जोकोविच, सिनर, साबालेन्का उपांत्यपूर्व फेरीत

ऑस्ट्रेलिया ओपन : कोको गॉफ, टेलर फ्रिट्झही शेवटच्या आठमध्ये, सित्सिपसला पराभवाचा धक्का वृत्तसंस्था/ मेलबर्न अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचप्रमाणे इटलीचा यानिक सिनर, अमेरिकेचा टेलर फ्रिट्झ, महिला एकेरीत आर्यना साबालेन्का, अमेरिकेची कोको गॉफ यांनीही उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. भारताचा रोहन बोपण्णा व तिची साथीदार टीमिया बाबोस यांनी मिश्र दुहेरीतून माघार घेतली. […]

जोकोविच, सिनर, साबालेन्का उपांत्यपूर्व फेरीत

ऑस्ट्रेलिया ओपन : कोको गॉफ, टेलर फ्रिट्झही शेवटच्या आठमध्ये, सित्सिपसला पराभवाचा धक्का
वृत्तसंस्था/ मेलबर्न
अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचप्रमाणे इटलीचा यानिक सिनर, अमेरिकेचा टेलर फ्रिट्झ, महिला एकेरीत आर्यना साबालेन्का, अमेरिकेची कोको गॉफ यांनीही उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. भारताचा रोहन बोपण्णा व तिची साथीदार टीमिया बाबोस यांनी मिश्र दुहेरीतून माघार घेतली.

25 वे ऐतिहासिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या मार्गावर असणाऱ्या जोकोविचने फ्रान्सच्या 20 व्या मानांकित अॅड्रियन मॅनारिनोचा 6-0, 6-0, 6-3 असा फडशा पाडत आगेकूच केली. त्याचे वर्चस्व पाहता 11 व्या वेळी ती ही स्पर्धा जिंकणार असेल बोलले जात आहे. 2018 मध्ये कोरियाच्या खेळाडूकडून पराभूत झाल्यानंतर जोकोविचने या स्पर्धेत आतापर्यंत एकही पराभव स्वीकारलेला नाही. त्याची पुढील लढत टेलर फ्रिट्झशी होईल. 12 व्या मानांकित फ्रिट्झने ग्रीसच्या सातव्या मानांकित स्टेफानोस सित्सिपसला 7-6 (7-3), 5-7, 6-3, 6-3 असा पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत इथपर्यंत मजल मारण्याची फ्रिट्झची ही पहिलीच वेळ आहे. इटलीच्या चौथ्या मानांकित यानिक सिनरने शेवटच्या आठमधील स्थान निश्चित करताना रशियाच्या कॅरेन खचानोव्हवर 6-4, 7-5, 6-3 अशी मात केली.
महिला एकेरीत विद्यमान विजेत्या आर्यना साबालेन्काने उपांत्यपूर्व फेरी गाठताना बिगरमानांकित अमांदा अॅनिसिमोव्हाची घोडदौड 6-3, 6-2 अशी रोखली. अमेरिकेच्या चौथ्या मानांकित कोको गॉफने प्रभावी प्रदर्शन करीत पोलंडच्या बिगरमानांकित मॅग्डालेना फ्रेचच 6-1, 6-2 असा सहज पराभव केला. टॉप टेनमधील सात अव्वल महिला स्पर्धेबाहेर पडल्या असल्याने गॉफ व साबालेन्का यांनी कारकिर्दीत दुसरे ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी मिळाली आहे. मात्र दोघीही एकाच बाजूला असल्याने त्यांची अंतिम फेरीत गाठ पडू शकत नाही. उपांत्य फेरीत ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. साबालेन्काने आतापर्यंत केवळ 11 गेम्स गमविले असल्याने तिलाच जेतेपदाची दावेदार मानले जात आहे. तिची पुढील लढत अँड्रीव्हा किंवा क्रेसिकोव्हा यापैकी एकीशी होणार आहे.
मिश्र दुहेरीतून रोहन बोपण्णा व टीमिया बाबोस यांनी माघार घेतल्याने त्यांच्या जागी एन. श्रीराम बालाजी व रोमानियाची व्हिक्टर कॉनिया यांना संधी मिळाली. या जोडीने पहिल्या फेरीत विजय मिळविल्यानंतर दुसऱ्या फेरीत दहाव्या मानांकित इटलीच्या मॅटेव अरनाल्डी व आंद्रेया पेलेग्र्रिनो यांच्याकडून त्यांना 6-3, 6-3 असास पराभव स्वीकारावा लागला.