भंगार वितळवणाऱ्या फॅक्टरीत स्फोट

वाठादेव परिसरासह डिचोली हादरली : अर्धा किलोमीटरवरील घरांवर झाला परिणाम,दीड किलोमीटरपर्यंत झाला कानठळ्या बसणारा आवाज डिचोली : वाठादेव डिचोली येथील रोलिंग मील या भंगार लोखंड वितळवणाऱ्या फॅक्टरीमध्ये काल गुऊवार दि. 9 मे रोजी रात्री 7 वा. च्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटामुळे  वाठादेव परिसरासह डिचोली हादरली. सलगपणे झालेल्या चार स्फोटांचा कानठळ्या बसविणारा आवाज सुमारे दीड किलोमीटर […]

भंगार वितळवणाऱ्या फॅक्टरीत स्फोट

वाठादेव परिसरासह डिचोली हादरली : अर्धा किलोमीटरवरील घरांवर झाला परिणाम,दीड किलोमीटरपर्यंत झाला कानठळ्या बसणारा आवाज
डिचोली : वाठादेव डिचोली येथील रोलिंग मील या भंगार लोखंड वितळवणाऱ्या फॅक्टरीमध्ये काल गुऊवार दि. 9 मे रोजी रात्री 7 वा. च्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटामुळे  वाठादेव परिसरासह डिचोली हादरली. सलगपणे झालेल्या चार स्फोटांचा कानठळ्या बसविणारा आवाज सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील लोकांना ऐकू आला. सुदैवाने या स्फोटात कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा झाली नसल्याचे सांगण्यात आले. परंतु या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये एकच घबराट पसरली असून स्थानिक लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. स्फोट झाल्यानंतर या परिसरात सर्वत्र गोंधळ उडाला, सर्वत्र धुराचे लोट व फॅक्मटरीच्या बाहेर आग लागल्याचे अनेकांनी पाहिले आणि तिथे धाव घेतली. परंतु प्रारंभी कोणालाही आत सोडण्यात आले नाही. तसेच आतील सर्व दिवाबत्ती बंद करून अंधार करण्यात आला. त्यामुळे नेमके काय झाले याचा अंदाज कोणालाही मिळू शकला नाही. परंतु आत भयानक स्फोट झाल्याचे सर्वांना समजले. या घटनेची माहिती डिचोली अग्निशामक दल व पोलिसांना देण्यात आली. अग्निशामक दलाचा बंब लगेच घटनास्थळी दाखल झाला. दलाच्या जवानांनी घटनेचा अंदाज घेऊन आपल्या परिने पाण्याची फवारणी केली. अग्निशामक दलाचा बंब दाखल झाला त्यावेळी फॅक्टरीत आग सुरूच होती.
कंपनीला अगोदरपासून विरोध
गोवा स्टील रोलिंग मील या कंपनीमध्ये ऑरेंज फॉक्स स्टील रोलिंग मील या नावाने फॅक्टरी भंगार लोखंड एकत्रितपणे आणून ते वितळण्याचे काम सुरू आहे. या फॅक्टरीतून उडणारा धूर परिसरात पसरत असल्याने या परिसरातील लोक हैराण झालेले आहे. त्याविरोधात या लोकांनी दीड -दोन वर्षांपूर्वी आंदोलन छेडून कंपनी बंद पाडली होती. