सी.पी.राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, हरिभाऊ बागडे राजस्थानच्या राज्यपालपदी
Facebook/x.com
राज्यात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळाले आहेत.
रमेश बैस यांच्या जागी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची निवड करण्यात आली आहे. राधाकृष्णन यांच्याकडं झारखंडच्या राज्यपालपदाची जबाबदारी होती. पण आता नवीन नियुक्त्यांनंतर ते महाराष्ट्राचे राज्यपाल असतील.
त्याचबरोबर राज्यातील ज्येष्ठ भाजप नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र आणि राजस्थानबरोबरच इतरही राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शनिवारी नवीन राज्यपालांच्या नियुक्ती केल्याचं जाहीर केलं.
राष्ट्रपती भवनाच्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती जाहीर करण्यात आलेली आहे.
अनेक राज्यांना नवे राज्यपाल
राष्ट्रपतींनी शनिवारी जाहीर केलेल्या नवीन नियुक्त्यांनुसार सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. तर हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल असणार आहेत.
त्याशिवाय जिष्णू देव वर्मा यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून, ओम प्रकाश माथूर सिक्कीमचे आणि संतोष कुमार गंगवार हे झारखंड या राज्याचे नवे राज्यपाल असतील.
छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून रामेन डेका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय सी.एच.विजयशंकर मेघालयचे, गुलाबचंद कटारिया पंजाबचे, लक्ष्मण प्रसाद आचार्य आसामचे राज्यपाल असतील आणि त्यांच्यावर मणिपूरची अतिरिक्त जबाबदारीही असेल.
कोण आहेत सी.पी.राधाकृष्णन
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखलं जातं. जनसंघाच्या काळापासून ते संघटनेशी संलग्न असल्याचं म्हटलं जातं.
दक्षिण भारतात भाजप पक्ष संघटनेच्या वाढीसाठी सी. पी. राधाकृष्णन यांनी मोठं काम केलेलं पाहायला मिळालं आहे. तामिळनाडूच्या कोईम्बतूरमधून दोन वेळा ते लोकसभेवर निवडून आले आहेत.
1998 आणि 1999 अशा दोन वेळा त्यांनी याठिकाणी विजय मिळवला. पण त्यानंतर 2004, 2014 आणि 2019 अशा सलग तीन वेळा त्यांना कोईम्बतूरमधून पराभवाचा सामनाही करावा लागला.
राधाकृष्णन यांनी विद्यार्थी चळवळीपासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती. भाजपच्या तामिळनाडूच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारीही राधाकृष्णन यांनी पार पाडली आहे.
2007 मध्ये तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष असताना राधाकृष्णन यांनी 93 दिवस 19,000 किलोमीटरची रथ यात्रा काढली होती. त्यात त्यांनी नद्या जोडणे, दहशतवाद, समान नागरी कायदा, अस्पृश्यता आणि ड्रग्ज अशा मुद्द्यांकडं प्रामुख्यानं लक्ष वेधलं होतं.
तसंच त्यानंतरही त्यांनी धरण आणि नदीच्या मुद्द्यावर 280 किलोमीटर आणि 230 किलोमीटर अशा दोन ‘पथ यात्रा’काढल्या होत्या.
त्यानंतर 2023 मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली.
हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल
महाराष्ट्रातील ज्येष्ठ भाजप नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थनाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये हरिभाऊ बागडे यांचा समावेश होतो. 1985 पासून 2004 पर्यंत हरिभाऊ बागडे यांनी सलग फुलंब्री या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात हरिभाऊ बागडे यांनी मंत्रिपदही भूषवलं.
त्यानंतर पुन्हा 2014 मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी 2014 ते 2019 दरम्यान त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली.
आता त्यांच्यावर राजस्थान सारख्या मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या कायम चर्चेत राहणाऱ्या राज्याच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Published By- Priya Dixit