ज्यांना माझे कार्य माहीत नाही, त्यांच्याकडूनच बदनामी

श्रीपादभाऊ नाईक यांचे प्रतिपादन : ‘तरुण भारत’शी साधला खास संवाद ज्यांना माहिती नाही त्यांनी ‘सारथी’ वाचावी आतापर्यंत हजारभर नोकऱ्या मिळवून दिल्या केंद्रातील अनेक प्रकल्प गोव्यात साकारले समाजकारणात कुणीही राजकारण आणू नये पैसा व्यवसायातूनच करावा, राजकारणातून नव्हे पणजी : स्वत:च्या कामांचा प्रचार, प्रसार प्रसिद्धी करत नाही, गाजावाजा किंवा मार्केटिंग करत नाही तसेच बडेजावही मिरवत नाही, तो […]

ज्यांना माझे कार्य माहीत नाही, त्यांच्याकडूनच बदनामी

श्रीपादभाऊ नाईक यांचे प्रतिपादन : ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’शी साधला खास संवाद

ज्यांना माहिती नाही त्यांनी ‘सारथी’ वाचावी
आतापर्यंत हजारभर नोकऱ्या मिळवून दिल्या
केंद्रातील अनेक प्रकल्प गोव्यात साकारले
समाजकारणात कुणीही राजकारण आणू नये
पैसा व्यवसायातूनच करावा, राजकारणातून नव्हे

