आदिवासी कल्याण योजनेतून साहाय्यनिधीचे वितरण

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते योजनेचा प्रारंभ ► वृत्तसंस्था / नवी दिल्ली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने ‘जनजाती आदिवासी न्याय महा अभियान’ या योजनेच्या माध्यमातून एक लाख आदिवासींना धनसाहाय्य करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच करण्यात आला. प्रत्येक आदिवासीला पक्के घर बांधण्यासाठी 50 हजाराचे धनसाहाय्याचे धनादेश त्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले […]

आदिवासी कल्याण योजनेतून साहाय्यनिधीचे वितरण

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते योजनेचा प्रारंभ
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने ‘जनजाती आदिवासी न्याय महा अभियान’ या योजनेच्या माध्यमातून एक लाख आदिवासींना धनसाहाय्य करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच करण्यात आला. प्रत्येक आदिवासीला पक्के घर बांधण्यासाठी 50 हजाराचे धनसाहाय्याचे धनादेश त्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले आहेत. हा प्रथम टप्पा आहे.
या योजनेच्या प्रथम हप्त्यासाठी 540 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या रकमेचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ही संपूर्ण योजना 24 हजार कोटी रुपयांची आहे. तिचे पुढचे टप्पे क्रमाक्रमाने पूर्ण करण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाला. अनेक राज्यांमधील आदिवासींनी या कार्यक्रमात भाग घेतला होता.
दहा वर्षे गरिबांसाठीच
देशातील गरिबांची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठीच यासाठी आपल्या सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक योजना लागू केल्या आहेत. जोपर्यंत विकासाची फळे समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहतच नाहीत, दुर्गम भागांमधील लोकांपर्यंत पोहचत नाहीत, तोपर्यंत खरा विकास झाला, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे आपले सरकार गरीबांचा हिताचा विचार प्राधान्याने करीत आहे, असे प्रतिपादन या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
कल्याणकारी योजनांना निधीवाढ
केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये दलित आणि आदिवासी यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना लागू केल्या आहेत. तसेच अनेक योजनांचा निधी मोठ्या प्रमाणात वाढविला आहे. दलित आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत अडीच पट वाढ करण्यात आली आहे. आदिवासी भागांमध्ये 500 हून अधिक ‘एकलव्य’ शाळांचे निर्माणकार्य करण्यात येत आहे. आदिवासी समाजातील सर्वात मागास समाजांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहचेल याची दक्षता सरकार घेत आहे. केंद्र सरकारने आदिवासी समाजासाठीच्या कल्याणकारी योजनांसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मार्गदर्शन घेतले आहे. त्यांच्या सूचनांचा विचार करुन योजना सज्ज करण्यात आल्या आहेत, असेही महत्वाचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
दिवाळी होणार साजरी
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा क्षण आता नजीक आला आहे. संपूर्ण अयोध्या दिवाळी साजरी करीत आहे. 22 जानेवारीला देशभरात ही दिवाळी साजरी केली जाणार आहे. आज ज्या 1 लाख आदीवासींना घरे बांधण्यासाठी धनसाहाय्य वितरीत करण्यात आले आहे, ते देखील दिवाळी साजरी करतील. भारताची आर्थिक प्रगती वेगाने होत असून येत्या काही गरीबांच्या जीवनशैलीत महत्वाचे परिवर्तन होण्याचा समय जवळ आला आहे, असा विश्वास त्यांनी मांडला.
4 कोटी घरे
गरिबांसाठी घर या योजनेत आतापर्यंत केंद्र सरकारने 4 कोटी पक्क्या घरांची निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे गरिबांना विनामूल्य गॅस जोडणी, कोट्यावधी घरांमध्ये नळाद्वारे पिण्याचे पाणी, वीजेची व्यवस्था, शिक्षण, आरोग्य आणि पोषण आदी पुरविण्यात आले आहे. आगामी काळात हे लाभ सर्व पात्र व्यक्तींपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
लाभार्थींसमवेत संवाद
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या लाभार्थींसमवेत संवादही साधला. अनेक आदिवासींनी त्यांच्याशी बोलताना केंद्र सरकारच्या योजनांसंबंधी समाधान व्यक्त केले. या योजनांमुळे आपल्या जीवनात परिवर्तन झाले आहे. आता आम्हाला भविष्याविषयी शाश्वती वाटत आहे, अशी प्रशंसा अनेकांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना केंद्राच्या प्रयत्नांची माहिती यावेळी दिली.