आरोग्य विम्यासाठीची वयोमर्यादा समाप्त

आरोग्य विम्यासंबंधीच्या नियमात मोठा बदल : ज्येष्ठ नागरिकांना नवी पॉलिसी मिळविता येणार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली तुमचे आईवडील वृद्ध असतील आणि त्यांचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी देखील आरोग्य विमा मिळवू शकणार आहात. विमा नियामक इर्डाने आरोग्य विमा खरेदी करण्याशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. पॉलिसी खरेदी करणाऱ्या व्यक्तींसाठी 65 वर्षांची वयोमर्यादा […]

आरोग्य विम्यासाठीची वयोमर्यादा समाप्त

आरोग्य विम्यासंबंधीच्या नियमात मोठा बदल : ज्येष्ठ नागरिकांना नवी पॉलिसी मिळविता येणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तुमचे आईवडील वृद्ध असतील आणि त्यांचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी देखील आरोग्य विमा मिळवू शकणार आहात. विमा नियामक इर्डाने आरोग्य विमा खरेदी करण्याशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. पॉलिसी खरेदी करणाऱ्या व्यक्तींसाठी 65 वर्षांची वयोमर्यादा हटविली आहे. यापूर्वी ग्राहक केवळ 65 वर्षांच्या वयापर्यंतच नवी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करू शकत होते.
आरोग्य विमा खरेदी करण्यावरील कमाल वयोमर्यादा समाप्त करत इर्डाला एक अधिक समावेशक आणि सुलभ आरोग्य देखभाल व्यवस्थेला चालना द्यायची आहे. 1 एप्रिल 2024 पासून प्रभावी आरोग्य विमा पॉलिसींसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. आता कुठल्याही वयाचा व्यक्ती नवी आरोग्य विमा पॉलिसी  खरेदी करू शकणार आहे.
विमा कंपन्यांना निर्देश
सर्व वयोगटातील लोकांसाठी आरोग्य विमा उत्पादने उपलब्ध असावीत असा निर्देश इर्डाने सर्व विमा कंपन्यांना दिला आहे. नियामकाने विमा प्रदात्यांना ज्येष्ठ नागरिकांच्या स्थितीनुसार आरोग्य विमा मिळविणे आणि त्यांचे क्लेम आणि तक्रारींवर निवारण करण्यासाठी समर्पित माध्यम स्थापन करण्याचेही निर्देश दिले आहेत.
कर्करोगग्रस्तांचाही विमा
इर्डाने स्वत:च्या परिपत्रकात विमा कंपन्यांना कुठल्याही प्रकारच्या पूर्व वैद्यकीय स्थिती असलेल्या व्यक्तींनाही आरोग्य विमा पॉलिसी देण्याचा आदेश दिला आहे. यात विमा कंपन्यांना हृदयरोग, कर्करोग आणि अन्य गंभीर आजार असलेल्या रुग्णांना पॉलिसी जारी करण्यापासून मनाई करता येणार नाही. परिपत्रकानुसार इर्डाने विमा प्रतीक्षा कालावधी देखील 48 महिन्यांऐवजी 36 महिने केला आहे. आयुष उपचार कक्षेवर कुठलीच मर्याद नाही. आयुर्वेद, योग, नैसर्गिक चिकित्सा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यासारख्या प्रणालींच्या अंतर्गत उपचाराला कुठल्याही मर्यादेशिवाय विमा रकमेपर्यंत क्याप्ती मिळणार आहे. सर्व वयोगटाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आरोग्य विमा उत्पादने विमा कंपन्यांनी सादर करावीत. विशेषकरून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, मुले तसेच अन्य कुठल्याही वयोगटासाठी विमा उत्पादने सादर केली जाऊ शकतात असे इर्डाने म्हटले आहे.