स्मशानभूमीतील समस्यांवरून अभियंते धारेवर
सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांवर जोरदार चर्चा
बेळगाव : शहरातील सर्वच स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. या समस्यांकडे महानगरपालिकेने साफ दुर्लक्ष केल्याने जनतेतून तक्रारी येत आहेत. पथदीप व स्वच्छता नसल्याने त्याचे तीव्र पडसाद बुधवारी झालेल्या सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. महानगरपालिकेच्या साहाय्यक अभियंत्यांना स्थायी समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. केवळ थातूरमातूर उत्तरे देण्याचा प्रयत्न अभियंत्यांनी केला. मात्र स्थायी समितीच्या सदस्यांनी चांगलीच पोलखोल केली आहे.
बुधवारी सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीची बैठक अध्यक्ष जयतीर्थ सवदत्ती यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, सत्ताधारी गटाचे गटनेते गिरीश धोंगडी, नगरसेवक उपस्थित होते. शहापूर स्मशानभूमीमध्ये पथदीप नाहीत, त्या पथदीपांची कधी दुरुस्ती केला? असा प्रश्न त्या अभियंत्यांना करण्यात आला. त्यावर सदर अभियंत्यांनी शहापूरच नाहीतर शहरातील कोणत्याच स्मशानभूमीला जाऊन भेट दिली नसल्याचे उघडकीस आले. यामुळे सर्वच नगरसेवक त्यांच्यावर संतापले. तातडीने स्मशानभूमींच्या समस्या सोडवा, अशी सक्त ताकीद त्यांना देण्यात आली आहे.
शिवबसवनगर येथील पथदीपांची समस्या सोडविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मात्र, शहरातील अनेक ठिकाणी पथदीपांची समस्या आहे. त्याकडे या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे, अशी सर्वच नगरसेवकांनी तक्रार केली. त्यावर टेंडर घेण्यास कोणीच पुढे येत नसल्याचे या साहाय्यक अभियंत्यांनी सांगितले. त्यानंतरही या अभियंत्यांची चांगलीच झाडाझडती घेण्यात आली. थातूरमातूर कारण सांगू नका? 13 महिने उलटले तरी एक हायमास्ट तुम्हाला दुरुस्त करता येत नाही, हे कोणाचे दुर्दैव, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
शहरातील विविध प्रभागांमध्ये समस्या भेडसावल्यानंतर जनता आम्हाला त्याबाबत जाब विचारत असते. आम्ही तुम्हाला सूचना केल्यानंतर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात, हे योग्य नाही. वास्तविक प्रत्येक विभागाला तुम्ही स्वत:हून भेट देऊन तेथील समस्या जाणून घेणे गरजेचे आहे. महानगरपालिकेकडे पथदीप, तसेच विजेच्या समस्या दुरुस्तीसाठी पाच दुरुस्ती वाहने आहेत. मात्र त्या वाहनांमध्ये कोणतेच साहित्य नसते. त्या वाहनात वायर नसते, तर कधी बल्ब नसतात. त्यामुळे त्याचा काय उपयोग आहे? असा प्रश्न यावेळी करण्यात आला.
शहरातील सर्व स्मशानभूमींतील समस्या तातडीने सोडवून जनतेला सहकार्य करा. यासाठी हवा तेवढा वेळ घ्या. मात्र या कामाला आतापासूनच लागा, असे यावेळी सुनावण्यात आले. सर्वच नगरसेवकांनी या अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी केल्या. त्यावर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनीही त्या साहाय्यक अभियंत्यांना धारेवर धरले. नगरसेवक जे प्रश्न विचारतात त्याची उत्तरे प्रामाणिकपणे आणि योग्य पद्धतीने द्या, अशी सूचना केली. या बैठकीला नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्यासह इतर नगरसेवक, कौन्सिल सेक्रेटरी महेश जे.,अभियंते हणुमंत कलादगी व इतर अधिकारी उपस्थित होते.
