निवडणुकीचा प्रवास निम्म्यावर…
यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा प्रवास आता निम्म्यावर येऊन पोहचला आहे. मतदानाचे तीन टप्पे पार पडले आहेत. एकंदर 543 मतदारसंघांपैकी 283 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचप्रमाणे सोळा राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधले मतदानही आटोपले आहे. आता महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल तसेच उत्तर भारतातील काही राज्ये येथील मतदान उरलेले आहे. आतापर्यंतच्या मतदानामध्ये कोण पुढे आणि कोण मागे यासंबंधीच्या चर्चा विविध वृत्तवाहिन्यांवर आणि प्रसारमाध्यमांवर रंगू लागल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने एक्झिट पोलवर 1 जूनच्या संध्याकाळी साडेसातपर्यंत बंदी घातल्यामुळे या चर्चांमध्ये कोणाला किती जागा मिळणार, हे स्पष्टपणे न सांगता आडवळणाने सूचित केले जात असल्याचे दिसून येते. प्रत्येक वाहिनीचे मत यासंदर्भात भिन्न आणि परस्परविरोधी असल्याने अशा चर्चा वस्तुस्थितीवर प्रकाश टाकण्याऐवजी अधिक गोंधळ निर्माण करणाऱ्या ठरत आहेत. अशा चर्चा प्रत्येक निवडणुकीच्या आधी आणि निवडणूक होत असताना घडतात. त्यांचा सूरही तोच असतो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोणाचीही लाट नाही, असे विशिष्ट विश्लेषकांचे मत आहे. पण 2019 च्या निवडणुकीवेळच्या चर्चा युट्यूबर आज पाहिल्या तर त्यावेळीही हेच विश्लेषक कोणतीही लाट नाही, कोणत्याही एका नेत्याचा मतदारांवर प्रभाव नाही, महागाई, बेरोजगारी आदी मुद्देच मतदारांच्या मनात आहेत, असेच सांगत होते, हे दिसून येईल. पण त्या निवडणुकीची मतगणना झाल्यानंतर या विश्लेषकांची भाषा बदलली आणि त्यांना लाट होती असा साक्षात्कार झाला. त्यामुळे अशा चर्चांवर कितपत विश्वास ठेवायचा हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहेच. यंदाच्या निवडणुकीतली मतदानाची टक्केवारी यावर बरेच चर्वितचर्वण होत आहे. ही टक्केवारी मागच्या 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा कमी आहे. मतदानात झालेल्या या घटीचा लाभ कोणाला होणार आणि हानी कोणाची होणार यावर अनेकजण अनेक मते व्यक्त करीत आहेत. मतदानाची टक्केवारी किती हे महत्त्वाचे कधीच नसते. कारण आपल्या देशात मतदान अनिवार्य नाही. मतदान करायचे की नाही, हे मतदाराच्या इच्छेवर अवलंबून आहे. जे मतदान झाले आहे, तेव्हढ्याच मतांची गणना होणार आणि विजय किंवा पराभव कोणाचा होणार हे ठरणार. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की, दर निवडणुकीत मतदारांची संख्या वाढत असते. 2019 च्या निवडणुकीत साधारणत: 89 कोटी मतदार होते. आता ही संख्या 97 कोटींपर्यंत पोहचली आहे. याचाच अर्थ असा की पाच वर्षांच्या काळात 8 कोटी मतदार वाढले आहेत. त्यामुळे मागच्या वेळेपेक्षा मतदानाची टक्केवारी कमी राहिली तरी प्रत्यक्ष मतदान गेल्यावेळेपेक्षा जास्त होऊ शकते. एसबीआयच्या एका रिसर्च गटाने नेमके याच मुद्द्यावर बोट ठेवले आहे. टक्का घसरला असला तरी प्रत्यक्ष मतदान काही लाखांनी वाढले आहे, असे हा अहवाल स्पष्ट करतो. शिवाय, जे मतदान झालेले आहे, ते अधिक प्रमाणात कोणाच्या बाजूने झालेले आहे, ते महत्त्वाचे असते. निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या आकडेवारीनुसार प्रथम आणि द्वितीय टप्प्यांमध्ये सरासरी 66.5 टक्के मतदान झालेले आहे. तिसऱ्या टप्प्यातही हेच प्रमाण