जिल्ह्यातील शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

नुकसानीचा अहवाल पाठविला तरी भरपाई देण्याकडे कानाडोळा : अतिवृष्टीमुळे 87 हजार 300 हेक्टरमध्ये नुकसान बेळगाव : जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. परिणामी आर्थिक संकटालाही तोंड द्यावे लागले. यंदा शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. मात्र पावसामुळे दुबार पेरणीही वाया गेल्याने दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 87 हजार 300 हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे. यामध्ये 84 हजार हेक्टर कृषी तर […]

जिल्ह्यातील शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

नुकसानीचा अहवाल पाठविला तरी भरपाई देण्याकडे कानाडोळा : अतिवृष्टीमुळे 87 हजार 300 हेक्टरमध्ये नुकसान
बेळगाव : जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. परिणामी आर्थिक संकटालाही तोंड द्यावे लागले. यंदा शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. मात्र पावसामुळे दुबार पेरणीही वाया गेल्याने दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 87 हजार 300 हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे. यामध्ये 84 हजार हेक्टर कृषी तर 3300 हेक्टर बागायत पिकांचे नुकसान झाले आहे. पीक नुकसानीचा अहवाल देण्यात आला आहे. मात्र शेतकरी अद्याप नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. मे महिन्याच्या मध्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे हाती घेऊन पेरणीच्या कामाला सुरुवात केली. पेरणीची कामे आटोपल्यानंतर शेतकरी इतर कामात गुंतले.पण पेरणी केल्यानंतर सतत पाऊस होत राहिल्याने सुरुवातीपासूनच पिकांना फटका बसला. संततधार कायम सुरू राहिल्याने नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन महापूर स्थिती निर्माण झाली.
महापुराचे पाणी शेती शिवारात आल्याने आलेले पीक कुजून गेले. परिणामी पुन्हा शेतकऱ्यांनी शेतातील पाण्यचा निचरा झाल्यानंतर मशागत करून दुबार पेरणीही केली. मात्र पावसाची संततधार सुरूच राहिल्याने दुबार पेरणीही हाती लागली नाही. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांच्या हाती पीक तर लागलेच नाही शिवाय त्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागला. यामुळे यंदा शेतकऱ्यांना अस्मानी व आर्थिक संकट असा दुहेरी सामना करावा लागला.
शेतातील पाण्याचा निचरा झाल्यानंतर कृषी व बागायत खात्याच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात पीक नुकसानीच्या सर्व्हेचे काम हाती घेतले. यंदा जिल्ह्यात 87 हजार 300 हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाले असून 84 हजार कृषी तर 3300 बागायत पिकांचे नुकसान झाले आहे. पीक नुकसानीचा सर्व्हेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. अहवाल पाठवूनही बराच दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप राज्य सरकारकडून नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा नुकसानभरपाईकडे लागल्या आहेत.
शेतकऱ्यांनी कर्जे काढून पिकांची लागवड केली होती. मात्र यंदा अतिवृष्टीमुळे अपेक्षेप्रमाणे शेतकऱ्यांच्या हाती पीक लागले नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांवर दुबार पेरणी ओढवल्याने त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. राज्य सरकारने एनडीआरएफ व एसडीआरएफ अंतर्गत पीक नुकसानभरपाई जाहीर केली असली तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई जमा करण्यात आलेली नाही. यामुळे शेतकरी पीक नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत असून भरपाई आल्यानंतर ते पुन्हा येथील पिकांची लागवड करण्यास सज्ज होणार आहेत.