विरोधी आघाडीत ‘हिंदी’वरून वादंग

हिंदी भाषा आलीच पाहिजे : नितीशकुमारांनी ठणकावले वृत्तसंस्था / नवी दिल्ली राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी झालेल्या विरोधी आघाडीच्या बैठकीचे विविध वृत्तांत उघड होत असून, या आघाडीत सारे अलबेल नाही, असा संकेत मिळत आहे. 28 पक्षांच्या या बैठकीत ‘हिंदी’ भाषेवरुन प्रचंड वादंग झाल्याचे समोर आले असून याला उत्तर-दक्षिण वादाची पार्श्वभूमीही लाभताना दिसून येत आहे. बैठकीत विविध पक्षांच्या […]

विरोधी आघाडीत ‘हिंदी’वरून वादंग

हिंदी भाषा आलीच पाहिजे : नितीशकुमारांनी ठणकावले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी झालेल्या विरोधी आघाडीच्या बैठकीचे विविध वृत्तांत उघड होत असून, या आघाडीत सारे अलबेल नाही, असा संकेत मिळत आहे. 28 पक्षांच्या या बैठकीत ‘हिंदी’ भाषेवरुन प्रचंड वादंग झाल्याचे समोर आले असून याला उत्तर-दक्षिण वादाची पार्श्वभूमीही लाभताना दिसून येत आहे.
बैठकीत विविध पक्षांच्या प्रमुखांनी भाषणे केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी हिंदीतून विचार व्यक्त केले. त्यांचे भाषण सुरु असताना द्रविड मुन्नेत्र कळघम या दाक्षिणात्य पक्षाचे नेते टी. आर. बालू यांनी हिंदी भाषण समजत नसल्याचे निदर्शनास आणत भाषणाचे इंग्रजी भाषांतर देण्याची मागणी केली. नितीशकुमार यांचे सहकारी मनोज झा यांनी नितीशकुमार यांना याची माहिती दिली. तथापि, त्यावर कुमार चांगलेच भडकले. ‘आपल्या देशाला आपण हिंदुस्थान म्हणतो. हिंदी ही या देशाची राष्ट्रभाषा आहे. तिचे ज्ञान प्रत्येकाला असलेच पाहिजे, असे त्यांनी स्पष्टपणे ठणकावले. तसेच आपल्या भाषणाचे इंग्रजी भाषांतर देण्यास नकार दिला. आपला देश स्वतंत्र झाला असून ब्रिटीश राजवटीत विकसीत झालेली गुलामीची मानसिकता आपण सोडली पाहिजे, अशीही टिप्पणी त्यांनी केली. यामुळे काहीकाळ वातावरण तापले होते, असे या बैठकीत उपस्थित असलेल्या काहींनी नंतर पत्रकारांसमोर स्पष्ट केले. यावर आता बरीच चर्चा होत आहे.
अनेक मुद्द्यांवर असहमती
विरोधी आघाडीच्या या महत्वाच्या चौथ्या बैठकीत जागावाटप, आघाडीच्या संयोजकाचे नाव आणि आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा आदीसंबंधी महत्वाचे निर्णय होतील अशी चर्चा होती. तथापि, कोणत्याच मुद्द्यावर एकमत न झाल्याचे आता समजून येत आहे. तसेच आघाडीत आतापासूनच गटातटाचे राजकारण सुरु झाल्याचेही बोलले जाते. उत्तर विरुद्ध दक्षिण वादही वेगवेगळ्या रुपांमध्ये समोर येत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. लोकसभा निवडणूक आता काही महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपली असताना निर्माण झालेले हे चित्र विरोधी पक्षांसाठी योग्य नाही, असे मत या आघाडीतील काही नेतेच व्यक्त करीत आहेत.
आघाडीच्या नावावरुनही दुमत
आघाडीचे नाव ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्ल्यूझिव्ह अलायन्स’ अर्थात आय.एन.डी.आय.ए. (उच्चारी इंडिया) असे ठेवण्याचा निर्णय पहिल्या बैठकीतच झाला होता. नंतरही हेच नाव कायम राहिले होते. पण चौथ्या बैठकीत अचानक नितीशकुमार यांनी आघाडीचे नाव ‘भारत’ शब्दावरुन हवे, असा आग्रह धरल्याचे समजते. त्यामुळे काहीकाळ इतर सर्व पक्षाचे प्रतिनिधी अवाक् झाले होते, अशीही माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अद्याप आघाडीच्या नावावरच मतभेद असतील तर इतर जटील मुद्दे कसे सोडविणार, हा प्रश्नच असल्याचीही चर्चा आहे.
नेत्याचा घोळ
ममता बॅनर्जी यांनी आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सुचविले आणि अरविंद केजरीवाल यांनी या सूचनेला पाठिंबा दिला, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. तथापि, यामुळेही नितीशकुमार नाराज झाल्याची चर्चा आहे. आपल्या नावाची घोषणा होईल, अशी त्यांना अपेक्षा होती. ही आघाडी आकाराला आणण्यासाठी त्यांनी प्रथमपासून पुढाकार घेतला होता. पण, ऐनवेळी त्यांना मागे सारण्यात आल्याचे दिसल्याने मतभेद उघड झाले आहेत.
मतभेदच अधिक?
ड विरोधी पक्ष ‘इंडिया’च्या बैठकीत अनेक विषय राहिले अनुत्तरित
ड प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार कोणताही महत्वाचा मुद्दा अनिर्णितच
ड आघाडीच्या नावावरुनही अद्याप मतभेद न मिटल्याची बाब उघड

Go to Source