठी होऊ शकले, त्या सर्वांची मी मनापासून आभारी आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली असून देशाला आणखी यश मिळवून देण्यासाठी आणखी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देत राहील. या निवडीसाठी मला ज्यांनी मतदान केले, त्यांचेही मी मनापासून आभार मानते,’ अशा भावना सविताने व्यक्त केल्या.
नेदरलँड्सच्या झान डी वार्डची वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडूच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. नेदरलँड्सचा गोलरक्षक पर्मिन ब्लाकने पुरुष विभागातील सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार जिंकला. सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार स्पेनची तेरेसा लिमा व फ्रान्सचा गॅस्पर्ड झेवियर यांना मिळाला. चीनची महिला प्रशिक्षक अॅलीसन अॅनन व जर्मनीच्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक आंद्रे हेनिंग यांना वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षकांचा तर आयाना मॅक्लीन (त्रिनिदाद-टोबॅगो) व बेन गाँटेन (जर्मनी) यांना वर्षातील सर्वोत्तम पंचांचा पुरस्कार मिळाला.

Go to Source