डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सभेत गोळीबार, ट्रम्प सुरक्षित

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत गोळीबाराची घटना घडली आहे. पेन्सिल्वेनिया राज्यातील बटलर शहरात डोनाल्ड ट्रम्प एका प्रचारसभेत भाषण करत असताना अचानक गोळीबाराचा आवाज झाला, ट्रम्प गोळीबारानंतर …

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सभेत गोळीबार, ट्रम्प सुरक्षित

– गॅरी ओ’डोनोघ्यू, बर्ंड डेबसमन आणि मॅट मर्फी

बीबीसी न्यूज बटलर (पेनसिल्व्हेनिया) आणि लंडनमधून

 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत गोळीबाराची घटना घडली आहे.

 

पेन्सिल्वेनिया राज्यातील बटलर शहरात डोनाल्ड ट्रम्प एका प्रचारसभेत भाषण करत असताना अचानक गोळीबाराचा आवाज झाला, ट्रम्प गोळीबारानंतर कानाला हात लावत खाली झुकताना दिसले आणि नंतरच काही क्षणातच सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी त्यांना स्टेजवरून खाली उतरवत, घटनास्थळापासून दूर नेलं.

 

हल्लेखोराला सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी ठार केलं असून, डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत.

 

डोनाल्ड ट्रम्प यांना स्टेजवरून खाली उतरवलं जात असताना ते उपस्थित लोकांकडे बघून अभिवादन करताना दिसून आले. सध्या डोनाल्ड ट्रम्प हे सुरक्षित असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या प्रचार यंत्रणेतील लोकांनी दिली आहे.

 

या सभेत उपस्थित असलेल्या लोकांनी बीबीसीला सांगितलं की सभास्थळापासून जवळ असणाऱ्या एका इमारतीवर एका माणसाला रायफल घेऊन रांगत असताना त्यांनी पाहिलं होतं.

 

या घटनेनंतर जो व्हिडिओ समोर आला त्यात असं दिसत आहे की गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर ट्रम्प खाली झुकले आणि ते पुन्हा उभे राहिले तेव्हा त्यांच्या गालावर रक्त दिसून येत होतं.

 

ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेचे प्रवक्ते स्टीव्हन च्युंग म्हणाले की, “अध्यक्ष ट्रम्प यांनी या हल्ल्यांनंतर तात्काळ कारवाई करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणेचे आभार मानले.”

 

पोलीस यंत्रणेतील सूत्रांनी बीबीसीचे अमेरिकेतील भागीदार असणाऱ्या सीबीएस न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, संशयित हल्लेखोराला सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून ठार केलं आहे. या सूत्रांनी हेही सांगितलं की संशयित पुरुष हल्लेखोर हा रायफल घेऊन आला होता आणि त्याने मी मंचापासून काहीशे मीटर दूर असलेल्या एका उंच जागेवरून गोळीबार केला.

 

सिक्रेट सर्व्हिसने दिलेल्या निवेदनात असं सांगितलं आहे की डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.

 

ते पुढे म्हणाले की आता या घटनेचा तपास सुरू असून जी माहिती मिळेल ती लवकरच सांगितली जाईल.

 

यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत. याच निवडणुकीच्या प्रचारासाठी डोनाल्ड ट्रम्प हे पेन्सिल्वेनिया राज्यातील बटलर शहरात भाषण करत होते. पेन्सिल्वेनिया हे अमेरिकेतील महत्त्वाचं स्विंग स्टेट (राजकीय दृष्ट्या स्पष्ट नसलेलं) राज्य आहे.

 

या सभेत ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केल्यानंतर काही वेळाने गोळीबाराचा आवाज ऐकू आला. अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या प्रशासनाबाबत बोलत असताना अचानक गोळीबार झाला, आणि एकापाठोपाठ एक गोळ्या झाडल्याचे आवाज आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागे उभे असलेले समर्थक दचकून खाली झुकताना दिसून आले.

 

त्याच्या हातात रायफल होती, आम्ही त्याला स्पष्टपणे रायफलसोबत बघितलं होतं.

 

त्याच्या हातात रायफल होती, आम्ही त्याला स्पष्टपणे बघितलं होतं

डोनाल्ड ट्रम्प ज्या ठिकाणाहून बोलत होते तिथून काही अंतरावर असणाऱ्या एकमजली इमारतीवरून गोळीबार झाला असावा असा अंदाज, उपस्थित लोकांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केला.

 

प्रत्यक्षदर्शींपैकी एक असलेल्या ग्रेग नावाच्या व्यक्तीने बीबीसीला सांगितलं की, “ट्रम्प यांचं भाषण सुरू होण्याच्या पाचच मिनिटांपूर्वी मी त्या इमारतीवर एका व्यक्तीला रायफल घेऊन रांगत असताना बघितलं होतं.”

 

ग्रेग हेही म्हणाले की संशयित व्यक्तीची माहिती त्यांनी लगेच तिथे असलेल्या पोलिसांना दिली होती.

