हल्ल्यातील जखमी तरुणाची ईश्वरप्पांकडून चौकशी

समाज कल्याण खात्याकडून मदतीची अपेक्षा बेळगाव : टोळक्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गौंडवाड, ता. बेळगाव येथील तरुणाची माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. उपचार घेणाऱ्या तरुणाची विचारपूस करून मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथक बेळगावला पाठविण्याची मागणी त्यांनी केली. शनिवार दि. 6 जानेवारी रोजी गौंडवाड-यमनापूर परिसरातील एक तरुण-तरुणी किल्ला तलाव […]

हल्ल्यातील जखमी तरुणाची ईश्वरप्पांकडून चौकशी

समाज कल्याण खात्याकडून मदतीची अपेक्षा
बेळगाव : टोळक्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गौंडवाड, ता. बेळगाव येथील तरुणाची माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. उपचार घेणाऱ्या तरुणाची विचारपूस करून मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथक बेळगावला पाठविण्याची मागणी त्यांनी केली. शनिवार दि. 6 जानेवारी रोजी गौंडवाड-यमनापूर परिसरातील एक तरुण-तरुणी किल्ला तलाव येथील ध्वजस्तंभाकडे गेले असता तब्बल तीन तासांहून अधिक काळ त्यांना कोंडून घालून मारहाण करण्यात आली होती. ‘आम्ही दोघे भाऊ-बहीण आहोत’ असे वारंवार सांगूनही टोळक्याने लोखंडी रॉडने त्यांना मारहाण केली आहे. इतर कार्यक्रमानिमित्त बेळगावात आलेले भाजप नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी रविवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन जखमी सचिन मल्लाप्पा लमाणी (वय 20) या तरुणाची भेट घेऊन त्याची विचारपूस केली. यावेळी माजी आमदार संजय पाटील यांच्यासह पक्षाचे इतर नेते उपस्थित होते. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ईश्वरप्पा म्हणाले, गुंडगिरीच्या प्रकाराने आपल्याला धक्काच बसला आहे. भाऊ-बहिणीवर मुस्लीम गुंडांनी हल्ला केला आहे. जखमी सचिन हा लमाणी समाजाचा आहे. तर तरुणी मुस्लीम असली तरी हे दोघे नात्याने भाऊ-बहीण आहेत. या दोघा जणांनी वारंवार सांगूनही त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. यावरून राज्यात सरकार अस्तित्वात आहे का? असा प्रश्न पडतो. मुख्यमंत्री सिद्धरामय्या व गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी बेळगावला त्वरित विशेष पथक पाठवावे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याची पोलीस दलाने खबरदारी घ्यावी, अशी मागणीही ईश्वरप्पा यांनी केली असून जखमी तरुणाला समाज कल्याण खात्याकडून मदत देण्यास सांगितले आहे. ती त्वरित द्यावी, असेही ईश्वरप्पा यांनी सांगितले.