मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी आज दिल्लीत चर्चा
मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुन्हा वरिष्ठांची घेणार भेट : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमारही दिल्लीत ठाण मांडून
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचनेला काँग्रेस वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या सोमवारी पुन्हा दिल्लीला जाणार आहेत. दरम्यान, त्यांनी वरिष्ठांशी मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत चर्चा करतील. या सर्व घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे पाऊल गूढ असून सर्वकाही त्यांच्या हालचाली आणि भूमिकेवर अवलंबून आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी दिल्लीला जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. दरम्यान, उभयतांमध्ये बिहार निवडणूक निकालासह मंत्रिमंडळ पुनर्रचनेवर चर्चा झाल्याचे समजते. यावेळी राहुल गांधींनी मंत्रिमंडळ पुनर्रचनेला तत्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे आज पुन्हा सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर जात असून याबाबत वरिष्ठांशी चर्चा करणार आहेत.
मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा चेंडू आता एआयसीसी अध्यक्षांच्या अंगणात असून सर्व काही त्यांच्या विवेकबुद्धीनुसार ठरवले जाईल. म्हणूनच मुख्यमंत्री सिद्धरामय्या सोमवारी दिल्लीला जाऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि प्रदेश काँग्रेस प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांच्याशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, मंत्रिमंडळ पुनर्रचनेची तारीख कधी निश्चित करायची, किती मंत्र्यांना वगळायचे आणि किती नवीन मंत्र्यांना परवानगी द्यायची यावरही व्यापक चर्चा होण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू असताना शनिवारी दिल्लीला रवाना झालेले उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दिल्लीतच थांबले असून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्मयता आहे. या भेटीदरम्यान, शिवकुमार वरिष्ठांना मंत्रिमंडळ पुनर्रचनेची माहिती देऊन मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा निर्णय मागे घेण्याची विनंती करण्याची शक्यता आहे. तसेच पुनर्रचनेऐवजी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची मागणी करणार आहेत. मंत्रिमंडळ पुनर्रचना डी. के. शिवकुमार यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे.
राज्य राजकारणात ‘नोव्हेंबर क्रांती’सह अनेक मुद्द्यांच्या चर्चेला ‘ब्रेक’ लागला असताना मंत्रिमंडळ पुनर्रचनेला जोर धरल्याने मुख्यमंत्री पदावर डोळा असणाऱ्या डी. के. शिवकुमार आपला राजकीय मार्ग कसा निवडतात आणि ते वरिष्ठांना भेटून सत्तावाटपाचा प्रश्न सोडवतात का? यावर मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा निर्णय अवलंबून असेल. त्यामुळे एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधींशी चर्चा केल्यानंतरच सत्तावाटप आणि मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दिल्लीत राहून वरिष्ठांना भेटण्याची तयारी करत असताना त्यांचे भाऊ, माजी खासदार डी. के. सुरेश यांनीही रविवारी दिल्लीला प्रवास केला. त्यामुळे डी. के. बंधूंचे हे पाऊल गूढ बनले आहे.
बेळगावातील अधिवेशनानंतरच सर्वकाही ठरणार
वरिष्ठांनी जरी डी. के. शिवकुमार यांना पटवून देत मंत्रिमंडळ पुनर्रचेनासाठी पुढे गेले तरी ते सध्या कठीण आहे. डिसेंबरमध्ये बेळगाव येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतरच मंत्रिमंडळ पुनर्रचना किंवा विस्तार होईल. अधिवेशनादरम्यान मंत्रिमंडळात पुनर्रचना करून धोका पत्करण्यास काँग्रेस नेते तयार नाहीत. सर्वकाही बेळगाव अधिवेशनानंतर ठरेल, असे काँग्रेस सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसला कधीही ब्लॅकमेल करणार नाही : शिवकुमार
मी पक्षशिस्तीचा सैनिक आहे. मी कधीही काँग्रेस पक्षाला ब्लॅकमेल करणार नाही. पक्ष उभारण्यासाठी मी रात्रंदिवस काम केले आहे. पक्षसंघटनेसाठी यापुढेही मी काम करत राहीन, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले. रविवारी दिल्लीत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या बातमीबद्दल विचारले असता ते म्हणाले, माझे मानसिक, शारीरिक आणि राजकीय आरोग्य ठीक आहे. मी खर्गेंना भेटणार आहे. डिसेंबरपर्यंत मला शंभर काँग्रेस कार्यालयांची पायाभरणी करायची आहे. मी गांधी भारत नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्याच्या प्रकाशनाची तारीख निश्चित करावी लागेल. संसदेचे अधिवेशन लवकरच सुरू होईल. काँग्रेस स्थापना दिन साजरा केला पाहिजे. हे सर्व मलाच करावे लागणार आहे. मी कशासाठी पदाचा राजीनामा देऊ. सध्या अशी कोणतीही परिस्थिती नाही. जोपर्यंत काँग्रेस पक्ष मला या पदावर काम करण्यास सांगेल तोपर्यंत मी पक्षाच्या शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे काम करत राहीन. भविष्यात पक्ष सत्तेत येईल यासाठी मी काम करत राहीन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Home महत्वाची बातमी मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी आज दिल्लीत चर्चा
मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी आज दिल्लीत चर्चा
मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुन्हा वरिष्ठांची घेणार भेट : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमारही दिल्लीत ठाण मांडून प्रतिनिधी/ बेंगळूर राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचनेला काँग्रेस वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या सोमवारी पुन्हा दिल्लीला जाणार आहेत. दरम्यान, त्यांनी वरिष्ठांशी मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत चर्चा करतील. या सर्व घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे पाऊल गूढ […]
