सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी एकत्रित लढा देऊया !

निरवडे येथील बैठकीत निर्णय न्हावेली / वार्ताहर रखडलेल्या रेल्वे टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागला तरच निरवडे पंचक्रोशीसह तालुक्याचा विकास होऊन येथील युवकांना रोजगार मिळणार आहे. या प्रश्नांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा सुरु आहे. मात्र ,याबाबत योग्य तो सकारात्मक निर्णय न झाल्यास २६ जानेवारीला आंदोलन करु,या लढ्याला तुम्ही सर्वानी साथ द्या,असे आवाहन निरवडे येथे झालेल्या बैठकीत कोकण रेल्वे […]

सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी एकत्रित लढा देऊया !

निरवडे येथील बैठकीत निर्णय
न्हावेली / वार्ताहर
रखडलेल्या रेल्वे टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागला तरच निरवडे पंचक्रोशीसह तालुक्याचा विकास होऊन येथील युवकांना रोजगार मिळणार आहे. या प्रश्नांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा सुरु आहे. मात्र ,याबाबत योग्य तो सकारात्मक निर्णय न झाल्यास २६ जानेवारीला आंदोलन करु,या लढ्याला तुम्ही सर्वानी साथ द्या,असे आवाहन निरवडे येथे झालेल्या बैठकीत कोकण रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष संदिप निंबाळकर यांनी केले.
आता यापुढे गप्प बसून चालणार नाही त्यामुळे गावागावात जाऊन रेल्वेच्या रखडलेल्या प्रश्नांबाबत जनजागृती करु आणि एकत्रित लढा देऊ,असेही त्यांनी यावेळी सांगितले. निरवडे येथे कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि निरवडे,सोनुर्ली,वेत्ये,मातोंड,नेमळे,सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ यांची एकत्रित बैठक झाली.या बैठकीत श्री निंबाळकर बोलत होते.यावेळी संघटनेचे सचिव मिहिर मठकर,उपाध्यक्ष सागर नाणोसकर,उपाध्यक्ष पुंडलिक दळवी,तालुका संपर्कप्रमुख भूषण बांदिवडेकर,निरवडे सरपंच सौ.सुहानी गावडे,वेत्ये सरपंच गुणाजी गावडे,नेमळे सरपंच दिपिका भैरे,मातोंड सरपंच मयूरी वडाचेपाटकर,निरवडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर,आदेश जाधव,सुभाष शिरसाट,तेजस पोयेकर,आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.निंबाळकर म्हणाले की,या ठिकाणच्या जमिनी रेल्वेला देताना अल्प दरात दिल्या आहेत.मात्र याठिकाणी रेल्वे आल्यानंतर या ठिकाणचा विकास व्हायला हवा होता,मात्र तसे झाले नाही.सद्यस्थितीत याठिकाणी प्रवासी रेल्वे येत आहेत.  प्रवासी रेल्वे येऊन या ठिकाणचा विकास होणार नाही.  या ठिकाणी रेल्वे येऊन २५ वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे.  परंतु या भागात कोणतेही कारखाने अद्याप आलेली नाही.  या ठिकाणी टर्मिनस नाही. ट्रेन थांबत नाही ही या मागची कारणे आहेत.टर्मिनस झाल्यास या ठिकाणी पिकणारे आंबा, काजू ,भात अशा विविध मालाला आपण याठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करुन देऊ शकतो.  मागच्या काळात टर्मिनस मंजूर झाले होते. त्या कामाचे भूमिपूजन सुद्धा याठिकाणी झाले होते.मात्र त्यावेळी मंत्री सुरेश प्रभू बदलले गेले.त्यामुळे ते काम तसेच राहिले.त्यामुळे आता टर्मिनस मंजूर करायची गरज नाही.तर त्या टर्मिनसला लागणारा निधी आवश्यक आहे.टर्मिनस झाल्यास या ठिकाणी रोजगारभिमुख प्रकल्प येणार आहेत. त्यामुळे या ठिकाणचा विकास होण्यासाठी वेळ लागणार नाही.त्यामुळे या रखडलेल्या प्रश्नांबाबत आपण जो लढा देत आहोत तो एकत्रितपणे देऊया आणि आपल्या हक्काच्या मागण्या पूर्ण करुया त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ लोकप्रतिनिधींनी सुद्धा एकत्रित येऊन २६ जानेवारीला लढा देऊ असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी मिहिर मठकर भूषण बांदिवडेकर यांनी विविध प्रश्नांबाबत आपले मत मांडले तर सरपंच सुहानी गावडे यांनी आभार मानले.