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत सदर कंपनी बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर संबंधीत सरकारी यंत्रणांना बरोबर घेऊन एक संयुक्त बैठकही घेतली होती. या बैठकीनंतर सर्व काही सुरळीत चालणार, लोकांना त्रास होणार नाही अशी कबुली मालकाने दिली होती. दीड- दोन वर्षांपूर्वी या संपूर्ण लोखंड वितळवणाऱ्या युनिटविरोधात आम्ही आंदोलन केले होते. फॅक्टरी बंद केली होती व काही नियम घातले होते. ते मालकाने मान्य करून काहीच समस्या होणार नाही याची ग्वाही दिली होती. त्यानंतरही 16 व 23 फेब्रुवारी, 11 एप्रिल रोजी अशा तक्रारी केल्या. मात्र गोवा प्रदूषण महामंडळ काहीच कारवाई करत नाही. गोवा स्टील रोलिंग मील या नावाने कंपनी आहे, पण कंपनी भलताच चालवतो. आजचा स्फोट हा भूकंपाप्रमाणे मोठा होता. आमची घरे अक्षरश: हादरली. बाहेर आगही लागली व धुराचे लोळ बाहेर पडत होते. स्फोट कशामुळे झाला याची त्यांनाच कल्पना नाही. ते आम्हाला विचारतात. यावर सरकारी यंत्रणा, आमदारांनी गांभीर्याने लक्ष घालावे. अशा घटनांमुळे आता स्थानिकांचा जीव धोक्यात आलेला आहे, असे स्थानिक नागरिक वितेंद्र गोवेकर यांनी म्हटले आहे.
स्फोटाचे नेमके कारण गुलदस्त्यात – रियाझ बेग
या फॅक्टरीत गावावरचे लोखंडी भंगार आणून ते वितळवले जाते. त्यात सिलेंडर, फायर एक्स्टींविशर असतात, ते वितळवण्यासाठी थेट भट्टीत घालतात. अशाच प्रकारे काही तरी वस्तू घातली असल्यास सदर स्फोट झाला असणार. या स्फोटात कोणालाही काहीही इजा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे, असे यावेळी स्थानिक नगरसेवक रियाझ बेग यांनी सांगितले.
अर्धा किलोमीटर दूरवरची घरे हादरली
हा स्फोट झाला त्यावेळी अर्धा किलोमीटरवर असलेल्या आमच्या घरांना हादरा बसला. घरे हलली. प्रथमदर्शनी काय झाले ते कळलेच नाही. घरावर काहीतरी पडल्याचा अंदाज आला. घराच्या बाहेर येऊन पाहिल्यास रोलिंग मीलच्या वर मोठ्या प्रमाणात काळ्या धुराचे लोळ दृष्टीस पडले. ते पाहताच आपण अन्य एकासह रोलिंग मीलजवळ पोहोचलो असता सर्वत्र धूर होता. बाहेर पत्र्यांना लागून आग लागली होती. आत अंधार करण्यात आला होता. सर्व दिवाबत्ती बुजविण्यात आल्या होत्या, असे वाठादेव येथील जमीर मगोडकर यांनी सांगितले.
माता व पूत्र थोडक्यात बचावले
या भीषण स्फोटातून अस्नोडा येथील एक युवक व त्याची आई थोडक्यात बचावली. हा स्फोट झाला त्यावेळी सदर युवक आपल्या आईला घेऊन दुचाकीवरून वाठादेवच्या दिशेने जात होता. त्याचवेळी झालेल्या भीषण स्फोटामुळे कानठळ्या बसणारा आवाज झाला. आगीचा भडका उडाला. सदर भडका इतका तीव्र होता की त्याच्या ज्वाळा फॅक्टरीतून रस्त्याच्या बाहेर आल्या. दुचाकीवरून जाणाऱ्या त्या युवक व त्याच्या आईच्या डोक्यावरून ज्वाळा गेली. या घटनेमुळे सदर युवक व त्याची आई हादरली. केवळ दैव बलवत्तर म्हणून हे दोघे सुखरूप बचावले.
दोन भट्ट्यांमध्ये गळती झाल्यामुळे स्फोट?
घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांसह या फॅक्टरीतील पर्यवेक्षकाने संपूर्ण भट्टीची पाहणी केली. या पाहणीत आत चालणाऱ्या चारपैकी दोन फॅक्टरीमध्ये अचानक गळती झाल्यामुळे सदर स्फोट झाल्याचे सदर पर्यवेक्षकाने सांगितले. यात कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा झाली नसल्याचेही ते म्हणाले.