सहावीची पुनर्मुद्रित मराठी पुस्तके वितरणास प्रारंभ

सदोष पुस्तके घेतली माघारी, शिक्षक-पालकांतून समाधान बेळगाव : सहावीच्या मराठीच्या पुस्तकात व्याकरणाच्या अक्षम्य चुका होत्या. ही पाठ्यापुस्तके शिक्षण विभागाने माघारी घेऊन केवळ पंधरा दिवसात नवीन पुस्तके शालेय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारपासून नव्या पुस्तकांचे वितरण सुरू करण्यात आले असून येत्या दोन दिवसात सर्व मराठी शाळांपर्यंत पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. पुस्तकाची छपाई […]

सहावीची पुनर्मुद्रित मराठी पुस्तके वितरणास प्रारंभ

सदोष पुस्तके घेतली माघारी, शिक्षक-पालकांतून समाधान
बेळगाव : सहावीच्या मराठीच्या पुस्तकात व्याकरणाच्या अक्षम्य चुका होत्या. ही पाठ्यापुस्तके शिक्षण विभागाने माघारी घेऊन केवळ पंधरा दिवसात नवीन पुस्तके शालेय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारपासून नव्या पुस्तकांचे वितरण सुरू करण्यात आले असून येत्या दोन दिवसात सर्व मराठी शाळांपर्यंत पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे.
पुस्तकाची छपाई करताना शब्दांना ऊकार, वेलांटी, काना-मात्रा नसल्याने संपूर्ण पाठ्यापुस्तकात चुका आढळून आल्या होत्या. पुस्तकातील मजकूर शिक्षकांनाच वाचता येत नसल्याने विद्यार्थी कसे अभ्यास करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. सदोष पाठ्यापुस्तकांबाबत पालक तसेच नागरिकांमधून जोरदार नाराजी व्यक्त करण्यात आली. शिक्षण विभागाने मराठीतील काही तज्ञ शिक्षकांची मते जाणून घेतली. गटशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी, डाएट प्राचार्यांच्या निदर्शनास ही चूक आणून देण्यात आली होती.
जिल्हा शिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांनी येत्या आठ ते दहा दिवसात नवीन पुस्तकांची छपाई करून ती उपलब्ध करून देण्यात येतील, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार बेंगळूर येथे पुन्हा नव्याने पुस्तकांची छपाई करण्यात आली. गुरुवार दि. 27 पासून नवीन पाठ्यापुस्तकांच्या वितरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे मराठी माध्यमाच्या शिक्षक तसेच पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
भारत लाईव्ह न्यूज मीडियामुळे शिक्षण विभागाला जाग
मराठी पुस्तकांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याचे वृत्त सर्वप्रथम भारत लाईव्ह न्यूज मीडियाने प्रसिद्ध केले. यामुळे खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागाने मराठी माध्यमाच्या मराठी विषयाची सहावीची पाठ्यापुस्तके माघारी घेण्याचा निर्णय घेतला. केवळ बेळगावच नाही तर चिकोडी, बिदर, गुलबर्गा, विजापूर येथील मराठी शाळांमधील पुस्तकेही मागे घेण्यात आली होती.
दोन दिवसांपासून पुस्तकांचे वितरण
मराठी माध्यमाच्या सहावीच्या मराठी पुस्तकांमध्ये बऱ्याच चुका होत्या. सदोष पुस्तके असल्याने ही 10 जूनपासून मागे घेण्यात आली. छपाई होऊन आलेली नवीन पुस्तके उपलब्ध होताच मागील दोन दिवसांपासून पुस्तकांचे वितरण शहर विभागात केले जात आहे.
आय. डी. हिरेमठ (समन्वयक अधिकारी)