भय इथले संपत नाही!
हुबळीत घडलेली दुसरी घटना तेथील सामाजिक वातावरणावर प्रश्नचिन्ह उठवणारी
बेळगाव : रूपकुंवर, मथुरा, अमृता, निर्भया आता नेहा आणि अंजली… हत्या सुरूच आहेत. एकीकडे स्त्राr सबलीकरणाचे, सक्षमीकरणाचे ढोल पिटले जात आहेत. त्यांच्यासाठी भरघोस सवलती दिल्या जात आहेत. महिला आता कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, म्हणून एकीकडे कौतुकाची तोरणे बांधली जात आहेत आणि दुसरीकडे तिला पायदळी तुडविले जात आहे. मात्र, पूर्वी घडलेल्या घटना आणि अलीकडच्या काळातील घटना यामध्ये बरीच तफावत आहे. मुलांनी छेड काढणे, बसमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी मुलींना धक्के मारणे, नको तेथे स्पर्श करणे हे प्रकार नेहमीच निषेधार्ह आहेत. मुली किंवा महिलांबाबत कोणताही अत्याचाराचा प्रकार घडला की त्यांच्या पोशाखापासूनच टीकेचे सूर लागू लागतात. वास्तविक, अत्याचार आणि पोशाख यांचा दुरान्वयेही संबंध नाही, हे महिला चळवळ सातत्याने सांगत आली आहे.
स्त्रिया या नेहमीच सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यामुळे बहुसंख्य कायदे मुली किंवा महिलांच्या बाजूने करण्यात आले. घरगुती हिंसाचाराचा कायदा करण्यात आला. कार्यालयीन छळ प्रतिबंध करणारी विशाखा मार्गदर्शक प्रणाली अस्तित्वात आली. भारंभार सोयीसुविधा मिळाल्या किंवा अचानक अनेक गोष्टी कोणत्याही श्रमाशिवाय मिळाल्या की त्याचे मोल रहात नाही की काय? अशीच परिस्थिती आज झाली आहे. तंत्रज्ञानाचा विकास हा माणसाचे जगणे भकास तरी करणार नाही ना? अशी चिंता भेडसावू लागली आहे. मोबाईलने माणसाचे जीवन सुकर करण्याऐवजी दुष्कर केले आहे. या माध्यमाचा सदुपयोग होण्यापेक्षा त्याचा दुरुपयोगच होतो आहे. एआयने तर कहरच केला आहे. हे माध्यम मुलांच्या हाती कधी द्यावे? याला काही धरबंध राहिला नाही. बाळाच्या हातात मोबाईल दिला की ते जेवू लागते, असे सांगणाऱ्या मातांची कीव करावी की काळजी? हा प्रश्न आहे. परिपक्वता येण्यापूर्वीच हे माध्यम त्यांच्या हातात आल्याने काय पहावे? काय नाही? याच्यावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही. दुसरीकडे मुला-मुलींच्या मैत्रीचे निकषच बदलले. आता तरी गर्लफ्रेंड आणि बेस्टफ्रेंड अशी व्याख्या नव्याने तयार झाली आहे. बेस्टफ्रेंड कोणीही असू शकते, पण गर्लफ्रेंड एकटीच असू शकते. आपल्याला मित्र किंवा मैत्रीण नसणे म्हणजे आपल्यात काहीतरी कमतरता असणे किंवा आपण नाकारले जाणे, अशी भावना वाढीस लागली आहे का?
