महांतेश कवटगीमठ फाऊंडेशनची स्थापना

16 जानेवारी रोजी सौंदत्तीत होणार उद्घाटन बेळगाव : सहकार, राजकारण, समाजकारणात गेल्या एक शतकापासून सक्रिय असलेल्या चिकोडी येथील कवटगीमठ घराण्याने सेवा क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. सेवाकार्यात सध्या तिसरी पिढी कार्यरत असून याचा विस्तार वाढविण्यासाठी महांतेश कवटगीमठ चॅरिटेबल फाऊंडेशनची स्थापना केली आहे. दि. 16 रोजी सौंदत्ती येथे आपल्या वाढदिवसा दिवशी या ट्रस्टचे उद्घाटन होणार आहे, […]

महांतेश कवटगीमठ फाऊंडेशनची स्थापना

16 जानेवारी रोजी सौंदत्तीत होणार उद्घाटन
बेळगाव : सहकार, राजकारण, समाजकारणात गेल्या एक शतकापासून सक्रिय असलेल्या चिकोडी येथील कवटगीमठ घराण्याने सेवा क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. सेवाकार्यात सध्या तिसरी पिढी कार्यरत असून याचा विस्तार वाढविण्यासाठी महांतेश कवटगीमठ चॅरिटेबल फाऊंडेशनची स्थापना केली आहे. दि. 16 रोजी सौंदत्ती येथे आपल्या वाढदिवसा दिवशी या ट्रस्टचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी दिली. याच दिवशी मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. शुक्रवारी हॉटेल संकम येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, आई शांतादेवी मल्लय्यास्वामी कवटगीमठ यांच्या इच्छेनुसार या फाऊंडेशनची स्थापना करण्यात येत आहे. आईचे माहेर व आपले जन्मस्थान सौंदत्ती आहे. त्यामुळे सौंदत्ती येथे रेणुका यल्लम्मादेवीच्या पुण्यक्षेत्रात या फाऊंडेशनला चालना देण्यात येणार आहे.
 तिसरी पिढी कार्यरत
शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, संस्कृती व संस्कार आणि सहकार क्षेत्रात कार्य करण्याच्या उद्देशाने या फाऊंडेशनची स्थापना केली आहे. केवळ बेळगाव जिल्हाच नव्हे संपूर्ण राज्यात फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य करण्यात येणार आहे. आजोबा कल्लय्यास्वामी यांनी शेती, व्यापार व सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटविला होता. वडील एम. के. कवटगीमठ यांनीही शिक्षण, सहकार क्षेत्रात कामगिरी केली आहे. आपली ही तिसरी पिढी आहे.
 विस्तारासाठीच ट्रस्टची स्थापना
केएलई संस्थेच्या माध्यमातून शिक्षण व आरोग्य क्षेत्रात सेवा बजावण्याची संधी आपल्याला मिळाली. आता सेवा क्षेत्राचा विस्तार करण्यासाठीच ट्रस्टची स्थापना करण्यात येणार आहे. आपले बंधू जगदीश कवटगीमठ यांनी चिकोडी येथे सुरू केलेले सेवा कार्य अखंडपणे सुरू आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. 16 जानेवारी रोजी केएलई संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी आदी भाग घेणार आहेत. सुत्तूर येथील जगद्गुरू शिवरात्री देशीकेंद्र स्वामीजी, सिद्धगंगा मठाचे सिद्धलिंग स्वामीजी, तोंटदार्य मठाचे डॉ. तोंटदसिद्धराम स्वामीजी आदींसह सुमारे 75 हून अधिक मठाधीश या कार्यक्रमात भाग घेणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.  यावेळी के. व्ही. पाटील, शरदचंद्र कवटगीमठ, सी. आर. पाटील, प्रमोद कोचेरी, शिवयोगी मठ, राजेंद्र मुतगेकर आदी उपस्थित होते.
लोकसभेसाठी इच्छुक
यावेळी पत्रकारांच्या प्रश्नावर बेळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे महांतेश कवटगीमठ यांनी सांगितले. विधान परिषदेत प्रभावीपणे काम केले आहे. तरीही गेल्या निवडणुकीत आपला पराभव झाला. पराभवानंतर आपण लगेच समाजकार्यात स्वत:ला गुंतवले. पक्षाने लोकसभेसाठी संधी दिल्यास निवडणूक लढविण्याची आपली तयारी आहे, असेही महांतेश कवटगीमठ यांनी सांगितले.