भुतरामहट्टीत काळविटांवर काळाचा घाला सुरूच

रविवारी आणखी दोन काळविटांचा मृत्यू : बन्नेरघट्टा येथून तज्ञांचे पथक दाखल, काळविटांच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणी बेळगाव : भुतरामहट्टीतील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील काळविटांचे मृत्यूचे सत्र सुरूच आहे. शनिवारी रात्रीपासून आणखी दोन काळविटांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृत काळविटांची संख्या 30 वर पोहोचली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. तीन दिवसांनंतर वनाधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 13 नोव्हेंबर रोजी 8, त्यानंतर  15 नोव्हेंबर रोजी 20 अशा एकूण 28 […]

भुतरामहट्टीत काळविटांवर काळाचा घाला सुरूच

रविवारी आणखी दोन काळविटांचा मृत्यू : बन्नेरघट्टा येथून तज्ञांचे पथक दाखल, काळविटांच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणी
बेळगाव : भुतरामहट्टीतील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील काळविटांचे मृत्यूचे सत्र सुरूच आहे. शनिवारी रात्रीपासून आणखी दोन काळविटांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृत काळविटांची संख्या 30 वर पोहोचली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. तीन दिवसांनंतर वनाधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 13 नोव्हेंबर रोजी 8, त्यानंतर  15 नोव्हेंबर रोजी 20 अशा एकूण 28 काळविटांचा मृत्यू झाला होता. शनिवारी रात्री व रविवारी सायंकाळी आणखी दोन काळवीट दगावली आहेत. तज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उर्वरित आठ काळविटांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यांना वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. मृतांची संख्या वाढू नये यासाठी खबरदारी घेण्यात आल्याचे वनअधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
बन्नेरघट्टा येथून डॉक्टरांचे पथक रविवारी बेळगावात दाखल झाले. सकाळी या पथकातील डॉक्टरांनी शितगृहात ठेवलेल्या तीन काळविटांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. शनिवारी रात्री दगावलेल्या काळविटांचेही शवविच्छेदन करून त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.जिवंत काळविटांना संसर्ग वाढू नये, यासाठी त्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. प्राणीसंग्रहालयात नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरात 38 काळविटांना दिलेल्या चारापाण्याचे नमुनेही तज्ञांनी जमविले आहेत. त्याचे सॅम्पलही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. काही काळविटांची प्रकृती खालावल्याने त्यांना तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली सलाईन देण्यात आले आहे.
बन्नेरघट्टा उद्यानातील डॉ. मंजुनाथ व डॉ. चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काळविटांच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून हृदयभाग, मूत्रपिंड, स्वादुपिंडाचे भाग तपासणीसाठी पाठविले आहेत. कर्नाटक प्राणीसंग्रहालय विभागाचे सदस्य सचिव सुनील पनवार हेही बेळगावात दाखल झाले आहेत. भुतरामहट्टी येथील प्राणीसंग्रहालयात एकूण 38 काळवीट होते. यापैकी 30 दगावले आहेत. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनीही काळविटांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. विषाणूंच्या संक्रमणामुळे मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतरच त्याचे खरे कारण समजणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. आता उर्वरित आठ काळविटांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
वनमंत्र्यांकडून प्रकरणाच्या चौकशीचे आदेश
गुरुवार दि. 13 नोव्हेंबरपासून रविवारी 16 नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंत 30 काळवीट दगावले आहेत. पहिल्या दिवशी आठ काळविटांचा मृत्यू झाला, त्याच दिवशी वनखात्याने ही घटना गांभीर्याने घेतली नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वनखात्याच्या अधिकाऱ्यांचा दुर्लक्षपणा नडला असेल, वन्यप्राण्यांच्या मृत्यूला जबाबदार ठरवून त्यांच्यावरही कारवाई होण्याची गरज आहे. वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.