एकतर्फी प्रेमाच्या तर तऱ्हाच वेगळ्या झाल्या आहेत. एखादी तरुणी आवडते याचा अर्थ तिच्यावर आपला हक्क आहे, असे समजणाऱ्या मुलांच्या मानसिकतेचा समाजाने त्याहीपेक्षा अधिक त्यांच्या पालकांनी विचार करायला हवा. यासाठी घरातील वातावरणही निकोप आणि मुक्त असायला हवे. मुलाचे पाऊल चुकते आहे, हे लक्षात येताच वेळीच त्याला साम, दाम, दंड पद्धतीने आवरही घालायला हवा. हुबळीत घडलेली ही दुसरी घटना तेथील सामाजिक वातावरणावर प्रश्नचिन्ह उठवणारी आहे. एखादा तरुण घरी जाऊन सर्वांसमक्ष एखाद्या तरुणीला भोसकतो, हे निंदनीय तर आहेच पण अत्यंत निषेधार्ह आहे. भावनेच्या भरात तरुणाई पुढचा विचार करत नाही. मात्र, शांतपणे संभाव्य घटनांची, परिस्थितीची, पुढील धोक्याची कल्पना दिल्यास एक पाऊल मागे घेण्यात तरुणाई नक्कीच सहकार्य करते. नेहा हिरेमठची हत्या करणाऱ्या फय्याजच्या आईवडिलांनी आपल्या मुलाचे अत्यंत क्रौर्य असे कृत्य लपवून न ठेवता, त्याचे समर्थन न करता आपल्या मुलाला शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा केली आहे. ही त्यांची भूमिका विस्मरणात जाता कामा नये. प्रेम प्रकरणातून हत्या होणे, ही निंदनीय आणि क्रौर्याची परिसीमा आहे. फय्याजला माफी नाहीच. परंतु, आता गिरीश सावंत यालाही माफी नाही. आता जर अशा घटना वारंवार घडायला लागल्या तर समाज कधीही कायदा हातात घेण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आरोपींना फाशी द्या, अशी मागणी सुरू झालीच आहे. दोन जीवांचा हकनाक बळी गेला. आता महिला आंदोलन करतील, समाज निषेध मोर्चे काढेल, राजकीय नेते पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सहानुभूती दर्शवतील. पण पुढे काय?
नि:पक्षपणे चौकशी करणे आवश्यक
तपास यंत्रणांनी म्हणूनच नि:पक्षपणे चौकशी करणे आवश्यक आहे. हे सर्व आपल्या व्यवस्थेमधील दोष आहेत. त्याचा खूप बारकाईने आणि गांभीर्याने विचार करण्यासाठी सामाजिक आणि महिला संघटनांनी पुढे यायला हवे. निषेधाचे पत्रक, मोर्चे हे आपल्या विरोधाचे प्रतीक नक्कीच आहेत. परंतु, कालांतराने पुन्हा अशा घटना विस्मरणात जातात. पुन्हा असेच एखादे प्रकरण घडते. मागच्या प्रकरणाचा विसर होतो. मात्र, ठाम, ठोस असे उत्तर किंवा कृती योजना होत नाही, ही खंत आहे. नेहानंतर झालेल्या अंजलीच्या घटनेने तर याचे प्रत्यंतरच आले आहे. कोणत्याही परिस्थितीत आरोपीला शिक्षा होणारच, यादृष्टीने तपास यंत्रणांनी कार्यरत रहायला हवे. पोलिसांनी आपले काम चोख बजावायला हवे आणि सामाजिक व महिला संघटनांनी केवळ अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याऐवजी महाविद्यालयात आणि त्याहीपेक्षा शाळांमध्ये जाऊन समुपदेशन करणे ही काळाची गरज आहे.
Home महत्वाची बातमी भय इथले संपत नाही!
भय इथले संपत नाही!
हुबळीत घडलेली दुसरी घटना तेथील सामाजिक वातावरणावर प्रश्नचिन्ह उठवणारी बेळगाव : रूपकुंवर, मथुरा, अमृता, निर्भया आता नेहा आणि अंजली… हत्या सुरूच आहेत. एकीकडे स्त्राr सबलीकरणाचे, सक्षमीकरणाचे ढोल पिटले जात आहेत. त्यांच्यासाठी भरघोस सवलती दिल्या जात आहेत. महिला आता कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, म्हणून एकीकडे कौतुकाची तोरणे बांधली जात आहेत आणि दुसरीकडे तिला पायदळी तुडविले जात […]