हेल्पलाईनद्वारे होणार चारा समस्या दूर

पशुसंगोपन खात्याचा निर्णय : पशुपालकांना दिलासा बेळगाव : चारा संकटावर मात करण्यासाठी पशुसंगोपन खात्याने हेल्पलाईन सुरू केली आहे. शिवाय तालुकानिहाय हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत अडकलेल्या पशुपालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यंदा सर्वत्र चाराटंचाई संकट गडद झाले आहे. विशेषत: जिल्ह्यातील चिकोडी, अथणी, रायबाग, कित्तूर आदी ठिकाणी चारा संकट निर्माण झाले आहे. अशा […]

हेल्पलाईनद्वारे होणार चारा समस्या दूर

पशुसंगोपन खात्याचा निर्णय : पशुपालकांना दिलासा
बेळगाव : चारा संकटावर मात करण्यासाठी पशुसंगोपन खात्याने हेल्पलाईन सुरू केली आहे. शिवाय तालुकानिहाय हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत अडकलेल्या पशुपालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यंदा सर्वत्र चाराटंचाई संकट गडद झाले आहे. विशेषत: जिल्ह्यातील चिकोडी, अथणी, रायबाग, कित्तूर आदी ठिकाणी चारा संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत पशुसंगोपन खात्याने एक पाऊल पुढे टाकत हेल्पलाईनचा आधार दिला आहे. पशुसंगोपन खात्याने पुढील 18 आठवडे पुरेल इतका चारा साठा शिल्लक असल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यातील काही भागात चारा संकट निर्माण झाले आहे. यासाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. अथणी तालुक्यात कक्कमरी, अनंतपूर, चिकोडी तालुक्यातील बेळकुट येथे प्रत्येकी एक चारा छावणी सुरू करण्यात आली आहे. मात्र इतर ठिकाणीही चारा संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, पशुपालकांचे हाल होऊ नयेत यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
पशुसंगोपन खात्याकडून तालुकानिहाय एक नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून तालुका पातळीवर जनावरांच्या चारा-पाण्याची देखरेख केली जाणार आहे. ज्या ठिकाणी चारा संकट निर्माण झाले आहे त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू केल्या जाणार आहेत. मागील पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे जलाशय, नदी आणि तलावांच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील काही भागात ओल्या व सुक्या चाऱ्याची कमतरता भासू लागली आहे. चिल्ह्यात एकूण 36 हजार 900 चाराकीट वाटप करण्यात आले आहेत. याचा 14 हजार 414 लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. जिल्ह्यात 13 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. यामध्ये गाय, म्हैस, बैल या जनावरांना मोठ्या प्रमाणात चाऱ्याची गरज भासते. मात्र जिल्ह्यात पाण्याअभावी चाराटंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत चारा छावण्याबरोबर पशुपालकांसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून चारा मिळवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.