माता, माती, मातृभाषेचे ऋण विसरू नका!

उचगाव येथील 22 व्या मराठी साहित्य संमेलनात लक्ष्मणराव महाडिक यांचे प्रतिपादन वार्ताहर /उचगाव आपली मराठी भाषा ही ज्ञानभाषा आहे. जगात जे जे उच्चशिक्षित आहेत, उच्च पदावर आहेत, त्यांनी बहुतांशी प्रमाणात मातृभाषेतूनच शिक्षण घेतले आहे. मातृभाषा ही महत्त्वाची आहे. मातृभाषा जगण्याचं ज्ञान देते. आदर्श नागरिक घडविण्याचा कार्य करते. अभिव्यक्त होण्यासाठी मातृभाषा महत्त्वाची ठरते. आपल्या मातृभाषेमुळे आत्मविश्वास […]

माता, माती, मातृभाषेचे ऋण विसरू नका!

उचगाव येथील 22 व्या मराठी साहित्य संमेलनात लक्ष्मणराव महाडिक यांचे प्रतिपादन
वार्ताहर /उचगाव
आपली मराठी भाषा ही ज्ञानभाषा आहे. जगात जे जे उच्चशिक्षित आहेत, उच्च पदावर आहेत, त्यांनी बहुतांशी प्रमाणात मातृभाषेतूनच शिक्षण घेतले आहे. मातृभाषा ही महत्त्वाची आहे. मातृभाषा जगण्याचं ज्ञान देते. आदर्श नागरिक घडविण्याचा कार्य करते. अभिव्यक्त होण्यासाठी मातृभाषा महत्त्वाची ठरते. आपल्या मातृभाषेमुळे आत्मविश्वास वाढतो. मातृभाषेचे मानवी जीवनामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळेच आनंदाने जगण्याचे बळ केवळ मातृभाषेमुळेच मिळते. सीमाभागात असणारी मराठी भाषा फार समृद्ध आहे. मातृभाषा ही माणसाला समृद्ध करते. त्यामुळेच माता, माती आणि मातृभाषा यांचे ऋण कधीही विसरू नका, असे प्रतिपादन उचगाव येथील 22 व्या मराठी साहित्य संमेलनात साहित्यिक लक्ष्मणराव महाडिक यांनी केले. उचगाव येथील मळेकरणी देवीच्या आमराईच्या आवारात 22 व्या मराठी साहित्य संमेलनात ते संमेलनाध्यक्ष या नात्याने बोलत होते. ते पुढे म्हणाले आपली मातृभाषा ही विकासाचे प्रतीक असते. मातृभाषा ही श्वासाप्रमाणे आहे. तिचे स्थान महत्त्वाचे आहे. भाषा ही संदेश, विचारविनिमय करणारी सामाजिक संस्था आहे.
भाषा आणि लिपीचा शोध ही जगातील सर्वात मोठी क्रांती आहे. साहित्यिकांच्या लेखणीमध्ये फार मोठे सामर्थ्य आहे. शब्दांचा पुन्हा पुन्हा पुनरुचार झाला तर त्यामध्ये बदलण्याचे सामर्थ्य असते. समाजामध्ये विविध विचारांची माणसे असतात. या विविध विचारांच्या माणसांमध्ये बंधुता, समता निर्माण करण्याची कार्य हे साहित्य करते. त्यामुळे स्थानिकांनी प्रथम मातृभाषेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. असेही महाडिक म्हणाले. वादळ येतील, जातील. मात्र झाडांनी मुळांवर विश्वास ठेवला पाहिजे. त्याप्रमाणे आपली मातृभाषा हीच आपल्या विकासासाठी प्रगतीची ज्ञानभाषा आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मातृभाषेचा जागर आणि प्रसार होणे गरजेचे आहे. मातृभाषेबरोबरच इतर भाषांचा समूह आपल्याजवळ असला पाहिजे. भाषा ही डोळस असते. शरीराला जसे विविध प्रकारचे प्रोटीन व्हिटॅमिन आवश्यक असतात, अशा पद्धतीनेच मातृभाषेबरोबरच अन्य भाषांचे ज्ञान असणेही आवश्यक आहे. आपण सीमाभागात राहता तुमच्या एका बाजूला कोकणी, दुसऱ्या बाजूला मराठी, अन्य बाजूला कानडी अशा भाषा बोलल्या जातात. इतर भाषांचाही प्रत्येकाने आदर केला पाहिजे, असे ते म्हणाले.
बेळगाव साहित्यिकांची नगरी
बेळगाव अनेक लेखक, कवी साहित्यिकांची नगरी आहे. ही भूमी परिवर्तनाची ,बदलाची आहे असेही त्यांनी सांगितले. शिक्षण, सहकार, उद्योग या क्षेत्रात  सीमाभागातील माणसाने स्वत:ला वाहून घेतलेली आहे. ही शेतकरी, संतांची भूमी आहे. मराठी मातीची सुपीकता संतांच्या अक्षर वाड.मयाने मळलेली आहे. या संत साहित्याच्या वाटेवरील तुम्ही वाटकरी आहात याची जाण ठेवा. माणसाने बुद्धीच्या बळावर भाषेचा शोध लावला भाषा लिखित स्वरूपात आणली. या मराठी ज्ञान भाषेचा यज्ञ तुम्ही गेल्या 22 वर्षापासून या नगरीमध्ये करत आहात याबद्दल ग्रामीण भागातील या जनतेचे अभिनंदन लक्ष्मणराव महाडिक यांनी केले.
साहित्य महत्त्वाचा दुवा
एका सीमाभागातील साहित्यिक दुसऱ्या सीमाभागात येतो त्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे साहित्य आहे. साहित्याच्या माध्यमातून वैचारिक मेजवानी देण्याचा हा प्रयत्न असतो. जीवनात कर्म हे साऱ्यांनी केलेच पाहिजे आणि माणसाचा माणुसकी हा धर्म हा निभावला पाहिजे. त्यामुळे सज्जनांनी अन्यायाच्या विरोधात बोलले पाहिजे. कारण सज्जन बोलायचे थांबतात तेव्हा दुर्जनांना वाव मिळतो, असेही लक्ष्मणराव महाडिक म्हणाले.  आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी शेतकरी, महिला व तरुण यांवर आधारित विविध कविता सादर करून सामाजिक संदेश दिला.