दिल्ली कॅपिटल्स-पंजाब किंग्ज मुकाबला आज
रिषभ पंतवर सारे लक्ष
वृत्तसंस्था/चंदिगड
दिल्ली कॅपिटल्स आज शनिवारी आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना करणार असून यावेळी रिषभ पंतचे होणार असलेले पुनरागमन हे मुख्य वैशिष्ट्या राहणार आहे. या दोन्ही संघांना मागील हंगामातील खराब कामगिरीची निराशा यावेळी पुसून टाकण्याची आशा असेल. दुपारी 3.30 वाजता सामना सुरू होईल.
डिसेंबर, 2022 मध्ये झालेल्या जीवघेण्या कार अपघातातून आश्चर्यकारकरीत्या वाचलेला पंत अपेक्षेपेक्षा जलदगतीने सावरलेला असून हा त्याचा निर्धार व चिकाटीचा परिणाम आहे. त्याला यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून खेळण्यास परवानगी देण्यात आली आहे आणि त्याच्याकडे कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी आहे. डेव्हिड वॉर्नरकडून कर्णधारपद काढून घेऊन त्याला देण्यात आले आहे. वॉर्नरच्या नेतृत्वाखालील संघ मागील वर्षी 10 संघांच्या स्पर्धेत नवव्या स्थानावर राहिला होता.
पंतच्या पुनरागमनाने दिल्ली कॅपिटल्स संघाला जोर चढला आहे. आयपीएलमधील आतापर्यंतची त्यांची सर्वोत्तम कामगिरी 2020 मध्ये घडली होती. त्यावेळी ते उपविजेते राहिले होते. पंत लगेच यष्टिरक्षण करणे सुरू करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर त्याने यष्टिरक्षण सांभाळले नाही, तर दिल्ली कॅपिटल्सला ही जबाबदारी वेस्ट इंडिजच्या शाई होप किंवा दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्सवर टाकावी लागेल.
दिल्लीकडे शक्तिशाली वेगवान गोलंदाजी असून त्याला स्फोटक फलंदाजांच्या फळीची साथ लाभणार आहे. नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या वॉर्नरला आयपीएलमध्ये चमक दाखवून त्याद्वारे टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठीच्या ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळविण्याची आशा असेल. पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, पंत आणि स्टब्स यांच्या रुपाने दिल्ली कॅपिटल्सकडे स्फोटक फलंदाजी आहे, तर त्यांच्या गोलंदाजीतील माऱ्याचे नेतृत्व एन्रिक नॉर्त्जे करेल आणि त्याला अनुभवी इशांत शर्मा, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांची साथ लाभेल.
दुसरीकडे, पंजाब किंग्जला देखील हा चषक कधी जिंकता आलेला नाही. त्यांनी फक्त एकदाच 2014 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. कोलकाता नाईट रायडर्सकडून त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. 2019 ते 2022 दरम्यान सलग चार हंगामात सहाव्या स्थानावर राहिल्यानंतर 2023 मध्ये ते आठव्या स्थानावर घसरले होते आणि यावेळी परिस्थिती बदलण्यासाठी ते निश्चितच प्रयत्न करतील.
शिखर धवनकडे या संघाचे नेतृत्व आहे. तो राष्ट्रीय संघाच्या बाहेर फेकला गेलेला असल्याने आपली उपयुक्तता सिद्ध करण्यास उत्सुक असेल. पंजाब किंग्जला यावेळी जितेश शर्मा हा नवा उपकर्णधार लाभलेला आहे. पण जॉनी बेअरस्टोचा फॉर्म हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय असेल. संघाकडे सिकंदर रझा, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि ऋषी धवनसारखे अष्टपैलू खेळाडू आहेत, तर अर्शदीप सिंग, हर्षल पटेल आणि नॅथन एलिस यांच्यासमवेत त्यांच्या गोलंदाजीचे नेतृत्व कागिसो रबाडा करेल.
संघ : दिल्ली कॅपिटल्स-रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, स्वस्तिक चिकारा, यश धुल, एन्रिक नॉर्टजे, इशांत शर्मा, रिचर्डसन, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रसिक दार, विकी ओस्तवाल, अक्षर पटेल, जॅक फ्रेझर-सीगुर्क, ललित यादव, मिचेल मार्श, सुमित कुमार, अभिषेक पोरेल, कुमार कुशाग्रा, रिकी भुई, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स.
पंजाब किंग्ज-शिखर धवन (कर्णधार), जितेश शर्मा, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, हरप्रीत भाटिया, रिली रोसोव्ह, शशांक सिंग, ख्रिस वोक्स, विश्वनाथ प्रताप सिंह, आशुतोष शर्मा, तनय त्यागराजन, अथर्व तायडे, ऋषी धवन, सॅम करन, सिकंदर रझा, शिवम सिंग, प्रिन्स चौधरी, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, नॅथन अॅलिस, राहुल चहर, विद्वथ कवेरप्पा, हर्षल पटेल.
सामन्याची वेळ-दुपारी 3.30 वा.
Home महत्वाची बातमी दिल्ली कॅपिटल्स-पंजाब किंग्ज मुकाबला आज
दिल्ली कॅपिटल्स-पंजाब किंग्ज मुकाबला आज
रिषभ पंतवर सारे लक्ष वृत्तसंस्था/चंदिगड दिल्ली कॅपिटल्स आज शनिवारी आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना करणार असून यावेळी रिषभ पंतचे होणार असलेले पुनरागमन हे मुख्य वैशिष्ट्या राहणार आहे. या दोन्ही संघांना मागील हंगामातील खराब कामगिरीची निराशा यावेळी पुसून टाकण्याची आशा असेल. दुपारी 3.30 वाजता सामना सुरू होईल. डिसेंबर, 2022 मध्ये झालेल्या जीवघेण्या कार अपघातातून आश्चर्यकारकरीत्या […]
