कसोटी चॅम्पियनशिप मानांकनात इंग्लंडची सहाव्या स्थानावर झेप

वृत्तसंस्था/ दुबई इंग्लंड कसोटी संघाला वेस्ट इंडीजविरुद्ध मिळविलेल्या कसोटी विजयाचा आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप मानांकनात प्रगती करण्यास उपयोग झाला असून त्यांनी दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्ट इंडीज या संघांना मागे टाकत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. विंडीजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रविवारी विजय मिळवित मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली असून ते क्लीन स्वीप साधण्याच्या […]

कसोटी चॅम्पियनशिप मानांकनात इंग्लंडची सहाव्या स्थानावर झेप

वृत्तसंस्था/ दुबई
इंग्लंड कसोटी संघाला वेस्ट इंडीजविरुद्ध मिळविलेल्या कसोटी विजयाचा आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप मानांकनात प्रगती करण्यास उपयोग झाला असून त्यांनी दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्ट इंडीज या संघांना मागे टाकत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. विंडीजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रविवारी विजय मिळवित मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली असून ते क्लीन स्वीप साधण्याच्या मार्गावर आहेत.
रविवारी इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत विंडीजवर 241 धावांनी विजय मिळविला. 385 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शोएब बशिरच्या भेदक फिरकी माऱ्यासमोर विंडीजचा दुसरा डाव केवळ 143 धावांत आटोपला. बशिरने 41 धावांत 5 बळी मिळविले. विंडीजविरुद्धची मालिका झाल्यानंतर लंकेचा संघ इंग्लंडमध्ये येणार असून त्यांच्याविरुद्ध 3 कसोटीची मालिका होणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये इंग्लंड संघ पाकचा व नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.
विंडीज संघाची नवव्या स्थानावर घसरण झाली असून त्यांचे 22.22 जय-पराजयाची टक्केवारी आहे. चॅम्पियनशिपच्या कालावधीत विंडीजच्या आणखी सात कसोटी होणार असून त्यात इंग्लंड (1), दक्षिण आफ्रिका (2), बांगलादेश (2), पाकिस्तान (2) यांच्याविरुद्ध हे सामने होणार आहेत. तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड आपला संघ कायम ठेवला असून विंडीज संघात स्पिनर गुडाकेश मोती संघात परतण्याची शक्यता आहे. आजारपणामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नव्हता.