किणये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गैरकारभाराने बाळ-बाळंतिणीचा मृत्यू
ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल
बेळगाव : प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या संतिबस्तवाड, ता. बेळगाव येथील एका महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला आहे. नवजात शिशूही दगावले असून त्या महिलेच्या कुटुंबीयांनी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर दुर्लक्षपणाचा ठपका ठेवला आहे. तर बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या प्रकरणी संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद झाली आहे. लक्ष्मी लगमप्पा हळ्ळी (वय 29) रा. संतिबस्तवाड असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. प्रसूतीनंतर केवळ दोन तासात अर्भकाचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ माजली असून कुटुंबीयांनी आक्रोश केला. वेळेत डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध झाले नाहीत. रुग्णवाहिकाही नव्हती. त्यामुळे महिलेला जीव गमवावा लागला, असा आरोप लक्ष्मीच्या पतीने केला आहे. उपलब्ध माहितीनुसार रविवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीला किणये येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मध्यरात्री 3.30 वाजता तिची प्रसूती झाली. प्रसूतीनंतर अर्भकाचा श्वासोच्छवास सुरू नव्हता. त्यामुळे किणये येथील परिचारिकेने लक्ष्मी यांचा पती लगमप्पा यांच्याकडे अर्भक पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठविले. पती लगमप्पा सिव्हिलला आले, त्याचवेळी लक्ष्मीचीही प्रकृती खालावली. अतिरक्तस्रावामुळे तिची प्रकृती खालावली. त्यामुळे तिला सिव्हिलला हलविण्यासाठी रुग्णवाहिकेसाठी शोधाशोध सुरू झाली. अखेर एका रुग्णवाहिकेतून लक्ष्मीला सिव्हिलला हलवताना रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. बेळगाव ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन पंचनामा केला. सीआरपीसी कलम 174(3)(4) अन्वये संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद झाली असून शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतर कोणाच्या दुर्लक्षपणामुळे या बाळ-बाळंतिणीचा मृत्यू झाला, याचा उलगडा होणार आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Home महत्वाची बातमी किणये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गैरकारभाराने बाळ-बाळंतिणीचा मृत्यू
किणये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गैरकारभाराने बाळ-बाळंतिणीचा मृत्यू
ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल बेळगाव : प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या संतिबस्तवाड, ता. बेळगाव येथील एका महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला आहे. नवजात शिशूही दगावले असून त्या महिलेच्या कुटुंबीयांनी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर दुर्लक्षपणाचा ठपका ठेवला आहे. तर बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या प्रकरणी संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद झाली आहे. लक्ष्मी लगमप्पा हळ्ळी (वय […]