 

“त्याच्याकडे रायफल होती आणि आम्ही त्याला स्पष्टपणे बघू शकत होतो. आम्ही त्याच्याकडे बोट दाखवत होतो आणि पोलीस इकडे तिकडे जमिनीवर धावत होते. आम्ही पोलिसांना सांगत होतो की तिकडे एका छतावर रायफल घेऊन एक माणूस आलेला आहे. पण पोलिसांना नेमकं काय सुरू आहे तेच कळत नव्हतं.”

 

आणखी एक साक्षीदार जेसन यांनी बीबीसीला गोळीबाराची माहिती दिली.

 

पहिल्या गोळीचा आवाज आल्यानंतर लागोपाठ पाच वेळा गोळ्या झाडल्याचा आवाज आल्याचं जेसन म्हणाले.

 

जेसन म्हणाले की, “गोळीबारानंतर आम्ही बघितलं की सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्यावर उडी घेतली, त्यांना सुरक्षित केलं आणि गर्दीतला प्रत्येकजण लगेचच खाली झुकला.”

 

“त्यानंतर लगेचच ट्रम्प पुन्हा उभे राहिले, त्यांनी गर्दीकडे पाहून हात उंचावला, हवेत मूठ आवळली, ते काहीतरी बोलत होते.”

 

या सभेला उपस्थित असलेल्या टीम यांनी बीबीसीला सांगितलं की त्यांनीही एकापाठोपाठ एक गोळीबाराचा आवाज ऐकला. टीम म्हणाले की, “तिथल्या हायड्रॉलिक लाईनवर काहीतरी आदळलं असावं. त्यानंतर आम्ही ट्रम्प यांना खाली झुकताना पाहिला आणि सगळेच लोक खाली वाकू लागले, तिथे गोंधळ उडाला होता.”

 

राष्ट्राध्यक्ष जो बायडन काय म्हणाले?

या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यातर्फे एक लेखी निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

 

बायडन यांनी लिहिलं की, “डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत हे जाणून मला दिलासा मिळाला आहे. अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही. आपण देश म्हणून एकसंध राहायला हवे. या घटनेचा निषेध केला पाहिजे.”

 

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर अमेरिकेतील दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

 

माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले की “आमच्या लोकशाहीत राजकीय हिंसेला जागा नाही आणि माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना गंभीर दुखापत झाली नाही हे कळल्यावर दिलासा मिळाला.”

 

ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना उपाध्यक्ष राहिलेले माईक पेन्स म्हणाले की, “ते आणि त्यांची पत्नी त्यांचे माजी सहकारी राहिलेल्या ट्रम्प यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत या प्रार्थनेत प्रत्येक अमेरिकन नागरिकाला सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं.”

 

अमेरिकेतील संसदेचे अल्पसंख्याक नेते हकीम जेफ्रीज यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “माझ्या प्रार्थना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत आहेत. हल्ल्यानंतर तात्काळ कारवाई करणाऱ्या अधिकारी आणि पोलिसांचा मी आभारी आहे. अमेरिका ही लोकशाही आहे. कोणत्याही प्रकारची राजकीय हिंसा इथे कधीही स्वीकारार्ह नाही.”

 

गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिस या सुरक्षा संस्थेकडून ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत एक निवदेन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

 

यात त्यांनी असं सांगितलं आहे की, “या हल्ल्यात प्रेक्षकांपैकी एकाचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी आहेत. 13 जुलै रोजी संध्याकाळी अंदाजे 6:15 वाजता(अमेरिकन वेळ), एका संशयित शूटरने सभेच्या ठिकाणाच्या बाहेर असलेल्या एका उंच जागेवरून मंचाच्या दिशेने अनेक गोळ्या झाडल्या. या घटनेची सध्या चौकशी सुरू आहे. आणि सीक्रेट सर्व्हिसने एफबीआयला सूचित केलं आहे.”

 

बीबीसीचे अमेरिकेतील भागीदार सीबीएस न्यूजला सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताने 200 फूट ते 300 फूट अंतरावरून एआर-शैलीतील रायफलने ट्रम्प यांच्या दिशेने गोळीबार केला.

 

ट्रम्प सोमवारी मिलवॉकी येथील अधिवेशनात अध्यक्षपदासाठी त्यांच्या पक्षाचे नामांकन स्वीकारणार होते. काहींनी असा अंदाज लावला होता की बटलरच्या सभेत ते मोठी घोषणा करतील.

 

डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यामध्ये 2020 च्या निवडणुकीसारखाच चुरशीचा सामना पाहायला मिळतो आहे.

 

माझ्या मित्रावर झालेला हल्ला चिंताजनक – नरेंद्र मोदी

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून.

 

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत मोदींनी हा हल्ल्याबाबतची चिंता व्यक्त केली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलं की, “माझे प्रिय मित्र, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेला चिंताजनक आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. ते लवकरात लवकर बरे व्हावेत. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबासोब, जखमींसोबत आणि प्रत्येक अमेरिकन नागरिकांसोबत आमच्या प्रार्थना आहेत.”

 

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

 

राहुल गांधी यांनी लिहिलं की, “अशा हल्ल्यांचा तीव्र निषेध झाला पाहिजे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हत्येच्या प्रयत्नामुळे मी चिंतेत आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी सदिच्छा.”

Go to Source