खानापुरातील भ्रष्टाचाराने गाठला कळस

सरकारी अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा वचक नसल्याने सामान्य जनतेची पिळवणूक : आमदारांनी लक्ष घालण्याची मागणी खानापूर : तालुक्यातील सर्वच सरकारी कार्यालयात भ्रष्टाचाराने कळस गाठला असून, सामान्य जनता याच्यात भरडली जात आहे. सरकारी अधिकाऱ्यांवर कोणत्याही लोकप्रतिनिधीचा वचक नसल्याने सामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. तालुक्यात सर्वच कार्यालयांत आर्थिक व्यवहाराशिवाय कामे होईनाशी झाल्याने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. मात्र याकडे […]

खानापुरातील भ्रष्टाचाराने गाठला कळस

सरकारी अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा वचक नसल्याने सामान्य जनतेची पिळवणूक : आमदारांनी लक्ष घालण्याची मागणी
खानापूर : तालुक्यातील सर्वच सरकारी कार्यालयात भ्रष्टाचाराने कळस गाठला असून, सामान्य जनता याच्यात भरडली जात आहे. सरकारी अधिकाऱ्यांवर कोणत्याही लोकप्रतिनिधीचा वचक नसल्याने सामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. तालुक्यात सर्वच कार्यालयांत आर्थिक व्यवहाराशिवाय कामे होईनाशी झाल्याने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींनी संपूर्णपणे डोळेझाक केल्याने  सामान्य जनतेतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अलीकडेच तालुक्यातील कंत्राटदाराने 35 टक्के कमिशनच्या विरोधात तालुका पंचायतीवर मोर्चा नेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. अवघ्या चारच दिवसांनी जिल्हा पंचायतीचे कार्यकारी अभियंता बन्नूर याना लाच घेताना लोकायुक्तांनी रंगेहाथ पकडले आहे. यावरुनच तालुक्यातील भ्रष्टाचाराची कल्पना येते. सामान्य जनता आणि कंत्राटदार आर्थिक पिळवणुकीमुळे कंटाळलेली आहे. ग्राम पंचायत, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, तहसीलदार कार्यालयासह सर्वच कार्यालयात भ्रष्टाचाराने कळस गाठला असल्याने सामान्य जनतेला आपली कामे करून घेण्यासाठी एजंट किंवा कार्यालयातील कर्मचाऱ्याला हाताशी धरुन आर्थिक देवाण-घेवाण केल्यानंतरच कामे मार्गी लागत असल्याने सामान्य जनतेला वालीच नसल्याचे दिसून येत आहे.
तालुक्याच्या सर्वांगीण विकासालाही खीळ
याबाबत यापूर्वीही अनेकवेळा तक्रारी व आंदोलने झाली. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी आपली कार्यपद्धत बदलेली नाही. याबाबत आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही गांभीर्याने घेतले नसून याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोणत्याही सूचना देण्यात आल्या नसल्याने सामान्य जनतेतून तर्कवितर्क लढविले जात आहेत. तालुक्यातील सर्वच सरकारी कार्यालयातील अधिकारी निर्ढावलेले आहेत. सामान्य जनतेशी त्यांचे वागणे मुजोरपणाचे आहे. तसेच कोणत्याही कामासाठी थेट पैशाचीच मागणी करण्यात येत असल्याने सामान्य जनतेला कोणी वाली उरला नसल्याचे चित्र तालुक्यातून दिसून येत आहे. विकास कामातील टक्केवारीमुळे संपूर्ण विकासकामेही निकृष्ट दर्जाची झाल्याने खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासालाही खीळ बसलेली आहे. त्यामुळे तालुक्याचे भवितव्य अंधकारमय बनले आहे. या भ्रष्टाचार आणि शासकीय अनागोंदी कारभाराबाबत सामाजिक कार्यकर्त्यातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सूचना देण्याची मागणी
ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर याबाबत बोलताना म्हणाले, तालुक्यातील सर्वच कार्यालयात पैशाशिवाय कामे होत नाहीत हे खेदजनक आहे. तालुक्यातील दुर्गम भागातील जनतेची शासकीय कार्यालयातून होणारी आर्थिक पिळवणुकीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. आम्ही संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी या भ्रष्टाचाऱ्याला चाप लावण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र अधिकारी निर्ढावलेले असल्याने त्यांचे वागणे बदललेले नाही. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी याबाबत गांभीर्याने घेऊन अधिकाऱ्यांना सक्त सूचना करणे गरजेचे आहे.
विनायक मुतगेकर
सामान्य जनतेला न्याय मिळवून द्या
सामाजिक कार्यकर्ते गोविंद किरमिटे यांनीही याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, सामान्य जनतेला तालुक्यात वालीच नसल्याचे दिसून येत आहे. सरकारी कार्यालयात आज पैसे दिल्याशिवाय कामेच होत नसल्याने सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. तालुक्यातील अधिकारी गब्बर बनले आहेत. महसूल अधिकाऱ्यांनी तर अज्ञानाचा फायदा घेत जमीनच आपल्या नावावर करून घेतल्याच्या घटनाही गेल्या वर्षभरात घडलेल्या आहेत. असे असताना भाजप हा भ्रष्टाचाराच्या विरोधातला पक्ष म्हणून आम्ही पाहतो. मात्र आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या कार्यकिर्दीत भ्रष्टाचाराने कळस गाठल्याने हलगेकरांची असफलता स्पष्ट होत आहे. यासाठी त्यांनी जाहीर बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देऊन सामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा.
गोविंद किरमिटे