मनपा कौन्सिल सेक्रेटरीपदाबाबत सारेच नाराज

अविश्वासामुळे जबाबदारी घेण्यास कोणीच तयार नाही : आता नगरसेवकांनीच आत्मचिंतन करण्याची गरज बेळगाव : महापालिकेतील राजकारण दिवसेंदिवस तापत चालले आहे. महत्त्वाचे म्हणजे कौन्सिल सेक्रेटरीपदावर कोणच रुजू होण्यास तयार नाहीत. यापूर्वी कौन्सिल सेक्रेंटरी पदावर असलेले अधिकारी काही मोजकेच महिने काम केले आहेत. यामुळे सध्या कौन्सिलपदावर नियुक्त होण्यास कोणाचीच तयारी नाही. त्यामुळे कौन्सिल सेव्रेटरीपदाची समस्या निर्माण झाली […]

मनपा कौन्सिल सेक्रेटरीपदाबाबत सारेच नाराज

अविश्वासामुळे जबाबदारी घेण्यास कोणीच तयार नाही : आता नगरसेवकांनीच आत्मचिंतन करण्याची गरज
बेळगाव : महापालिकेतील राजकारण दिवसेंदिवस तापत चालले आहे. महत्त्वाचे म्हणजे कौन्सिल सेक्रेटरीपदावर कोणच रुजू होण्यास तयार नाहीत. यापूर्वी कौन्सिल सेक्रेंटरी पदावर असलेले अधिकारी काही मोजकेच महिने काम केले आहेत. यामुळे सध्या कौन्सिलपदावर नियुक्त होण्यास कोणाचीच तयारी नाही. त्यामुळे कौन्सिल सेव्रेटरीपदाची समस्या निर्माण झाली असून महापालिका आयुक्तांकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. महत्त्वाचे म्हणजे या विभागातील अनेक कर्मचाऱ्यांनी आम्हाला काम करणे अशक्य झाल्याबाबत महापालिका आयुक्तांना पत्रदेखील दिले आहे. त्यामुळे आता सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. कौन्सिलपदावर तत्कालीन उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांनी काही महिने काम केले. त्यानंतर त्यांची इतरत्र बदली झाली. त्याठिकाणी कौन्सिलपदावर नियुक्त करण्यात आलेल्या उमा बेटगेरी यांनाही लक्ष्य बनविण्यात आले. सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या नगरसेवकांनी त्यांनादेखील नाहक त्रास दिला. फाईल गायब प्रकरणावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यापर्यंत मजल गेली. यामुळे त्यांनीही या त्रासाला कंटाळून ते पद सोडून दिले. सत्ताधारी गटातील नगरसेवकांचा कोणावरच विश्वास नसल्याचे दिसून येत आहे. सभागृह अस्तित्वात आल्यानंतर सुरळीतपणे काम करणे गरजेचे आहे. मात्र केवळ अधिकाऱ्यांवर आरोप करत त्यांच्यावर अविश्वास दाखविला जात आहे.
यामुळे अधिकारी जबाबदारी घेण्यास नकार देत आहेत. वास्तविक नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कामकाज करणे गरजेचे आहे. मात्र या नगरसेवकांचा या अधिकाऱ्यांवरच विश्वास नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच उपायुक्त उदयकुमार तळवार यांनी प्रभारी कौन्सिल सेक्रेटरीपदाची जबाबदारी घेतली होती. मात्र केवळ दोनच महिन्यांत त्यांनीही यामधून मुक्त करा, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. या गोंधळामुळे महापालिकेतील कारभाराची घडी मात्र विस्कटली आहे. अशीच स्थिती राहिल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. यापूर्वी अशाप्रकारे कधीच घटना घडल्या नव्हत्या. मात्र यावेळी वारंवार अशा घटना घडत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान महत्त्वाचे म्हणजे सभागृह किंवा बैठक कशा प्रकारे घेतली जाते, याचाच अनुभव नगरसेवकांना कमी असल्याचे दिसून येत आहे. भाजप आणि काँग्रेसच्या राजकारणामुळे महापालिकेतील अधिकारी भरडले जात आहेत. तर बेळगावच्या जनतेला या राजकारणामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेतील अनेक अधिकारी स्पष्टपणे बोलून दाखवत आहेत की आपल्यावर या नगरसेवकांचा विश्वासच नाही. त्यामुळे काम कसे करायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अधिकारीही कंटाळले
सत्ताधारी गटातील नगरसेवक मनमानीपणे बैठका ठरवत असतात. तातडीने त्याचा अजेंडा आणि इतिवृत्त तयार करा, असा आदेश दिला जातो. मात्र प्रत्यक्षात मनुष्यबळ कमी असल्यामुळे वारंवार होणाऱ्या बैठकींचा अजेंडा तयार करणे कठीण होत आहे. अजेंडा दिल्यानंतरही काही तरी चुका काढून अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न हे नगरसेवक करत आहेत. त्यामुळे अधिकारीही कंटाळले आहेत. नेमके करायचे काय? असा प्रश्न या नगरसेवकांना पडला आहे.
जबाबदारी कोण घेणार?
कौन्सिल सेक्रेटरीपदाची जबाबदारी आता कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी हे ही जबाबदारी कोणावर सोपविणार याकडे लक्ष लागले आहे. कौन्सिल विभागातील कर्मचाऱ्यांनी आमची इतरत्र बदली करा, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे एकूणच सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या नगरसेवकांमुळे अधिकारीच कंटाळले आहेत. जर महापालिकेचा कारभार सुरळीत चालायचा असेल तर त्यासाठी नगरसेवकांनी आपापसातील मतभेद दूर करून सभागृह आणि बैठका आयोजित करणे गरजेचे झाले आहे. बैठकांमध्ये आणि सभेमध्ये अनेकवेळा महापौरांचा अवमान होत आहे. त्याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. एकूणच आता या नगरसेवकांना एखाद्या जाणकार व्यक्तीकडूनच मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.