ग्रामसभा होऊन महिना उलटला तरी विकासकामांना खीळ

अगसगे ग्रामसभेबाबत नागरिकांतून शंका : पीडीओसह सर्व अधिकाऱ्यांची कार्यालयात दांडी, ग्रामस्थांची तक्रार वार्ताहर /अगसगे अगसगे ग्रामसभा होऊन महिना उलटला तरी अद्याप ठरावाची प्रत देण्यास टाळाटाळ होऊ लागली आहे. यामुळे या ग्रामसभेबाबत नागरिकांतून शंका उपस्थित होऊ लागली आहे. तब्बल सात वर्षानंतर झालेली ग्रामसभा देखील फुसका बार ठरल्याचे बोलले जात आहे. यामुळे गावातील विकासकामांना खीळ बसली आहे. […]

ग्रामसभा होऊन महिना उलटला तरी विकासकामांना खीळ

अगसगे ग्रामसभेबाबत नागरिकांतून शंका : पीडीओसह सर्व अधिकाऱ्यांची कार्यालयात दांडी, ग्रामस्थांची तक्रार
वार्ताहर /अगसगे
अगसगे ग्रामसभा होऊन महिना उलटला तरी अद्याप ठरावाची प्रत देण्यास टाळाटाळ होऊ लागली आहे. यामुळे या ग्रामसभेबाबत नागरिकांतून शंका उपस्थित होऊ लागली आहे. तब्बल सात वर्षानंतर झालेली ग्रामसभा देखील फुसका बार ठरल्याचे बोलले जात आहे. यामुळे गावातील विकासकामांना खीळ बसली आहे. अगसगे ग्रा. पं. कार्यक्षेत्रामध्ये चलवेनहट्टी व म्हाळेनट्टी गावचा समावेश आहे. या ग्रुप ग्रा. पं.ची 29 नोव्हेंबर रोजी ग्रामसभा झाली. सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच विकासकामांसंदर्भात चर्चा करण्यात आली आणि ग्रामस्थांनी काही विषयांवर ठराव घालण्यासाठी नोडल अधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्यांना सांगितले. राष्ट्रीय उद्योग खात्री योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. सभा तब्बल सात तास चालली होती. यावेळी अनेक विषयांवर ठराव ग्रामस्थांनी मांडला होता. मात्र, ग्रामविकास अधिकारी ठराव देण्यास टाळाटाळ करीत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ठरावामागे गौडबंगाल काय?
नियमानुसार ग्रामसभा झालेल्या दोन ते तीन दिवसात ठराव लिहून नोडल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी यांच्या सह्या करून संबंधित तालुका व जिल्हा पंचायतीला सादर करावा लागतो. सेफ वॉर्ड समूहाचे अध्यक्ष संतोष मेत्री यांनी ग्रामविकास अधिकारी एन. ए. मुजावर यांच्याकडे ठरावाच्या प्रतची मागणी केली. मात्र, त्यांना ठराव आज देतो, उद्या देतो म्हणून महिना उलटला तरी ठरावाची प्रत दिली नाही. त्यामुळे त्यांनी ता. पं. अधिकारी गणेश यांच्याकडे तक्रार देखील केली आहे. तरी अद्याप ठराव देत नाहीत. वारंवार ग्रा. पं.चे हेलपाटे मारत आहेत. ग्रामविकास अधिकारी अद्याप ठराव अर्धा लिहिला आहे. कामे फार आहेत. ठराव संपूर्ण लिहून देतो, असे उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. यामुळे या ठरावामागचे गौडबंगाल काय आहे, असा आरोप संतोष मेत्री यांनी केला आहे.
पीडीओ वारंवार गैरहजर
ग्रामविकास अधिकारी एन. ए. मुजावर हे ग्रा. पं.मध्ये वारंवार गैरहजर असतात. यामुळे ग्रामस्थांची कामे होत नाहीत. ग्रामस्थांनी वारंवार ग्रा. पं.ला पायपीट करावी लागते. गैरहजर का म्हणून विचारल्यास ऑफिसच्या कामासाठी ता. पं. ला व जि. पं.ला गेल्याचे वारंवार सांगतात. ग्रामस्थांची कामे वेळेवर करणे असे कायदा सांगतो. मात्र तेच कायद्यानुसार ग्रा. पं.मध्ये नसतात. यामुळे गावातील विकासकामांना खिळ बसली आहे.
ग्रा. पं. मध्ये अधिकारीच गैरहजर
बुधवार 3 रोजी ग्रा. पं.मध्ये ग्रामस्थ तसेच संतोष मेत्री ठरावाची प्रत मागण्यास गेले असता ग्रा. पं.मध्ये पीडीओ, सेक्रेटरी, क्लार्क, वॉटरमन कोणीच नव्हते. यामुळे ग्रा. पं.मध्ये शुकशुकाट होता. यावेळी येथे आपल्या कामासाठी आलेला एक सदस्यही  त्यांची वाट पाहत थांबला होता. याबाबत तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न ग्रामस्थांतून होत आहे. पीडीओंना फोन केला असता त्यांनी ता. पं.ला आल्याचे सांगितले. इतर अधिकारी इतर कामांसाठी गेल्याचे सांगण्यात आले.
ठराव न दिल्यास जि. पं. कडे तक्रार
महिना उलटला तरी अद्याप ठराव मिळाला नाही. आणखी दोन दिवसामध्ये ठराव मिळाला नसल्यास पीडीओ व ग्रामसभेचे नोडल अधिकाऱ्यांविरोधात जिल्हा पंचायत व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे दलित प्रगतीपर सेनेचे अध्यक्ष शिवपुत्र मेत्री व सेफ वॉर्डचे अध्यक्ष संतोष मेत्री यांनी सांगितले आहे.