बेळगावहून गोव्याला जोडणाऱ्या महामार्गांचा विकास करा

नितीन गडकरी यांच्याकडे बेळगावच्या नागरिकांतर्फे करणार मागणी बेळगाव : बेळगाव व गोवा यांचा व्यापार, आयात-निर्यात याच्या दृष्टीने महत्त्वाचा संबंध आहे. त्यामुळे बेळगावहून गोव्याला जाणाऱ्या महामार्गांचे रुंदीकरण करून चार पदरी महामार्ग तयार करावा, या मागणीसाठी गुरुवारी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना बेळगावच्या नागरिकांच्यावतीने निवेदन दिले जाणार आहे. बेळगावहून गोव्याला जाण्यासाठी सध्या तीन रस्ते […]

बेळगावहून गोव्याला जोडणाऱ्या महामार्गांचा विकास करा

नितीन गडकरी यांच्याकडे बेळगावच्या नागरिकांतर्फे करणार मागणी
बेळगाव : बेळगाव व गोवा यांचा व्यापार, आयात-निर्यात याच्या दृष्टीने महत्त्वाचा संबंध आहे. त्यामुळे बेळगावहून गोव्याला जाणाऱ्या महामार्गांचे रुंदीकरण करून चार पदरी महामार्ग तयार करावा, या मागणीसाठी गुरुवारी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना बेळगावच्या नागरिकांच्यावतीने निवेदन दिले जाणार आहे. बेळगावहून गोव्याला जाण्यासाठी सध्या तीन रस्ते उपलब्ध आहेत. यातील बेळगाव-गोवा व्हाया चंदगड-आंबोली हा रस्ता कर्नाटक, महाराष्ट्र या दोन राज्यांमधून गोव्याला जोडला जातो. या रस्त्याचे चौपदरीकरण केल्यास कोल्हापूर जिल्ह्याचाही विकास होणार आहे. तसेच मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टला जाण्यासाठी बेळगाव व कोल्हापूरच्या नागरिकांना सोयीचे होणार आहे. त्यामुळे या मार्गाचा विकास करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून केली जात आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डोमॅस्टिक व इंटरनॅशनल विमानांची वाहतूक होते.
बेळगावमध्ये विमानतळ असले तरी काही मर्यादित शहरांनाच विमानसेवा दिली जात आहे. त्यामुळे बेळगावमधील नागरिकांना आंतरराष्ट्रीय सेवांसाठी मोपा एअरपोर्टवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे महामार्ग होणे गरजेचे आहे. बेळगाव ते गोवा व्हाया जांबोटी, चोर्ला हा रस्ता सर्वात जवळचा ठरतो. या महामार्गाच्या गोव्यातील साखळी गावापर्यंत रुंदीकरणासाठी मंजुरी देण्यात आली आहे. परंतु, अद्याप या कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. या महामार्गाचा विकास केल्यास जांबोटी, कणकुंबी, चोर्ला, साखळी या गावांचाही विकास होईल. तसेच गोव्यातील लोकांना व्यापारासाठी बेळगावमध्ये येणे सोयीचे ठरणार आहे. बेळगाव-गोवा व्हाया अनमोड हा मार्ग वनविभागाच्या आक्षेपामुळे मागील काही वर्षांपासून रखडला आहे. बेळगाव ते खानापूरपर्यंतच्या महामार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी त्यापुढील महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. या महामार्गाचा विकास झाल्यास बेळगाव-खानापूर तसेच धारवाड जिल्ह्याच्याही विकासाला मदत होणार आहे. त्यामुळे बेळगाव-गोवा महामार्गांचा विकास करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडेही मागणी
बेळगाव-गोवा व्हाया चंदगड, आंबोली रस्त्याचा विकास झाल्यास महाराष्ट्रातील कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या विकासाला मदत होणार आहे. त्यामुळे या महामार्गासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी केली. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी किरण ठाकुर यांनी भेट घेऊन महामार्गाच्या विकासाबाबत चर्चा केली.