मलिक यांच्या भूमिकेवरून दानवेंची टीका; फडणवीसांनी दिले सडेतोड उत्तर
नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून विविध मुद्यांवरून विरोधकांनी सत्ताधा-यांना घेरण्याचा प्रयत्न केला. यातच नवाब मलिक यांनी अधिवेशनासाठी आज सभागृहात हजेरी लावत सत्ताधा-यांच्या बाकावर बसणे पसंत केले. यावरून नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप याबाबत नवाब मलिक यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. यावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी काही प्रश्न उपस्थित केले.
‘आज खालच्या सभागृहात एक सदस्य बसले. या सदस्याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सातत्याने आम्ही अशा सदस्याच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, अशी भूमिका घेत होते. या सदस्यावर काही गुन्हे होते, हे सर्वांना माहिती आहे. आज हेच सदस्य सभागृहात सत्ताधा-यांच्या बाकावर बसले. ज्याच्याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देशद्रोहाचे गुन्हे आहेत, असे बोलत होते. त्यामुळे आता सरकारची काय भूमिका आहे?,’असा सवाल अंबादास दानवे यांनी सभागृहात उपस्थित केला. अंबादास दानवेंच्या या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.
‘आम्ही कोणाच्या मांडीला मांडी लावून बसलेलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहोत. आमच्या बाजूने अजितदादा मांडीला मांडी लावून बसलेत व त्यांच्या बाजूला छगन भुजबळ बसलेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, ज्यांच्या नेत्यांनी भूमिका घेतली की प्रत्यक्ष व्यक्ती तुरुंगात असताना देखील मंत्रिपदावरून काढले नाही, ते आता इकडे भूमिका मांडत आहेत,’ अशी टीका फडणवीस यांनी केली. तसेच देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर सदर सदस्याला मंत्रिपदावरून का काढले नाही?, त्यांचा राजीनामा का घेतला नाही?, याचे उत्तर आधी द्या, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी केले.