सदाशिवनगर स्मशानभूमीतील स्क्रॅप हटवा…
सदाशिवनगर येथील स्मशानभूमी जणू डंपिंग भूमी करण्यात आली आहे. याठिकाणी सर्व साहित्य ठेवायचे आणि त्याकडे दुर्लक्ष करायचे, त्यामुळे या स्मशानभूमीमध्ये अडचण निर्माण होत आहे. याच स्मशानभूमीच्या जागेमध्ये कचरा वाहतूक करणारी वाहनेदेखील पार्किंग करायची, हे योग्य आहे का? असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. लवकरात लवकर तेथील स्क्रॅप उचला, तसेच वाहने इतरत्र पार्किंग करावीत, असा आदेश देण्यात आला आहे.
खासगी सकिंग मशीन वाहनांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न? : संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश
महानगरपालिकेकडे दोन सकिंग मशीन वाहने आहेत. त्यामधील एक वाहन नादुरुस्त झाले आहे. एकाच वाहनावर ताण पडत आहे. त्यामुळे काहीजण खासगी सकिंग मशीन वाहने घेऊन महानगरपालिकेच्या चेंबरमधील घाण बेकायदेशीरित्या काढण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेकडून खासगी वाहनधारक दुप्पट रक्कम आकारत आहेत. त्यामुळे त्यांना पाठीशी कोण घालत आहे? असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी केला. तसेच तातडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, असेदेखील सुनावण्यात आले आहे.
शहरातील विविध ठिकाणी खासगी सकिंग मशीनद्वारे चेंबर साफ करण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र हे करत असताना महानगरपालिकेकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. पण कोणीच परवानगी घेत नसल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत काही व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. तेव्हा त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही? असा प्रश्न पर्यावरण विभागाचे साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी यांना विचारण्यात आला. त्यावर मी संबंधित विभागाला याची माहिती दिली आहे, असे सांगून त्यांनी हात झटकले.
महानगरपालिकेकडे वाहन असताना खासगी वाहनांकडून हे काम करून घेतले जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे नुकसान होत आहे. सकिंग मशीनच्या माध्यमातून महानगरपालिकेला उत्पन्न मिळत असताना जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. यापुढे खासगी सकिंग मशीन वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. एलअॅण्डटी कंपनीची कामे अर्धवट असतात. याचबरोबर ती कामे संथगतीने सुरू असतात. तेव्हा त्यांना तातडीने कामे पूर्ण करण्याची ताकीद द्यावी, याचबरोबर विनापरवानगी काही कामे करत आहेत ती थांबवावीत, असे अभियंत्यांना सांगण्यात आले. कणबर्गी येथील तलाव व बाजूला असलेल्या उद्यानामध्ये विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. पथदीप नसल्याने अंधार पडत आहे. तेव्हा समस्या तातडीने सोडा, असे सांगण्यात आले. या बैठकीमध्ये भाग्यनगर नववा क्रॉस येथे हायमास्ट लावण्याबाबत मंजुरी देण्यात आली. या हायमास्टसाठी अडीच लाख खर्च करण्यात येणार आहे. त्यावर चर्चा करून सर्वांनी मंजुरी दिली. या बैठकीला महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण यांसह नगरसेवक उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी स्मशानभूमीतील समस्यांवरून अभियंते धारेवर
स्मशानभूमीतील समस्यांवरून अभियंते धारेवर
सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांवर जोरदार चर्चा बेळगाव : शहरातील सर्वच स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. या समस्यांकडे महानगरपालिकेने साफ दुर्लक्ष केल्याने जनतेतून तक्रारी येत आहेत. पथदीप व स्वच्छता नसल्याने त्याचे तीव्र पडसाद बुधवारी झालेल्या सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. महानगरपालिकेच्या साहाय्यक अभियंत्यांना स्थायी समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. केवळ थातूरमातूर उत्तरे देण्याचा प्रयत्न अभियंत्यांनी केला. मात्र स्थायी समितीच्या सदस्यांनी […]
