केंद्र-राज्य सरकारच्या वादात शेतकऱ्यांची फरफट

त्वरित मदत न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा :  सरकारच्या दुटप्पी धोरणाचा तीव्र निषेध बेळगाव : जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन गंभीर स्वरुप प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देऊन अनेक दिवस उलटले. तरी अद्याप त्यावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना […]

केंद्र-राज्य सरकारच्या वादात शेतकऱ्यांची फरफट

त्वरित मदत न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा :  सरकारच्या दुटप्पी धोरणाचा तीव्र निषेध
बेळगाव : जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन गंभीर स्वरुप प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देऊन अनेक दिवस उलटले. तरी अद्याप त्यावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना आश्वासनाचे गाजर दाखविले जात आहे, असा आरोप शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे. शेतकरी नेते प्रकाश नाईक यांच्याकडून सरकारच्या दुटप्पी धोरणाचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात विविध पिकांची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. खरीप हंगामात पावसाने अपेक्षित साथ दिली नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पेरणी केलेले पीक उगवून आल्यानंतर पाऊस न झाल्याने करपले. त्यामुळे चाऱ्याची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
आरोप-प्रत्यारोपात शेतकऱ्यांचे हाल
सरकारकडून पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याबाबत कृषी खात्याकडून अहवाल दिला असला तरी भरपाई देण्यात आलेली नाही. शेतकऱ्याला वेळेत आर्थिक मदत मिळत नसेल तर भरपाईचा काय उपयोग ठरणार आहे? राज्य सरकारकडून 2 हजारांची मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र ती मदतही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. 2 हजारांची तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना किती समाधानकारक ठरणारी आहे. सध्याच्या परिस्थितीत दोन हजार रुपये अत्यल्प मदत आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव दिला आहे. मात्र केंद्र व राज्याकडून एकमेकांवर आरोप करत शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहे. राज्यातील विरोधी पक्षाने भाजपकडून कोणतीच ठोस भूमिका घेतलेली जात नाही. तर राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून शेतकऱ्यांच्या मदतीला येण्यापासून दूर राहात आहे. एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप केले जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची फरफट होत आहे. त्वरित मदत न दिल्यास राज्य सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे.