खानापूर मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज

सहाय्यक निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती खानापूर : लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून कारवार मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात लोकसभा निवडणूक दि. 7 मे रोजी होणार आहे. त्या दृष्टीने कारवार लोकसभा मतदारसंघातील खानापूर विधानसभा मतदार क्षेत्रातील मतदार यंत्रणा सज्ज असल्याची माहिती खानापूर मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण यांनी दिली. रविवारी सकाळी तहसीलदार कार्यालयात […]

खानापूर मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज

सहाय्यक निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती
खानापूर : लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून कारवार मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात लोकसभा निवडणूक दि. 7 मे रोजी होणार आहे. त्या दृष्टीने कारवार लोकसभा मतदारसंघातील खानापूर विधानसभा मतदार क्षेत्रातील मतदार यंत्रणा सज्ज असल्याची माहिती खानापूर मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण यांनी दिली. रविवारी सकाळी तहसीलदार कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन निवडणूक सज्जतेबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड उपस्थित होते. कारवार मतदारसंघातील खानापूर विधानसभा मतदारक्षेत्र हे कारवार मतदारसंघात येत आहे. यासाठी ज्या उमेदवारांना निवडणूक लढवायची आहे. त्यांनी कारवार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज करावयाचा आहे. दि. 19 एप्रिल रोजी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असून दि. 20 एप्रिल रोजी स्कुटनी करण्यात येणार असून माघार घेण्याची तारीख 22 एप्रिल आहे. दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे. तर कारवार येथे सरकारी महाविद्यालयात दि. 4 जून रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. खानापूर तालुक्यात एकूण 2 लाख 17 हजार 524 मतदार आहेत. यात 1 लाख 11 हजार 559 पुरुष मतदार आहेत. तर 1 लाख 59 हजार 60 मतदार महिला असून पाच तृतीयपंथीय आहेत. तसेच 5 हजार 747 हे नव मतदार असून 85 वर्षावरील 1636 मतदार आहेत.
तर 1744 हे नोकरवर्ग असून 3600 मतदार हे पोस्टल मतदान करणारे आहेत. मतदार क्षेत्रात एकूण 312 मतदान केंद्रे आहेत. दुर्गम भागातील मतदार्रंना दोन कि. मी. च्या आत मतदान करता यावे, यासाठी नव्याने 57 मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. खानापूर मतदारक्षेत्रातील लेंढा, खानापूर, तोपिनकट्टी, बिडी, हिरेमुन्नवळी, गंदिगवाड संवेदनशील तर बेटगेरी, मोरब ही अतीसंवेदनशील मतदान केंद्रे असून या ठिकाणी सुरक्षित मतदान करण्यात यावे, यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यात निवडणुकीसाठी कणकुंबी, लोंढा, लिंगनमठ या ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले असून या ठिकाणी चोवीस तास तपासणी करण्यात येणार आहे. शांततेत व सुरळीत मतदान पार पाडण्यासाठी विविध पथकांची निर्मिती करण्यात आली असून यात भरारी पथके 6 तर व्हीडीओ शूटींग करणारी 5 पथके, हिशेबासाठी तीन पथके तर 36 स्थानिक पातळीवर अधिकारी काम करणार आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून राजकीय पक्षानी निवडणुका शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी आचारसंहितेचे पालन करावे, तसेच जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी जागृती करण्यात यावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मतदारांना सुरळीत आणि शांततेत मतदान पार पाडण्यासाठी मतदान केंद्रांवर सर्व व्यवस्था चोख ठेवण्यात येणार आहे. राजकीय पक्षांच्या प्रचारासाठी तसेच इतर कामासाठी परवानगी हवी असल्यास एक खिडकी अंतर्गत खानापूर तहसीलदार कार्यालयात सुविधा निर्माण करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज केल्यानंतर लवकरात लवकर परवानगी देण्याची सोय असल्याचेही यावेळी निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण यांनी सांगितले.