खंडणीबहाद्दर एनजीओ मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

मुख्यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा : श्रेया धारगळकरवर कायदेशीर कारवाई,काही एनजीओ चालवितात स्वार्थासाठी,बळी न पडता लोकांनी तक्रारी नोंदवाव्यात डिचोली : गोव्यात सध्या बिगर सरकारी संस्थांच्या (एनजीओ) नावाखाली काहीजण वैयक्तिक एनजीओ करून कोणालातरी मदत करण्याच्या किंवा न्याय देण्याच्या बहाण्याने संबंधित व्यक्तींची समाजमाध्यमांवर बदनामी करणे व नंतर त्याच व्यक्तींकडून खंडणी मागणे, हे प्रकार वाढत आहेत. हे प्रकार […]

खंडणीबहाद्दर एनजीओ मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

मुख्यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा : श्रेया धारगळकरवर कायदेशीर कारवाई,काही एनजीओ चालवितात स्वार्थासाठी,बळी न पडता लोकांनी तक्रारी नोंदवाव्यात
डिचोली : गोव्यात सध्या बिगर सरकारी संस्थांच्या (एनजीओ) नावाखाली काहीजण वैयक्तिक एनजीओ करून कोणालातरी मदत करण्याच्या किंवा न्याय देण्याच्या बहाण्याने संबंधित व्यक्तींची समाजमाध्यमांवर बदनामी करणे व नंतर त्याच व्यक्तींकडून खंडणी मागणे, हे प्रकार वाढत आहेत. हे प्रकार आता पुढे खपवून घेतले जाणार नाहीत. खंडणी उकळणाऱ्या एनजीओंवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. काल गुरुवारी सांखळी बाजारतील श्रीमारूती संस्थानच्या वर्धापनदिन सोहळ्यास उपस्थिती लावलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वरील इशाला दिला. सध्या राज्यात गाजत असलेल्या श्रेया धारगळकर प्रकरणावर त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया देऊन वरील इशाराही दिला. यावेळी देवी लईराईचे धोंडगण व फातर्पे येथील श्री शांतादुर्गा फातर्फेकरीण देवस्थान समितीविषयी श्रेया धारगळकर यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचाही मुख्यमंत्र्यांनी निषेध केला. देवी लईराई व देवी कुंकळ्ळकरीण व फातर्फेकरीण यांचा आपणही भक्त आहे. धारगळकर यांच्यावर या प्रकरणी कठोर कारवाई केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
श्रेयावर कायदेशीर कारवाई
वरील दोन्ही प्रकरणी तक्रारी नोंदवून नंतर आपण दिलेल्या निर्देशानुसार कारवाई करत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कुंकळळी आणि डिचोली पोलीस स्थानकावरही तक्रार नोंदवून श्रेया धारगळकरला अटक केली. तिला 4 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या संपूर्ण कारवाईतून गोव्यात एक चांगला संदेश गेलेला आहे. सरकार अशा प्रवृत्तींना थारा देत नाही, तर त्यांच्यावर सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून रोखठोक कारवाई करते, हे यातून निष्पन्न झालेले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
भावना दुखावणाऱ्यांवर कारवाई होणारच
आज कोणीही कोणाच्याही वैयक्तिक, सामाजिक, सांस्कृतिक पातळीवर आपल्या तोंडाला येते ते समाजमाध्यमांवर बोलत सुटले आहेत. मोबाईलवर व्हिडिओ काढून कोणावरही कोणत्याही स्तराला जाऊन टीका करण्याचे सत्र सुरू आहे. यापुढे सामाजिक, सांस्कृतिक, वैयक्तिक पातळीवर कोणीही बेजबाबदार वक्तव्ये करू नये. त्यांच्यावर लगेच तक्रार नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गोव्यात सर्व धर्मिय लोक सलोख्याने राहतात. म्हणून हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या धर्मांवर सुध्दा बेजबाबदार वक्तव्ये करून धार्मिक भावना व सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास सरकार गप्प राहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दिला.
 एनजीओंचा घेणार शोध
गोव्यात खूप एनजीओ चांगले काम करत आहेत. स्कूल, हॉस्टेल चालवतात, गरजू व होतकरू लोकांना मदतीचा हात देतात. परंतु काहीजण एनजीओच्या नावावर गैरप्रकार करतात. वैयक्तिकरित्या एनजीओ चालवणारे लोक समाजासाठी नव्हे तर आपल्या स्वार्थासाठी एनजीओ चालवतात. त्यांचा शोध घेऊन सरकार त्यांच्यावर कारवाई करणार आहे.