Kolhapur Breaking : चेतन नरके कोल्हापूरातूनच उतरणार मैदानात! हातकणंगलेतून निवडणूक लढविण्यास नरके तयार नसल्याचे स्पष्ट

मविआकडून हातकणंगलेतून माजी आमदार सत्यजीत पाटील यांचे नाव आघाडीवर; दोन दिवसांत ‘मविआ’कडून उमेदवारीची अधिकृत घोषणा शक्य कृष्णात चौगले कोल्हापूर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून (शिवसेना उबाठा गट) निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेले गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा प्रस्ताव शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार संजय राऊत यांनी […]

Kolhapur Breaking : चेतन नरके कोल्हापूरातूनच उतरणार मैदानात! हातकणंगलेतून निवडणूक लढविण्यास नरके तयार नसल्याचे स्पष्ट

मविआकडून हातकणंगलेतून माजी आमदार सत्यजीत पाटील यांचे नाव आघाडीवर; दोन दिवसांत ‘मविआ’कडून उमेदवारीची अधिकृत घोषणा शक्य

कृष्णात चौगले कोल्हापूर

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून (शिवसेना उबाठा गट) निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेले गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा प्रस्ताव शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार संजय राऊत यांनी ठेवला आहे. पण या प्रस्तावाला नरके यांनी होकार दिला नसून ते कोल्हापूरातूनच निवडणूक लढविणार असल्याचे समजते. गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून नरके यांचा हातकणंगले मतदारसंघातही संपर्क असला तरी त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात गेल्या अडीच वर्षांपासून निवडणुकीची तयारी केली आहे. त्यामुळे नरके यांनी कोल्हापूरातूनच निवडणूक लढविण्याचे जवळपास निश्चित केले आहे. दरम्यान हातकणंगले मतदारसंघातून ‘मविआ’च्या उमेदवारीसाठी माजी आमदार सत्यजित पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.
हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे महाविकास आघाडीसोबत येतील अशी नेत्यांची धारणा होती. पण शेट्टी यांनी आघाडीसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला असून त्यांनी महाविकस आघाडी सत्तेवर असताना घेतलेल्या शेतकरीविरोधी धोरणांबाबत जोरदार टिका सुरु केली आहे. आघाडीतील अन्य घटक पक्षांऐवजी केवळ शिवसेनेचा पाठींबा मिळवण्यासाठी शेट्टी यांनी मातोश्रीवर फेऱ्या मारल्या असल्या तरी केवळ शिवसेनेचा पाठींबा देणे शक्य नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हातकणंगलेतून आता ‘मविआ’चा उमेदवार देण्यासाठी जोरबैठका सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे मातोश्रीवर उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व संजय राऊत आदींच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत चेतन नरके यांनी शिवसेनेच्या मशाल चिन्हावर हातकणंगलेतून निवडणूक लढवावी असा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यासाठी आवश्यक असलेले सर्वतोपरी सहकार्य ‘मविआ’तील सर्व घटक पक्षांकडून केले जाईल असेही नरके यांना सांगितले असल्याचे समजते.
नेत्यांकडून प्रस्ताव, पण नरके यांच्याकडून दुजोरा नाही
महाविकास आघाडीची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला अर्थात श्रीमंत शाहू छत्रपती यांना देण्याचे निश्चित झाल्यापासूनच चेतन नरके यांच्यापुढे हातकणंगलेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानुसार नरके यांनी हातकणंगले मतदारसंघात दौरा करून तेथून निवडणूक लढविणे सायीचे ठरणार की नाही याचा अंदाजही घेतला आहे. यामध्ये हातकणंगलेतून निवडणूक लढविणे गैरसोयीचे होणार असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास ते इच्छूक नसल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी पुन्हा कोल्हापूर मतदारसंघात संपर्कदौरा गतीमान केला आहे.
कोल्हापूरातूनच लोकसभेच्या मैदानात
डॉ. चेतन नरके यांनी कोल्हापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीकोनातून गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून मतदारसंघाचे संपर्कदौरे सुरु ठेवले आहे. गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. युवा वर्गाला करीअर संदर्भात त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शनही केले आहे. त्यामुळेच कोल्हापूरातून निवडणूक लढविण्यावर त्यांनी जवळपास शिक्कामोर्तब केले आहे.
तर कोल्हापूरात चौरंगी
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मविआकडून श्रीमंत शाहू छत्रपती, महायुतीकडून संजय मंडलिक, तर चेतन नरके आणि बाजीराव खाडे हे अपक्ष उमेवार म्हणून निडविणार आहेत.
माजी आमदार सत्यजीत पाटील यांचे नाव आघाडीवर
‘मविआ’कडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार सत्यजीत पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. पाटील यांचा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात मोठा संपर्क आहे. तर शिराळा आणि वाळवा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून त्यांना ताकद दिली जाईल. हातकणंगलेतून माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि आमदार राजूबाबा आवळे यांचे पाठबळ मिळेल. तर शिरोळ आणि इचलकरंजीतून काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेची एकत्रित ताकद त्यांना मिळू शकते. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
हातकणंगलेबाबत ‘वंचित’सोबतही चर्चा सुरू
वंचित बहूजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येण्यास तयार झाल्यास हातकणंगलेची जागा ‘वंचित’ला देण्याबाबतही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरु असल्याचे समजते.  त्याबाबत दोन दिवसांमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे.