प्राण्यांमध्ये जाणिवा असतात का, त्यांना ही भाव-भावना असतात का?
उत्क्रांतीच्या सिद्धांतामुळे चार्ल्स डार्विनला वैज्ञानिकांमध्ये एखाद्या देवतेसारखं स्थान मिळालं आहे.
मात्र मानवाप्रमाणेच प्राण्यांदेखील जाणिवा असतात या डार्विनने मांडलेल्या संकल्पनेला प्रदीर्घ काळ नाकारण्यात आलं होतं.
पण यापुढे नाही, कारण वैज्ञानिकांनी जे संशोधन केलं आहे त्यावरुन डार्विनने मांडलेल्या सिद्धांताला दुजोरा मिळतो.
यासंदर्भात डार्विननं लिहून ठेवलं आहे की, “सुख आणि वेदना, आनंद आणि दु:ख या गोष्टी अनुभवण्याच्या मनुष्य आणि प्राणी यांच्या क्षमतेत कोणताही मूलभूत फरक नाही.”
डार्विनला विज्ञान विश्वात खूप वरचं स्थान असलं तरी डार्विनने मांडलेल्या सर्वच संकल्पनांना वैज्ञानिकांनी काही सहज मान्य केलं नव्हतं.
प्राणी विचार करतात आणि ते अनुभव घेऊ शकतात, ही संकल्पना डार्विनने मांडली होती पण त्याची पाठराखण मात्र कुणीच केली नव्हती. उलट डार्विनची संकल्पना विरोधाभासी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
प्राणी जो प्रतिसाद देतात त्या आधारावर त्यांच्यामध्ये जाणिवा असतात असं मानणे देखील पाप समजले जायचे. यासंदर्भात बरेच युक्तिवाद झाले.
मानवामध्ये जे गुण, भावना असतात, मानवाचं जे वर्तन असतं तसंच ते प्राण्यांमध्येदेखील असतं असं मानण्यास कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं म्हटलं गेलं. इतकंच नाही तर प्राण्यांच्या मनात काय चालतं हे तपासण्याचा कोणताही मार्ग नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
मात्र आता प्राण्यांमध्ये भावना असतात आणि आजूबाजूला काय चाललं आहे यासंदर्भात प्रक्रिया करण्याच्या त्यांच्या क्षमतेचे नवीन पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे याचा अर्थ प्राण्यांमध्ये जाणिवा किंवा देहभान असते असा होऊ शकतो का?
आता आपल्याला माहिती आहे आहे की मधमाशांकडे मोजण्याचे कौशल्य असते. त्या मानवी चेहरे ओळखू शकतात आणि वस्तूंचा वापर करण्याचे कौशल्यंही त्यांच्याकडे असते.
लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठातील प्राध्यापक लार्स चिटका यांनी मधमाशांच्या बुद्धिमत्तेशी संबंधित संशोधन केले आहे.
यावर त्याचं मतं असं आहे की “जर मधमाशा खरंच इतक्या बुद्धिमान असतील, तर त्या कदाचित विचार करू शकतात आणि त्यांना भावना असू शकतात. याच गोष्टी जाणीव निर्माण करणाऱ्या मुख्य घटक मानल्या जातात.”
प्राध्यापक चिटका यांच्या प्रयोगातून असं दिसून आलं की एखाद्या अत्यंत क्लेशदायक घटनेनंतर मधमाशांच्या वर्तनात बदल घडतात. मधमाशा छोटी लाकडी गोळी फिरवून खेळू शकतात. त्यांच्या मते आनंद लुटण्याचा भाग म्हणून मधमाशा या प्रकारची कृती करत होत्या.
या निष्कर्षांमुळे प्राणीशास्त्रात नावाजलेल्या संशोधकांनी एक मोठं विधान केलं आहे.
“सध्या समोर असलेले पुरावे पाहता मधमाशांना देहभान असण्याची दाट शक्यता आहे,” असं ते म्हणाले.
हे फक्त मधमाशांच्या बाबतीच नाही. अनेकांचं म्हणणं आहे की या गोष्टींबाबत आता पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे. नव्या पुराव्यांच्या उपलब्धतेमुळे प्राण्यांच्या जाणिवांबद्दलच्या विज्ञानासंदर्भात विचार करण्यामध्ये प्रचंड बदल घडला आहे.
यामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापक जोनाथन बर्च यांचा समावेश आहे.
“आमच्याकडील विविध क्षेत्रातील संशोधक प्राण्यांमधील जाणिवेबाबत प्रश्न विचारण्याचे धाडस करू लागले आहेत. त्याचं संशोधन त्या प्रश्नांशी कसं संबंधित असू शकतं याचा ते स्पष्टपणे विचार करत आहेत,” असं प्राध्यापक बर्च म्हणतात.
खूप मोठा शोध लागल्यावर जसं ‘युरेका’ म्हटलं जातं. तशी युरेका म्हणण्याची ही वेळ निश्चितच नाही खरं तर असा विचार करणाऱ्यांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत ज्या संकल्पना मानल्या जात होत्या त्यांना आव्हान देण्याइतपत पुरावे सातत्याने मिळत आहे. याबद्दल आता संशोधक दबक्या आवाजात बोलत आहेत आणि आता त्यांना या क्षेत्रातील वैज्ञानिक दृष्टीकोनात बदल हवा आहे.
जे काही शोधण्यात आलं आहे ते प्राण्यांमधील जाणिवेबाबतचा कदाचित निर्णायक पुरावा नसेल, मात्र एकत्रितपणे त्या सर्व पुराव्यांचा विचार केल्यास प्राण्यांमध्ये जाणीव असू शकते याची वास्तववादी शक्यता आहे हे सूचित करण्यात ते पुरेसे आहे, असं प्राध्यापक बर्च यांना वाटतं.
प्राण्यांमध्ये जाणिवा असतात की नाही आणि असल्यास किती प्रमाणात असतात यावर अधिक संशोधन करण्यासाठी निधी हवा असलेल्या एका संशोधक गटानुसार, ही बाब फक्त वानर आणि डॉल्फिन्स सारख्या विकासाच्या प्रगत टप्प्यावर पोहोचलेल्या वरच्या प्राण्यांनाच लागू होत नाही. तर साप, ऑक्टोपस, खेकडे, मधमाशा आणि अगदी फळांवरील माशांनादेखील ही बाब लागू होते.
मात्र जाणिवेचा अर्थ काय असतो याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही एकटे नाही. ही अशी बाब आहे ज्यावर वैज्ञानिकांचं देखील एकमत नाही.
17 व्या शतकात फ्रेंच तत्त्वज्ञ रेने डेकार्टस याने यासंदर्भात म्हटलं आहे की, “I think therefore I am.” (मी विचार करतो म्हणून मी आहे.)
त्याने पुढे म्हटलं आहे की, “आपल्या शरीरात दडलेल्या विचारांचे निश्चित प्रतीक म्हणजे आपली भाषा.”
मात्र या विधानांमुळे बराच काळ गोंधळ निर्माण झाला होता असं ससेक्स विद्यापीठातील प्राध्यापक अनिल सेठ यांना वाटतं. ते स्वत: त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीतील बराच काळ ‘जाणीव’ या शब्दाची व्याख्या करण्याचा प्रयत्न करत आहेत.
भाषा, बुद्धिमत्ता आणि जाणीव या तीन ‘अपवित्र त्रिमूर्ती’ डेकार्टसपर्यंत मागे जातात, असं त्यांनी बीबीसी सांगितलं. अगदी अलीकडेपर्यंत या दृष्टीकोनाबाबत प्रश्न विचारण्याचा अभाव असण्याबाबत त्यांना काहीशी चीड आहे.
या तीन ‘अपवित्र त्रिमूर्ती’ वर्तनवाद या चळवळीच्या केंद्रस्थानी आहेत. हा विचार 20 व्या शतकाच्या सुरूवातीला उदयाला आला. ही विचारपद्धती म्हणजे की विचार आणि भावना या वैज्ञानिक पद्धतींनी मोजल्या जाऊ शकत नाही आणि त्यामुळेच वर्तनाचं विश्लेषण करताना या पद्धतींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे.
