दूधगंगेने ओलांडली इशारा पातळी

प्रमुख धरणांतून विसर्ग वाढला : आलमट्टीतून तीन लाख क्युसेकने विसर्ग : एकसंबा दानवाड पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद वार्ताहर /एकसंबा पाणीपातळी जसजशी वाढत आहे तशी पूरस्थिती आणखी घट्ट होत चालली आहे. महाराष्ट्रातील कोयना, वारणा, राधानगरी या प्रमुख धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी वाढत्या पाणीपातळीमुळे दूधगंगा नदी इशारा पातळी ओलांडली असून एकसंबा-दानवाड […]

दूधगंगेने ओलांडली इशारा पातळी

प्रमुख धरणांतून विसर्ग वाढला : आलमट्टीतून तीन लाख क्युसेकने विसर्ग : एकसंबा दानवाड पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद
वार्ताहर /एकसंबा
पाणीपातळी जसजशी वाढत आहे तशी पूरस्थिती आणखी घट्ट होत चालली आहे. महाराष्ट्रातील कोयना, वारणा, राधानगरी या प्रमुख धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी वाढत्या पाणीपातळीमुळे दूधगंगा नदी इशारा पातळी ओलांडली असून एकसंबा-दानवाड दरम्यानच्या पुलावर पाणी आल्याने आंतरराज्य वाहतूक बंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच असल्याने कृष्णा, दूधगंगा नद्यांचे पात्र विस्तारत आहे. यामुळे नदीकाठी असणाऱ्या लोकवस्तीत हळुवार पुराचे पाणी शिरत आहे. वाढत्या पाणीपातळीवर प्रशासन लक्ष ठेऊन असून पूरस्थिती संदर्भात प्रशासन सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
दूधगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याच्या उंबरठ्यावर होती. अखेर गुरुवारी सकाळी 536 मीटर असणारी इशारा पातळी ओलांडून 536.030 मीटर इतकी झाली होती. 0.27 मीटर इतकी पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर कृष्णा नदीची इशारा पातळी 535 मीटर असून गुरुवारची पाणीपातळी 534.41 मीटर इतकी होती. कृष्णा नदी इशारा पातळी ओलांडण्यासाठी 0.59 मीटर पाणी कमी आहे. दरम्यान, दूधगंगा नदीच्या पाण्याचा विस्तार वाढत असून सद्या एकसंबा-दानवाड, व सदलगा-बोरगाव हे प्रमुख मार्ग बंद आहेत. सदलगा पुलावर पाणी आले नसले तरी बोरगाव मार्गावरील लक्ष्मी मंदिर परिसरातील रस्त्यावर पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात आहे.
गुरुवारी राजापूर बंधाऱ्याद्वारे 1 लाख 53 हजार 542 क्युसेक, दूधगंगा नदीतून 35 हजार 200 क्युसेक अशी एकूण 1 लाख 88 हजार 742 क्युसेक पाण्याची प्रती सेकंद कल्लोळ कृष्णा नदीपात्रात आवक व जावक आहे. पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर कायम असून आणखी पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. आलमट्टी धरणाचा 2 लाख 50 हजार क्युसेक असणार विसर्ग दुपारी 2 वाजेपर्यंत वाढवून 2,75,000 क्युसेक करण्यात आला होता. पण आलमट्टी धरणात 2.5 लाख क्युसेक पाण्याची आवक होत असून संध्याकाळी 5 वाजता धरणातून 3 लाख क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविला आहे.
नदाकाठावरील 11 गावांना अतिदक्ष राहण्याच्या सूचना
पाणलोट क्षेत्रातील सर्वच धरणे 75 टक्क्यांहून अधिक भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने कोयना धरणातून 11 हजार 50 क्युसेक, वारणा धरणातून 8 हजार 886 क्युसेक तर राधानगरी धरणातून 7 हजार 112 क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. परिणामी कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा व दूधगंगा नदीच्या काठावरील 11 गावांना सद्यस्थितीत तरी अतिदक्ष राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
गोकाक, मुडलगी तालुक्यातील शाळांना आज सुटी
जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. सर्वत्र पूर येण्याची शक्यता दिसून आल्याने गोकाक, मुडलगी, रायबाग व हुक्केरी तालुक्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक आणि प्रौढ शाळांना दि. 26 जुलै रोजी सुटी देण्यात आल्याचा आदेश प्रशासनाने बजावला आहे.