आहे. अद्याप मतदानाचे चार टप्पे व्हायचे आहेत. या टप्प्यांमध्ये हाच कल राहिला तरी मतदान समाधानकारक झाले असाच त्याचा अर्थ निघतो. त्यामुळे या मुद्द्याला विशेष महत्त्व देण्याचे कारण नाही. निवडणूक आयोगाने मतदानाची आकडेवारी उशीरा घोषित केली, या संबंधी बरीच टीका झाली. विरोधी पक्षांनी नेहमीप्रमाणे संशय व्यक्त केला. आयोगाने घोषित पेलेली अंतिम आकडेवारी आधी दिलेल्या आकडेवारीपेक्षा चार-पाच टक्के अधिक आहे. त्यामुळे येथे काहीतरी पाणी मुरत आहे, असा आरोप काँग्रेस आणि डाव्यांनी केला. काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी यासंबंधी विरोधी पक्षांच्या आघाडीतील पक्षांच्या प्रमुखांना पत्रेही पाठविल्याचे वृत्त आहे. तथापि, आकडेवारी उशीरा घोषित होण्यामागे काही काळेबेरे असण्याची शक्यता नाही. कारण, जितके मतदान झाले आहे, ते मतयंत्रांमध्ये बंद आहे आणि त्याच मतांची गणना होणार आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची विश्वासार्हता सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केली आहे. तसेच, ही यंत्रे जेथे ठेवली गेली आहेत, तेथे सर्व पक्षांचे आणि अपक्षांचे प्रतिनिधीही चोवीस तास उपस्थित असतात. त्यामुळे गडबड होण्याची शक्यता नाही. तरीही आरोप केले जाणे हा केवळ राजकारणाचा भाग म्हणता येईल. त्याकडे सर्वसामान्य माणूस फारसे लक्ष देत असेल, असे वाटत नाही. एकंदर, आतापर्यंतची निवडणूक शांततेत पार पडली असून काही अपवाद वगळता कोणताही मोठा अडथळा निर्माण झालेला नाही. राजकीय पक्षांनी आता मतदानाच्या पुढच्या टप्प्यांकडे लक्ष केंद्रीत केले असून हे टप्पे सत्ताधाऱ्यांसाठी विशेष महत्त्वाचे आहेत. मागच्या निवडणुकीत याच टप्प्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला निर्णायक मते मिळाली होती आणि विरोधक मागे पडले होते. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटक ही महत्त्वाची राज्ये असून या राज्यांमध्ये कोणाचे पारडे जड ठरते, त्यावर बऱ्याच बाबी अवलंबून राहतील असा रागरंग आहे. तसे प्रत्येक राज्य प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाचेच असते. तसेच त्याची निवडणुकीतील भूमिकाही निर्णायक असू शकते. नेमके काय घडणार आहे, याची काहीशी झलक आपल्याला 1 जूनला प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या एक्झिट पोल्सच्या आकडेवारीवरुन येऊ शकेल. मात्र, तीही केवळ अनुमानेच असतील. म्हणून सध्या होणाऱ्या चर्चा किंवा मतमतांतरे केवळ मनोरंजन म्हणून मतदारांकडून ऐकली जातील किंवा पाहिली जातील. आणखी साधारणत: चार आठवडे प्रतीक्षा केल्यानंतर 4 जूनला प्रत्यक्ष मतगणनेचा परिणामच आपल्यासमोर येणार असून तो खरा आणि या निवडणुकीपुरता अपरिवर्तनीय असणार, एवढेच निश्चितपणे म्हणता येते.
Home महत्वाची बातमी निवडणुकीचा प्रवास निम्म्यावर…
निवडणुकीचा प्रवास निम्म्यावर…
यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा प्रवास आता निम्म्यावर येऊन पोहचला आहे. मतदानाचे तीन टप्पे पार पडले आहेत. एकंदर 543 मतदारसंघांपैकी 283 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचप्रमाणे सोळा राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधले मतदानही आटोपले आहे. आता महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल तसेच उत्तर भारतातील काही राज्ये येथील मतदान उरलेले आहे. आतापर्यंतच्या मतदानामध्ये कोण […]