अनेक प्राणी वर्तनतज्ज्ञ याच दृष्टीकोनातून तयार झाले होते. मात्र आता मानव-केंद्रीत दृष्टीकोनातून कमी विचार करण्यासाठी यातून मार्ग तयार होऊ लागला आहे, असं प्राध्यापक सेठ यांना वाटतं.
“आपण गोष्टींकडे मानवी दृष्टीकोनातून पाहत असल्यामुळे आपण जाणिवेला भाषा आणि बुद्धिमत्तेशी जोडतो. या बाबी आपल्या बाबतीत एकत्र असतात याचा अर्थ सर्वसाधारणपणे देखील त्या एकत्रच असतात असं नाही.”
“हे क्षेत्र ठाम नसलेल्या किंवा स्पष्ट अर्थ नसलेल्या शब्दांनी भरलेले आहे आणि दुर्दैवानं जाणीव हा त्यापैकीच एक शब्द आहे,” असं क्युबेक विद्यापीठाचे प्राध्यापक स्टीव्हन हर्नाड म्हणतात.
“हा असा शब्द आहे जो अनेक लोकांकडून आत्मविश्वासानं वापरला जातो. मात्र त्या प्रत्येकासाठी या शब्दाचा अर्थ काहीसा वेगळा असतो आणि त्यामुळे त्याचा अर्थ नक्की काय आहे हे अजिबात स्पष्ट नाही.”
ते म्हणतात, कमी गोंधळ असलेला एक चांगला शब्द म्हणजे वाक्य असतं. ज्याची भावना अनुभवण्याच्या क्षमतेच्या दृष्टीनं अधिक योग्यरित्या व्याख्या करण्याची क्षमता आहे.
“सर्व काही अनुभवण्यासाठी, एक चिमूटभर, लाल रंग पाहणं, थकवा आणि भूक लागणं, या सर्व गोष्टी तुम्हाला जाणवतात,” असं प्राध्यापक हर्नाड म्हणतात.
प्राण्यांना जाणिवा असल्याच्या कल्पनेबद्दल स्वाभाविकपणे साशंक असलेले इतर लोक म्हणतात की जाणीवा असणं म्हणजे काय या बाबीच्या नवीन व्यापक अर्थामुळे फरक पडतो.
ओरेगन राज्य विद्यापीठातील डॉ. मोनिक युडेल म्हणतात की त्या ‘वर्तनवादी’ पार्श्वभूमीतून आल्या आहेत.
“जर आपण वेगवेगळं वर्तन पाहिलं, उदाहरणार्थ कोणती प्रजाती स्वत:ला आरशात ओळखू शकतात, कोणती प्रजाती पुढील योजना आखू शकते किंवा कोणती प्रजाती भूतकाळात घडलेल्या गोष्टी लक्षात ठेवू शकते, तर आपण या प्रश्नांची प्रयोगाद्वारे आणि निरीक्षणाद्वारे चाचणी घेण्यास सक्षम आहोत. त्यातून आपण माहितीच्या आधारावर अचूक निष्कर्ष काढू शकतो,” असं युडेल म्हणतात.
“आणि आपण जर जाणिवेची व्याख्या मोजता येणाऱ्या वर्तनांची बेरीज म्हणून करणार असू तर या विशिष्ट कामांमध्ये यशस्वी झालेल्या प्राण्यांमध्ये आपण ज्याला जाणीव म्हणतो ती गोष्ट असल्याचं म्हटलं जाऊ शकतं.”
नवीन गट प्रचार करत असल्यापेक्षा ही जाणीवेची अधिक योग्य व्याख्या आहे. मात्र विज्ञान म्हणजे कल्पनांचा आदरयुक्त संघर्ष, असं डॉ. युडेल यांना वाटतं.
“मीठाच्या कणासारख्या अतिशय सूक्ष्म कल्पना मांडणारे आणि त्यावर बारकाईनं लक्ष देणारे लोक असणं महत्त्वाचं आहे. कारण आपण जर प्रश्नांपर्यत वेगवेगळ्या मार्गांनी पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही तर प्रगती करणं खूपच कठीण होईल.”
