झारापसह पंचक्रोशीत गवारेड्यांचा धुडगूस

वायंगणी भात शेतीचे नुकसान ; पंचनामे व्हावेत ; शेतकऱ्यांची मागणी कुडाळ – झारापसह पंचक्रोशीत गवारेड्यांनी अक्षरश: धुडगूस घातला आहे.गवारेड्यांच्या कळपाने शेतकऱ्यांच्या सध्या वायंगणी भात शेतीला लक्ष्य केले असून झाराप – बाळवाट येथील तुकाराम उर्फ बंड्या बोभाटे यांच्या वायंगणी शेतीची पूर्ण नासधूस केली. मोठे नुकसान करीत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गवारेड्यांचा वावर हा लोकवस्ती पर्यंत सुरू […]

झारापसह पंचक्रोशीत गवारेड्यांचा धुडगूस

वायंगणी भात शेतीचे नुकसान ; पंचनामे व्हावेत ; शेतकऱ्यांची मागणी
कुडाळ –
झारापसह पंचक्रोशीत गवारेड्यांनी अक्षरश: धुडगूस घातला आहे.गवारेड्यांच्या कळपाने शेतकऱ्यांच्या सध्या वायंगणी भात शेतीला लक्ष्य केले असून झाराप – बाळवाट येथील तुकाराम उर्फ बंड्या बोभाटे यांच्या वायंगणी शेतीची पूर्ण नासधूस केली. मोठे नुकसान करीत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गवारेड्यांचा वावर हा लोकवस्ती पर्यंत सुरू असल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. तसेच 15 ते 20 गवारेड्यांचा कळप एकावेळी दहा ते पंधरा गुंठे भातशेती फस्त करतात आणि थैमान घातल्याने नासाडी करीत आहेत.वनविभागाचे याकडे लक्ष वेधूनही कोणतीच कार्यवाही होत नाही, याबाबत शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.झारापसह आकेरी, हुमरस, नेमळे व लगतच्या अन्य गावात गेली दोन वर्षे गवारेड्यांचा वावर सुरू आहे. अलिकडच्या काळात गवारेड्यांची संख्या वाढली आहे. खरीप व हंगामी पिकांच्या लागवडीचे नुकसान करीत आहेत. पावसाळ्यात शेतकऱ्यांनी भातशेतीची लागवड केल्यानंतर गवारेड्यांनी धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आता वायंगणी भात शेतीची लागवड केल्यानंतर या गवारेड्यांनी उपद्रव सुरू केलl आहे. 15 ते 20 गवारेड्यांचा हा कळप असल्याने शेतीमध्ये फिरुन पूर्णतः नासाडी करतात. आकेरी येथील बंड्या बोभाटे यांची झाराप – बाळवाट या क्षेत्रात भात शेती आहे.शेती हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. सध्या त्यांनी वायंगणी शेती केली.त्यांच्या या लागवडीची गावारेड्यांनी दोन दिवसांपूर्वी नासाडी केली.गवारेडे आत फिरल्याने ते पूर्णतः नासधूस करतात. श्री बोभाटे यांचे नुकसान झाले . परंतु त्यांची मेहनत वाया गेली आहे. गुरांना सुका चारा मिळतो यासाठी ही शेती केली जाते. त्यामुळे बोभाटे कुटुंब चिंतेत आहे.गेल्या दोन वर्षात झाराप पंचक्रोशीत गवरेड्यांचा वावर वाढला आणि संख्याही वाढली आहे. पावसाळी भात शेती ,नंतर वायंगणी शेती तसेच अन्य पिकांची लागवड शेतकरी करतात.पोटाची खळगी भरण्यासाठी शेती करतात. परंतु या गवरेड्यांच्या सततच्या त्रासाने त्या भागातील शेतकरी हैराण झाले आहेत. गवारेड्यांचा हा कळप त्या परिसरात मुक्कामाला असल्याने ग्रामस्थांना पायवाटेने किंवा निर्जन रस्त्याने चालताना जीव मुठीत धरुन जावे लागत आहे. कारण हा एवढा मोठा कळप केव्हा हल्ला करेल हे सांगता येत नाही. शेतकऱ्यांना काहीवेळा शेतात सकाळीच त्यांचे दर्शन होत आहे. हा त्यांचा वावर शाळकरी विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकतो. माणगाव खोरे व सहयाद्री पट्ट्यात गवारेडे मोठ्या प्रमाणात आढळतात. विरळ जंगल असलेल्या या भागात गवारेड्यांनी आपला मोर्चा वळविल्याने शेतकऱ्यांसमोर हे संकट उभे राहिले आहे. गवारेडे आता अनेक भागात शेतीचे नुकसान करीत असल्याचे समोर येत आहे. वनविभागाने या गवारेड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.तसेच नुकसानीचे पंचनामे करून शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.