पणजी : स्वत:च्या कामांचा प्रचार, प्रसार प्रसिद्धी करत नाही, गाजावाजा किंवा मार्केटिंग करत नाही तसेच बडेजावही मिरवत नाही, तो माझा पिंडच नाही. त्यामुळेच मी मागे राहिलो व आजपर्यंत केलेली विकासकामे आणि जनसेवेची माहिती काही मोजक्या लोकांपर्यंत पोहोचली नाही, तेच लोक आपली बदनामी करत आहे. परंतु त्याची कोणतीही खंत नाही. कारण राजकारण हे व्रत म्हणून अंगीकारले असल्याने यापुढेही ते चालूच राहिल, असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री तथा उत्तर गोव्याचे भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला असताना त्याच धामधुमीत दै. तऊण भारतला दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते. श्रीपादभाऊंनी गेल्या 25 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत काय केले? त्यांचे सामाजिक आणि राजकीय योगदान काय? यासारख्या काही लोकांमधून उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नासंबंधी विचारले असता नाईक यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. एखादा खासदार भलेही केंद्रात मंत्री असला तरीसुद्धा तो थेट नोकऱ्या देऊ शकत नाही. मात्र तो रोजगारक्षम उद्योग, प्रकल्प आणू शकतो. त्यानंतर योग्य कायदेशीर निवड प्रक्रियेद्वारे राज्य सरकारने तेथे स्थानिकांना रोजगार, नोकऱ्या उपलब्ध करून द्यायच्या असतात. आपणही तेच केले, असे ते म्हणाले.
हजारभर नोकऱ्या मिळवून दिल्या
25 वर्षांच्या कारकीर्दीत असे अनेक प्रकल्प गोव्यात आणले. मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ, धारगळ येथील आयुष इस्पितळ या दोन मोठ्या प्रकल्पातच आतापर्यंत हजारभर नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सध्या आयुष इस्पितळात 338 नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यापैकी 237 गोमंतकीय आणि त्यातील 153 पेडणेतील स्थानिकांना मिळाल्या आहेत. हे इस्पितळ पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर तेथेच एक हजारापेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती नाईक यांनी दिली.
अनेक केंद्रीय प्रकल्प गोव्यात साकारले
बांबोळी येथील गोमेकॉसाठी सुपर स्पेशालिटी ब्लॉक, मांडवीवरील अटल सेतू, हल्लीच उद्घाटन करण्यात आलेला झुवारीवरील नवीन पूल, दोनापावला येथील राष्ट्रीय जलक्रीडा संस्था, काणकोण येथील मनोहर पर्रीकर बायपास मार्ग, वास्कोतील एमपीटीला जोडणारा फ्लायओव्हर, सत्तरीतील पैकुळ येथे म्हादई नदीवर बांधण्यात आलेला पूल, दाबोळी विमानतळाचे नूतनीकरण, यासारखे असंख्य प्रकल्प आपल्याच कारकीर्दीत साकारण्यात आले.
ज्यांना माहिती नाही त्यांनी ‘सारथी’ वाचावी
विकासकामांचा हा आवाका एवढा प्रचंड आहे की केवळ 10 वर्षांतील विकासकामांची माहिती देण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली (सारथी) पुस्तिकाच तब्बल 65 पानांची बनली, यावरून गत 25 वर्षांत केलेल्या कामांची व्याप्ती किती असेल हे आपल्या लक्षात आलेले असावे. विकासाला कधीच पूर्णविराम नसतो. त्यामुळे यापुढेही तो होतच राहील, विकासकामेही निरंतर चालत राहतील, असे नाईक म्हणाले. आपण भंडारी समाजाचे नेते आहात आणि उत्तर गोव्यात या समाजाचे प्राबल्य आहे. त्याचाच आधार घेऊन आजपर्यंत तब्बल 25 वर्षे आपण राजकारणात पाय घट्ट रोवून आहात हे सत्य आहे. परंतु हल्ली आपण या समाजाला गृहित धरत आहात, असा सूर अनेकांच्या तोंडी ऐकू येत आहे. त्यात भर पडली ती हल्लीच महाशिवरात्रीदिनी हरवळे येथील श्रीऊद्रेश्वर मंदिरात निर्माण झालेल्या वादाची. मात्र आपण त्यापासून अलिप्तच राहिलात. त्याचाही रोष लोकांच्या मनात आहे, त्याबद्दल काय सांगाल? असे विचारले असता…
समाजकारणात राजकारण आणू नये
राजकारणी हा कोणत्याही एका विशिष्ट समाजाचा नसतो. त्याच्या विजयात सर्व घटकांचा सहभाग, हातभार असतो. म्हणूनच समाजकारणात राजकारण आणू नये, या मताचा मी आहे. हरवळेत जे घडले ते निव्वळ राजकारण होते. देवस्थान आणि समाजात राजकारण हा राज्यासाठी घातक विषय आहे. त्यामुळे हरवळे प्रकरणात थेट हस्तक्षेप, किंवा भूमिका मांडली नाही, असे त्यांनी सांगितले.
मतदानावर कोणताही परिणाम होणार नाही
मात्र या अलिप्ततेचा येत्या निवडणुकीत मतदानावर प्रभाव पडणार नाही का? असे विचारले आसता, ‘त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे ते म्हणाले. वाद झाला तेव्हा आपण जरी प्रत्यक्ष उपस्थित राहिलो नसलो तरी त्यानंतर तेथील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी यांची वैयक्तिक भेट घेऊन भूमिका स्पष्ट केली व ती त्यांनी मान्यही केली. ‘तुम्ही निर्धास्त राहा’ असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. त्यामुळे मतदानावर कोणताही प्रभाव पडणार नाही’, असे श्रीपादभाऊंनी सांगितले.
पैसा करण्यासाठी राजकारणात आलेलोच नाही
आज राजकारणात प्रवेश करून पूरती पाच वर्षेसुद्धा पूर्ण होण्यापूर्वीच काही आमदार, मंत्र्यांकडून अफाट माया जमविण्यात येते, शे-दोनशे कोटींचे बंगले बांधण्यात येतात, अशी उदाहरणे आहेत. अशावेळी आपण तब्बल 25 वर्षे राजकारणात आहात. त्यातील कित्येक वर्षे केंद्रात मंत्रीपदी आहात. असे असतानाही नुकत्याच सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती अगदीच नगण्य, अत्यल्प दाखविण्यात आली आहे, हे कसे काय? असे विचारले असता, ‘मुळात आपण पैसे करण्यासाठी राजकारण आलेलोच नाही. कारण पैसा म्हणजेच सर्वस्व नसते हे प्रत्येकाने ध्यानात ठेवले पाहिजे, आणि पैसा कमवायचाच असेल तर एखादा धंदा, व्यवसायाच्या माध्यमातूनही तो कमावता येतो. भ्रष्टाचाराच्या मार्गानेच तो कमावला पाहिजे, असे काही नसते’, असे त्यांनी स्पष्ट केले.
ऑफर्स अनेक होत्या, पण त्या नाकारल्या
राजकारणातील एवढा प्रगल्भ अनुभव असताना राज्याचा मुख्यमंत्री बनावे असे कधी वाटले नाही का? असे विचारले असता, ‘ऑफर्स अनेक होत्या, परंतु आपण भुललो नाही, बळीही पडलो नाही. त्यामुळे त्या थेट नाकारल्या. प्रतापसिंह राणे मुख्यमंत्री असताना सुभाष शिरोडकर यांच्यामार्फत ऑफर आली होती, तर विल्फ्रेड डिसोझा यांनी स्वत: आपल्या घरी येऊन गोवा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी गळ घातली होती. मागाल ते मंत्रीपद देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र राजकारणाच्या माध्यमातून पैसा करणे हा उद्देश कधीच नव्हता. त्यामुळे  आमिषांना बळी पडलो नाही. तसे झाले असते तर कदाचित आज भाजपातही दिसलो नसतो, राजकारणाची व्याख्या आज अर्थकारण अशी झालेली आहे. पण ती कुणी बाळगू नये, असे श्रीपादभाऊ म्हणाले.
मत विकू नये, आमिषांना बळी पडू नये
एखादा उमेदवार प्रचारानिमित्त मतदारांच्या दारी जातो तेव्हा, ‘माझ्यासाठी काय आणले आहे? असे विचारण्याची मानसिकता लोकांमध्ये ऊजू लागली आहे, त्याबद्दल काय सांगाल, असे विचारले असता, ‘लोकांना आज देश किंवा राज्यासाठी काय केले, किती विकास केला, कोणते प्रकल्प आणले, किती रोजगार दिले, त्यातून कुणाचा फायदा झाला, या सर्वांपेक्षा स्वत:ला काय मिळाले हे अधिक महत्त्वाचे वाटू लागले आहे. प्रत्येकाला एक तर सरकारी नोकरी किंवा निवडणुकीवेळी उमेदवाराकडून पैसे मिळावे असे वाटू लागले  आहे. परंतु हे विचार अत्यंत चुकीचे आहेत. मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे. ती देशसेवा आहे. त्यामुळे कुणीही पैशांसाठी मत विकू नये, हे आपले मत आहे, असे श्रीपादभाऊ म्हणाले. देशातील किंवा जगातील कोणताही राजकारणी 100 टक्के मतदारांच्या मागण्या, गरजा पूर्ण करू शकत नाही. त्या बदल्यात विविध प्रकल्प, योजना, सुविधा, यांच्या माध्यमातून तो जनसेवा करत असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.