मात्र पुढे काय? काहीजण म्हणतात की प्राण्यांमध्ये जाणिवा असतात या शक्यतेसाठी सद्य परिस्थितीपेक्षा कितीतरी अधिक प्राण्यांचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.
“सध्या बहुतांश वैज्ञानिक प्रयोग मानवावर आणि माकडावर केले जातात. याद्वारे आपण हे काम आवश्यकतेपेक्षा अधिक अवघड करत आहोत. कारण असं केल्यानं आपण जाणिवेबद्दल त्याच्या मूलभूत स्वरूपात शिकत नाहीत,” असं टोरोंटोमधील यॉर्क विद्यापीठातील प्राण्यांच्या मनाबद्दलच्या तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक क्रिस्तिन अँड्रयूज म्हणतात.
प्राध्यापक अँड्रयूज आणि इतर अनेकांना वाटतं की मानव आणि माकडांवरील संशोधन हा उच्च स्तरावील जाणीवेचा किंवा चेतनेचा अभ्यास आहे.
या स्तरावर ती संवाद साधण्याच्या आणि गुंतागुंतीच्या भावना अनुभवण्याच्या क्षमतेतून व्यक्त केली जाते. त्याउलट ऑक्टोपस किंवा साप यांच्यामध्ये देखील प्राथमिक स्वरूपाची जाणीव असते जिचा अभ्यास न करता आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहोत.
वर्षाच्या सुरुवातीला काही संशोधकांनी एकत्र येऊन प्राण्यांच्या जाणिवासंदर्भात एक जाहीरनामा तयार केला. या जाहीरनाम्यावर आतापर्यंत 286 संशोधकांनी सह्या केल्या आहेत.
चार परिच्छेदांच्या या छोट्या जाहीरनाम्यात असं म्हटलं आहे की प्राण्यांमध्ये जाणीव असण्याच्या शक्यतेकडे दुर्लक्ष करणं हे ‘बेजाबदारपणाचं’ आहे.
“आपण संशोधनातून मिळणाऱ्या महत्त्वपूर्ण ज्ञानासाठी जोखमींचा देखील विचार केला पाहिजे आणि या जोखिमांसाठीच्या आपल्या प्रतिसादांची माहिती देताना पुरावे वापरले पाहिजे,” असं त्यात म्हटलं आहे.
ख्रिस मॅगी हे ‘अंडरस्टँडिंग अॅनिमल रिसर्च’ संस्थेशी संलग्नित आहेत. प्राण्यांवर प्रयोग करणाऱ्या संशोधन संस्था आणि कंपन्यांचा पाठिंबा असलेली ही यूकेमधील एक संस्था आहे.
ते म्हणतात की जेव्हा प्राण्यांवर प्रयोग करण्याची वेळ येते तेव्हा त्यांना जाणिवा असल्याचे आधीच गृहीत धरले जाते. यूकेमधील नियमांनुसार प्रयोग करताना प्राण्यांना होणाऱ्या त्रासापेक्षा त्यातून मिळणारे वैद्यकीय संशोधनाचे फायदे जर अधिक असतील तरच हे प्रयोग झाले पाहिजेत.
“सावधगिरीचा दृष्टीकोन बाळगण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पुरावे आहेत,” असं ते म्हणतात.
मात्र खेकडे, लॉबस्टर, क्रेफिश आणि कोळंबीसारख्या डेकॅपॉड क्रस्टाशियन्स प्रजाती म्हणजे ज्यांना दहा पाय असतात अशा प्रजातीसंह अनेक गोष्टी अशा आहेत ज्याबद्दल आपल्याला माहीत नाही.
“आपल्याला या प्राण्यांच्या जगण्याच्या अनुभवाबद्दल किंवा अगदी ते कोणत्या क्षणी मरतात यासारख्या मूलभूत गोष्टींबद्दलदेखील फारसं काही माहीत नाही.”
“आणि हे महत्त्वाचं आहे कारण प्रयोगशाळेत असो की जंगलात त्यांचं संरक्षण करण्यासाठी आपण नियम आखले पाहिजेत.”
