चिकन-अंड्यांच्या दरात घसरण

चिकन-अंड्यांच्या दरात घसरण

बेळगाव : वाढत्या उष्म्यामुळे चिकन, अंड्यांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दर हळूहळू खाली येऊ लागले आहेत. शहराचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे वाढत्या उष्म्याने सारे हैराण झाले आहेत. त्यामुळे अंड्यांना आणि चिकनला पसंती कमी मिळू लागली आहे. मागील काही दिवसांमध्ये जीवनावश्यक वस्तुंच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक पर्याय म्हणून चिकन आणि अंड्यांना पसंती देऊ लागले आहेत. विशेषत: डाळी, कडधान्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन वेळा चिकन आणि अंड्यांवरच ताव मारला जात होता. मात्र वाढत्या उष्म्यामुळे चिकन आणि अंड्यांची मागणी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे दरात घसरण होत आहे. 240 रुपये किलो असणारे चिकन 210 रुपयांवर आले आहे. त्याचबरोबर अंड्याचा दर 7 वरुन 6 रुपये प्रति नग झाला आहे. बाजारात फळे आणि भाजीपाल्याचे दर देखील वाढले आहेत. वाढत्या उष्म्यामुळे रसाळ फळांना आणि हिरव्या पालेभाज्यांना मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे दर देखील चढे असलेले पहावयास मिळत आहेत. अशा परिस्थितीत काही जण चिकन आणि अंड्यांनाही पसंती देत आहेत. मात्र वाढत्या उन्हाचा तडाखा यामुळे दरात काहीशी घसरण झाली आहे.
सध्या मागणी स्थिर
दरवर्षी उष्मा वाढल्यानंतर चिकन आणि अंड्यांची मागणी काहीशी कमी होते. त्यामुळे दरही खाली येतात. मात्र सध्या मागणी स्थिर आहे. यात्रा-जत्रा सुरू असल्याने मटणालाही मागणी आहे. येत्या उन्हाळ्यात चिकन आणि अंड्यांचे भाव पुन्हा खाली येतील.
उदय घोडके, मटण शॉप असोसिएशन अध्यक्ष