वेदांत फाऊंडेशनच्या एक्सलन्स पुरस्कारांचे वितरण

प्रतिनिधी/ बेळगाव समाजाचे आपणही काही तरी देणे लागतो, या भावनेने समाजहिताचे कार्य केले पाहिजे. समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा गौरव करणे आपले कर्तव्य आहे, हे ओळखून वेदांत फाऊंडेशनने चांगला उपक्रम हाती घेतला आहे. आपण समाजासाठी झोकून देऊन कार्य करतो, तेव्हा नक्कीच आपला सन्मान होतो, असे विचार मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक अविनाश पोतदार यांनी व्यक्त केले. […]

वेदांत फाऊंडेशनच्या एक्सलन्स पुरस्कारांचे वितरण

प्रतिनिधी/ बेळगाव
समाजाचे आपणही काही तरी देणे लागतो, या भावनेने समाजहिताचे कार्य केले पाहिजे. समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा गौरव करणे आपले कर्तव्य आहे, हे ओळखून वेदांत फाऊंडेशनने चांगला उपक्रम हाती घेतला आहे. आपण समाजासाठी झोकून देऊन कार्य करतो, तेव्हा नक्कीच आपला सन्मान होतो, असे विचार मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक अविनाश पोतदार यांनी व्यक्त केले.
वेदांत फाऊंडेशनतर्फे वेदांत एक्सलन्स अवॉर्डचे वितरण शनिवारी महिला विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी होते. व्यासपीठावर बीईओ लिलावती हिरेमठ, समृद्धी संस्थेचे सचिव वीरेश किवडसण्णावर, रमेश आनंदाचे, बाबू सोगलण्णावर, आय. डी. हिरेमठ, प्राचार्या कविता परमाणिक, वेदांत फाऊंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर प्रास्ताविक करण्यात आले. मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. पोतदार पुढे म्हणाले, गरज संपली की मैत्री संपते. त्यामुळे मैत्री गरज म्हणून करू नका, तर सवय म्हणून करा. संकटात उभा राहतो आणि मनातील भावना जाणून घेतो, तोच खरा मित्र असतो. आपल्या कार्यातूनच स्वत:ची ओळख निर्माण करा, असे सांगत क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरचे उदाहरण त्यांनी दिले.
वेदांत फाऊंडेशनतर्फे शिक्षक सी. वाय. पाटील, बीबी आस्मा नाईक, अनुराधा तारिहाळकर, सुजाता लोखंडे, पत्रकार राजशेखर पाटील, शिवाजी शिंदे, सुनील पाटील, पोलीस खात्याचे केंप्पाण्णा दोडमनी, काशिनाथ इरगार आदींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शाल, रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त केले.
बीईओ लिलावती हिरेमठ म्हणाल्या, समाजाला चांगल्या दिशेने घेऊन जाण्याचे काम वेदांत फाऊंडेशन करीत आहे. समाज, शिक्षण, पोलीस आणि पत्रकारितेत विशेष कार्य केलेल्या नवरत्नांचा गौरव केला जात आहे, हे उल्लेखनीय आहे. याप्रसंगी शिक्षक, वेदांत फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.