लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न हवे

सिद्धापुरात काँग्रेस प्रचारार्थ बैठक : डॉ. निंबाळकरांना निवडून आणण्याचे आवाहन कारवार : कारवार जिल्ह्याच्या इतिहासात लोकसभा निवडणुकीची संधी महिलांना कमी प्रमाणात मिळाली आहे. माजी केंद्रीय मंत्री मार्गारेट अल्वा यांच्यानंतर डॉ. अंजली निंबाळकर यांना निवडणूक लढविण्याची संधी काँग्रेस पक्षाने दिली आहे. त्यामुळे महिलांच्या जबाबदारीत वाढ झाली आहे. मतदार संघातील घरोघरी दाखल होऊन निंबाळकर यांना निवडून आणण्याचे […]

लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न हवे

सिद्धापुरात काँग्रेस प्रचारार्थ बैठक : डॉ. निंबाळकरांना निवडून आणण्याचे आवाहन
कारवार : कारवार जिल्ह्याच्या इतिहासात लोकसभा निवडणुकीची संधी महिलांना कमी प्रमाणात मिळाली आहे. माजी केंद्रीय मंत्री मार्गारेट अल्वा यांच्यानंतर डॉ. अंजली निंबाळकर यांना निवडणूक लढविण्याची संधी काँग्रेस पक्षाने दिली आहे. त्यामुळे महिलांच्या जबाबदारीत वाढ झाली आहे. मतदार संघातील घरोघरी दाखल होऊन निंबाळकर यांना निवडून आणण्याचे आवाहन राज्य प्रशासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आणि हल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी केले. ते सिद्धापूर येथे कारवार लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या ब्लॉक काँग्रेस समितीच्या बैठकीत बोलताना पुढे म्हणाले, संविधान बदलले पाहिजे अशी वक्तव्ये करणाऱ्या भाजपवाल्यांना निवडणूक लढविण्याचा नैतिक अधिकार नाही. लोकशाही दुबळी नव्हे तर बळकट करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. तथापि भाजपचे काही नेते लोकशाहीबद्दल प्रश्न उपस्थित करीत आहेत.
भाजपने लोकसभा निवडणुकीत 400 हून अधिक जागा जिंकल्या तर संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत. असे सांगून देशपांडे पुढे म्हणाले, ‘एकाद्यावेळी एनडीएचे 400 खासदारांचे स्वप्न साकार झाले तर हे देशाला परवडणार नाही. तथापि भारतीय मतदार सुज्ञ आहे. ते अतिशय जबाबदारीने मतदान करतात,’ असा विश्वास पुढे देशपांडे यांनी व्यक्त केला. सहावेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदारांनी जिल्ह्यासाठी काय केले आहे, तीन दशकामध्ये खासदारांनी कोणती केंद्रीय योजना जिल्ह्यासाठी आणली आहे? ताळगुप्पा-सिध्दापूर रेल्वे सुरू झाली का? अरण्यभूमी अतिक्रमण समस्येचे निवारण झाले का? असे प्रश्न उपस्थित करून सीबर्ड प्रकल्प, कैगा अणुऊर्जा प्रकल्प, कोकण रेल्वे सारख्या योजना काँग्रेस सरकारच्या कालावधीत राबविण्यात आल्या. यावेळी जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, शिरसीचे आमदार भीमण्णा नाईक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साई गावकर, काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी गेल्या तीन दशकांपासून जिल्ह्यात ठप्प झालेल्या विकासकार्यांना चालना देण्यासाठी काँग्रेस उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन केले.
16 रोजी अर्ज भरणार
कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर या 16 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत असे सांगण्यात आले.