ENG vs NED : बेन स्टोक्सचं दमदार शतक, इंग्लंडचं नेदरलँड्समोर 340 धावांचं आव्हान
बेन स्टोक्सच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडनं नेदरलँड्ससमोर विजयासाठी 340 धावांचं आव्हान ठेवलंय. वन डे विश्वचषकाचा हा सामना सध्या पुण्यात सुरू आहे.
या दोन्ही संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय पण, पाकिस्तानमध्ये 2025 साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पात्र व्हायचं तर हा सामना जिंकणं दोन्ही टीम्ससाठी आवश्यक आहे.
स्टोक्सचं शतक
बेन स्टोक्सनं या स्पर्धेसाठी वन-डे क्रिकेटमधील निवृत्ती मागं घेतली होती. पण फिट नसल्यानं तो सुरूवातीचे काही सामने खेळू शकला नाही.
श्रीलंकेविरुद्ध 43 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 64 धावा करणाऱ्या स्टोक्सला मोठी खेळी करण्यात अपयश येत होतं. त्यानं नेदरलँड्सविरुद्ध ही कसर भरून काढली.
सुरूवातीला संघाची गरज म्हणून संथ खेळणाऱ्या स्टोक्सनं पाहता-पाहता गियर बदलला आणि शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत शतक झळकावलं.
बेन 84 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 6 षटकारांसह 108 धावा केल्या. त्यानं ख्रिस वोक्ससोबत सातव्या विकेटसाठी 129 धावांची भागिदारी केली. वोक्सनं 51 धावा काढल्या.
पण त्याआधी इंग्लंडची 1 बाद 133 वरुन 6 बाद 192 अशी घसरगुंडी उडाली होती.
इंग्लंडच्या प्रमुख फलंदाजांची निराशा
सलामीवीर दाविद मालननं 87 धावा करत चांगली सुरूवात केली होती. पण, जॉनी बेअरस्टो, ज्यो रूट, जोस बटलर, मोईन अली मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरले.
इंग्लंड पूर्ण 50 ओव्हर्स फलंदाजी करणारा का ? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी स्टोक्स आणि वोक्स यांच्या भागिदारीनं चित्र बदललं.
नेदरलँड्स आणि इंग्लंड हे संघ सध्या पॉईंट टेबलमध्ये अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत.
नेदरलँड्सनं आत्तापर्यंत सातपैकी दोन सामने जिंकलेत. तर गतविजेत्या इंग्लंडला सातपैकी फक्त एक सामना जिंकता आला आहे.
Published By- Priya Dixit
या दोन्ही संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय पण, पाकिस्तानमध्ये 2025 साली होणाऱ्या चॅम्पियन्स …