2021 मध्ये प्राध्यापक बर्च यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनात ऑक्टोपस, स्क्विड आणि कटलफिश यांचा समावेश असलेल्या डेकॅपॉड्स आणि सेफॅलोपॉड्सच्या भावनांवरील 300 वैज्ञानिक अभ्यासाचे मूल्यांकन करण्यात आलं.
प्राध्यापक बर्च यांच्या टीमला आढळलं की हे प्राणी वेदना, सुख, तहान, भूक, उबदारपणा, आनंद, आराम आणि उत्साह अनुभवू शकतात हा या गोष्टीचा पुरावा आहे की ते संवेदनाक्षम आहेत. या निष्कर्षांमुळे सरकारनं या प्राण्यांचा समावेश त्यांच्या 2022 च्या प्राणी कल्याण संवेदना कायद्यामध्ये (Animal Welfare Sentience Act) केला.
“ऑक्टोपस आणि खेकड्यांच्या हितांशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष केले गेले आहे,” असं प्राध्यापक बर्च म्हणतात.
“या समस्यांना थोड्या अधिक गांभीर्यानं घेण्यासाठी उदयोन्मुख विज्ञानानं समाजाला प्रोत्साहन दिलं पाहिजे.”
विविध प्रकारचे लाखो प्राणी आहेत आणि ते जग कसं अनुभवतात यावर फारच थोडं मूलभूत संशोधन करण्यात आलं आहे. आपल्याला मधमाशांबद्दल थोडीशी माहिती आहे. काही संशोधकांनी झुरळ आणि अगदी फळांवरील माशांच्या सजग वर्तनाचे संकेत दाखवून दिले आहेत. मात्र इतर असंख्य प्राण्यांचा समावेश करून इतर प्रकारे असंख्य प्रयोग करायचे आहेत.
न्यूयॉर्क जाहीरनाम्यावर सह्या केलेल्या आधुनिक काळातील दांभिक लोकांकडे दुर्लक्ष करण्यात आलं, अगदी त्यांची थट्टादेखील करण्यात आली हे अभ्यासाचं क्षेत्र आहे. जे सांगता येत नाही ते सांगण्याचा आणि जोखीम मंजूर करण्याचा त्यांचा दृष्टीकोन नवा नाही.
रेने डेकार्टस ज्यावेळेस म्हणत होता की ‘मी विचार करतो म्हणून मी आहे’ त्याचवेळेस इटालियन खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यानं पृथ्वी हे विश्वाचं केंद्र नाही असं सुचवल्याबद्दल कॅथलिक चर्चने त्यावर घेतलेली हरकत सर्वश्रुत आहे.
तो विचार करण्यातील एक बदल होता, ज्यामुळे विश्वाचं खरं आणि समृद्ध चित्र आणि त्यातील आपलं स्थान पाहण्यासाठी आपले डोळे उघडले.
आता पुन्हा वेळ आली आहे की मानवाने आपला आत्मकेंद्रीपणा बाजूला ठेऊन पृथ्वीवरील इतर सजीवांबाबत विचार करावा. यामुळे आपले त्यांच्याबद्दलचे आकलन अधिक समृद्ध होईल.
BBC InDepth हे आमच्या आघाडीच्या पत्रकारांच्या सर्वोत्तम विश्लेषण आणि कौशल्यासाठी वेबसाईट आणि अॅपवरील नवीन ठिकाण आहे. एका विशिष्ट नव्या ब्रॅंड अंतर्गत, या गुंतागुंतीच्या जगाचं आकलन करण्यासाठी, गृहितकांना आव्हान देणारे नवे दृष्टीकोन आणि मोठ्या समस्यांचं सखोल वार्तांकन आम्ही तुमच्यापर्यत पोहोचवू. BBC Sounds आणि iPlayer वरून तुमच्या विचारांना चालना देणारी माहिती देखील आम्ही प्रदर्शित करू. आम्ही छोट्या स्वरूपात सुरूवात करत आहोत मात्र मोठा विचार करत आहोत आणि तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून तुम्ही आम्हाला तुमचे अभिप्राय पाठवू शकता.
Published By- Priya Dixit