देहाची तिजोरी भक्तिचाच ठेवा Bhakti Geet Bhajan
देहाची तिजोरी भक्तिचाच ठेवा उघड दार देवा आता,
उघड दार देवा ॥टेर॥
पिते दूध डोळे मिटूनी, जात मांजराची
मनी चोरट्याच्या का रे, भीती चांदण्याची
सरावल्या हातांनाही, कंप का सुटावा… उघड दार देवा आता ॥1॥
उजेडात होते पुण्य, अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे, कर्तव्याचे माप
दृष्ट दुर्जनांची कैसी, घडे लोकसेवा… उघड दार देवा आता ॥2॥
स्वार्थ जणु भिंतीवरचा, आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वैरी
घडोघडी अपराधाचा, तोल सावरावा… उघड दार देवा आता ॥3॥
तुझ्या हाती पांडुरंगा, तिजोरी फुटावी
मुक्तपणे भक्ती माझी, तुझी तू लुटावी
मार्ग तुझ्या राऊळीचा, तो मला कळावा
.. उघड दार देवा आता ।।4।।
भलेपणासाठी कोणी, बुरेपणा केला
बंधनात असुनी वेढा, जगी मुक्त झाला
आपुल्याच सौख्यालागी, करील तो हेवा
… उघड दार देवा आता ।।5।।