साखर मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

मंत्र्यांच्या नावे मारली बोंब; भंडारा उधळून केला निषेध : पेलिसांकडून शेतकरी ताब्यात; घटनास्थळी मोठा बंदोबस्त बेळगाव : साखर व एपीएमसी बाजार समिती मंत्री शिवानंद पाटील यांनी वारंवार शेतकऱ्यांविरोधात भूमिका घेतली आहे. पाच लाख रुपयांसाठीच शेतकरी आत्महत्या करतात, तसेच कर्जमाफीसाठी दुष्काळ पडावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे. असे वक्तव्य केल्याचा आरोप करत शेतकरी संघटनांकडून साखर […]

साखर मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

मंत्र्यांच्या नावे मारली बोंब; भंडारा उधळून केला निषेध : पेलिसांकडून शेतकरी ताब्यात; घटनास्थळी मोठा बंदोबस्त
बेळगाव : साखर व एपीएमसी बाजार समिती मंत्री शिवानंद पाटील यांनी वारंवार शेतकऱ्यांविरोधात भूमिका घेतली आहे. पाच लाख रुपयांसाठीच शेतकरी आत्महत्या करतात, तसेच कर्जमाफीसाठी दुष्काळ पडावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे. असे वक्तव्य केल्याचा आरोप करत शेतकरी संघटनांकडून साखर इन्स्टिट्यूटवर मोर्चा काढून आंदोलन केले. यादरम्यान शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे शेतकरी आंदोलन भडकण्याचे चित्र निर्माण झाले आहे. साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी शेतकऱ्यांविरोधात भूमिका घेतली आहे. वारंवार शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राज्य सरकारचा एक जबाबदार मंत्री शेतकऱ्यांविरोधात असे वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अवमान करीत आहेत. त्यामुळे अशा मंत्र्याने पदावर राहणे योग्य नाही. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, यापुढे त्यांना बेळगावात येवू देणार नाही, अशी भूमिका घेत शेतकरी संघटनांकडून साखर इन्स्टिट्यूटवर मोर्चा काढण्यात आला.
शेतकऱ्यांनी गणेशपूर येथील निजलिंगप्पा साखर इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश करून कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शेतकऱ्यांना कार्यालयात घुसण्यापासून रोखून धरण्यात आले. शेतकऱ्यांकडून आणलेला भंडारा पोलिसांनी काढून घेतला. कार्यालयात घुसण्यापासून रोखून धरण्यात आले. यामुळे शेतकरी व पोलिसांत वादावादी झाली. प्रवेशद्वारात बसून शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. मात्र कार्यालयात प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पोलिसांनी आत सोडण्यापासून रोखल्याने बाचाबाची झाली. साखरमंत्र्यांचे कार्यालय या ठिकाणी नको, त्यांचे कार्यालय येथून बंद करावे, शेतकऱ्यांविरोधात भूमिका घेणारा मंत्री आपल्याला नको, अशी मागणी करत जोरदार आवाज उठविला.
यावेळी शेतकऱ्यांनी मंत्र्यांकडून असे वक्तव्य यापूर्वीही करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा अपमान करणारा, शेतकऱ्यांना दोष देणाऱ्या मंत्र्यांनी केलेले वक्तव्य हे सरकारचे वक्तव्य आहे. त्यामुळे सरकार शेतकरी विरोधी आहे, हे दिसून येते. अशा मंत्र्यांचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी भंडारा उधळून निषेध नोंदविला. कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करताच शेतकऱ्यांना रोखण्यात आले. यावेळी पोलीस व शेतकऱ्यांत झोंबाझोंबी झाली. पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले व घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. साखर कारखान्यांमध्ये खुलेआम काटामारी केली जात आहे. याचा पुरावा देऊनही जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई होत नाही, असा आरोपही यावेळी करण्यात आला. एकूणच सरकार शेतकरीविरोधी भूमिका घेत आहे, असे सांगत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. शेतकरी नेते प्रकाश नायक यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.