चीनला भूकंपाचा हादरा, 118 ठार
गान्सू आणि क्विंघाई प्रातांमध्ये सर्वाधिक हानी
वृत्तसंस्था / बीजिंग
चीनमधील गान्सू आणि क्विंघाई या प्रांताना भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपात आतापर्यंत 118 लोकांचा मृत्यू झाला असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे ही दुर्घटना घडली. रिष्टर परिमाणावर या भूकंपाची तीव्रता 6.2 असल्याचे चीनने स्पष्ट केले आहे. तर अमेरिकेच्या नोंदीनुसार ही तीव्रता 5.9 इतकी आहे.
या भूकंपाचे केंद्र गान्सू प्रांतापासून काही अंतरावर भूमीमध्ये 10 किलोमीटर खोल होते. या भूकंपामुळे या दोन प्रांतामध्ये अनेक इमारती आणि घरे कोसळली असून मार्गांचीही मोठी हानी झाल्याचे वृत्त आहे. या भूकंपाचे पडसाद 100 किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात जाणवले. सर्वाधिक हानी गान्सू प्रांताच्या जिशिशान या शहरात झाल्याची माहिती या प्रांताच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली. भूकंपाच्या धक्क्याने झाडे आणि विजेचे खांबही धाराशायी झाले आहेत.
साहाय्यता कार्यास प्रारंभ
पहाटेच्या वेळी भूकंप झाल्याने जीवितहानी अधिक प्रमाणात झाली. भूकंपाच्या प्रभाव क्षेत्रातील बहुतेक लोक त्यावेळी झोपेत होते. त्यामुळे अनेकांना त्वरित उठून घराबाहेर पडता आले नाही. परिणामी मृतांची संख्या वाढली. कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अद्यापही दबलेले असल्याची शक्यता आहे. घटना घडल्यानंतर त्वरित साहाय्यता पथके तेथे पोहचली. त्यांनी काम सुरु केले. इमारतींचे ढिगारे हलवून आत अडकलेल्या माणसांना बाहेर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रांतीक प्रशासनाकडून बेघर झालेल्या लोकांना जीवनावश्यक वस्तू, कांबळी, कपडे आणि पाणी पुरविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
4.000 लोकांचे साहाय्यता दल
दोन्ही प्रांतांमधून साहाय्यता कार्यासाठी 4 हजारांहून अधिक कर्मचारी पाठवण्यात आले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयांमध्ये, तर गंभीर जखमींवर मोठ्या शहरांमधील रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. अन्य प्रांतांमधूनही साहाय्याचा ओघ सुरु झाला आहे. मुलांना आणि महिलांना विशेष साहाय्य करण्यात येत आहे. मार्ग आणि वीजप्रवाह सुरळीत करण्याचा प्रयत्न होत आहे.
कडाक्याच्या थंडीमुळे अडथळा
साहाय्यता कार्यात कडाक्याच्या थंडीमुळे बाधा येत आहे. हिवाळा सुरु असल्याने तापमान काही ठिकाणी उणे 9 डिग्री सेल्शियस इतके घसरले आहे. याचा परिणाम काही साहाय्यता कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीवरही होत आहे. अनेक भागांमध्ये वीजपुरवठा बंद झाल्याने रुग्णालयांच्या क्षमतेवर परिणाम होत आहे, अशी माहिती देण्यात आली. स्थानिक नागरिकही साहाय्यता कार्यात सहभागी होत आहेत. चीनच्या केंद्र सरकारकडूनही या दुर्घटनेची दखल घेण्यात आली असून साहाय्यता पाठविण्यात आली आहे. राजधानी बीजिंगमधून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
पूर्वीच्या आठवणी ताज्या
2008 मध्ये चीनच्या सिचूआन प्रांतात 7.9 रिष्टर क्षमतेचा भूकंप झाला होता. त्यात 90,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तो चीमधील या शतकातील सर्वात मोठा भूकंप मानला जात आहे. सोमवारी पहाटे झालेल्या भूकंपामुळे त्या भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्याची प्रतिक्रिया नागरिक करीत आहेत. भूकंपग्रस्त असणाऱ्या दोन प्रांतातील शाळाही बंद करण्यात आल्या. गेल्या वर्षी सप्टेंबर महित्यात चीनमधील याच सिचूआन प्रांतात झालेल्या भूकंपात 78 लोक ठार झाले होते. त्यावेळी कोरोनाकालीन लॉकडाऊनमुळे या प्रांतात संचारबंदी लादण्यात आली होती. चीनच्या पश्चिमेकडील प्रांतांमध्ये असे भूकंप होणे नित्याची बाब असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे तेथे साहाय्यता दले नेहमीच सज्ज अवस्थेत असतात. त्यांच्या तत्परतेमुळे जीवितहानी कमी झाली आहे.
Home महत्वाची बातमी चीनला भूकंपाचा हादरा, 118 ठार
चीनला भूकंपाचा हादरा, 118 ठार
गान्सू आणि क्विंघाई प्रातांमध्ये सर्वाधिक हानी वृत्तसंस्था / बीजिंग चीनमधील गान्सू आणि क्विंघाई या प्रांताना भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपात आतापर्यंत 118 लोकांचा मृत्यू झाला असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे ही दुर्घटना घडली. रिष्टर परिमाणावर या भूकंपाची तीव्रता 6.2 असल्याचे चीनने […]