आरोंदा -रेडी मार्गावर धुळीचे साम्राज्य

आसपासची घरेही धुळीने माखली : वाहनचालकांच्या नाका -तोंडात खडीची भुकटी वार्ताहर आरोंदा आरोंदा रेडी राज्यमार्गावर केवळ खडी घालून ठेवल्यामुळे सर्वत्र धूळ आणि भुकटीचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच अवजड, व खनिज वाहतूक होत असल्यामुळे लोक हैराण झाले आहेत. सदर खडीकरणावर त्वरित हॉटमिक्सिंग कार्पेट घालावे अशी मागणी आरोंदावासियांमधून होत आहे. अनेक वर्षानंतर सरकारने दुरुस्ती सुरू केली आहे. […]

आरोंदा -रेडी मार्गावर धुळीचे साम्राज्य

आसपासची घरेही धुळीने माखली : वाहनचालकांच्या नाका -तोंडात खडीची भुकटी
वार्ताहर
आरोंदा
आरोंदा रेडी राज्यमार्गावर केवळ खडी घालून ठेवल्यामुळे सर्वत्र धूळ आणि भुकटीचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच अवजड, व खनिज वाहतूक होत असल्यामुळे लोक हैराण झाले आहेत. सदर खडीकरणावर त्वरित हॉटमिक्सिंग कार्पेट घालावे अशी मागणी आरोंदावासियांमधून होत आहे.
अनेक वर्षानंतर सरकारने दुरुस्ती सुरू केली आहे. या रस्त्यावर सध्या केवळ खडी घालून ठेवली आहे. त्यामुळे या खडीतील धूली कण व त्यातील सिमेंट भुकटी वाऱ्याने उडून वाहनचालकांसह प्रवाशांना याचा मोठा त्रास होत आहे. रस्त्यातून ये जा करताना ही भुकटी नाकातोंडात, डोळ्यात जाते. याचा श्वसनात त्रास होऊन आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका आहे.
त्याचप्रमाणे या मार्गाच्या आसपास असलेल्या घरांमध्ये धूळ भुकटी जाते. त्यामुळे स्वयंपाक घरातसुद्धा जाऊन भांड्यांवर बसते. यामुळे आरोंदा – रेडी मार्गावरील आसपास परिसरातील वस्तीलाही या अर्धवट ठेवलेल्या रस्त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने धोका निर्माण झाला आहे.या मार्गावरून रेडी जेटीवर डंपरने लोह खनिजची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. दिवसाला हजारो डंपरने या मार्गावरून जातात. अशावेळी या रस्त्यावर घातलेल्या खडीतील धूळ भुकटी मोठ्या प्रमाणात उडते व मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. यामुळे छोटे वाहनधारक, स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. यासाठी या सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने दखल घेऊन खडीकरणवर ताबडतोब हॉटमिक्सिंग कार्पेट घालावे,अशी मागणी नागरिकांतून होत आहे. आरोंदा ग्रामपंचायतीचेही स्थानिकांनी याबाबत लक्ष वेधले आहे. पंचायतीने संबधित विभागाशी पत्रव्यवहार करून सदर रस्ता त्वरित हॉटमिक्सिंग करण्यासाठी आग्रह धरावा अशी मागणी होत आहे.