बाबासाहेबांची क्रांती संपवून टाकण्याचे कारस्थान खपवून घेतले जाणार नाही – आनंदराज आंबेडकर
रायगड / प्रतिनिधी
राज्य शासनाकडून शालेय अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि मनुस्मृति मधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रयत्न समोर आल्यानंतर महाडमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे दहन केले. त्यानंतर आता बौद्धजन पंचायत समितीचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी देखील मनुस्मृतीचे दहन करून शासनाच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांती संपवून प्रतिक्रांती करण्याचा शासनाचा डाव खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड इशारा आनंदराज आंबेडकर यांनी महाड क्रांती भूमीत आज दिला.
महाडच्या क्रांतीभूमी मध्ये ऐतिहासिक क्रांती स्तंभा जवळ काही दिवसांपूर्वी आ. आव्हाड यांनी शासनाच्या शिक्षण विभागाचा निषेध करण्यासाठी मनुस्मृतीचे दहन केले होते. त्या नंतर आता आनंदराज आंबेडकर यांनी देखील महाडमध्ये दाखल होत मनुस्मृति ची होळी केली. यावेळी बोलताना त्यांनी महाडच्या ऐतिहासिक भूमीत बाबासाहेबांनी मनुस्मृति जाळून बहुजनांना आणि माता भगिनींना समाजातील जातीयवादी आणि संकुचित विचारसरणीतून मुक्त केले असल्याचे सांगितले. परंतु या देशात पुन्हा एकदा मनुवाद्यांनी डोके वर काढले असून, बाबासाहेबांच्या क्रांतीला उलथवून टाकण्याचे कारस्थान करण्यात येऊन देशात प्रतिक्रांती करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी केला. त्यांनी शासनाच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला.
आनंदराज आंबेडकर म्हणाले शालेय पाठ्यपुस्तकात मनाचे श्लोक आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला असून, त्याला विरोध म्हणून महाडच्या क्रांतिस्तंभ मैदानावर मनुस्मृतिची पुन्हा एकदा होळी केली. यावेळी आपल्या भाषणात आनंदराज आंबेडकर यांनी, या महाडच्या ऐतिहासिक भुमित बाबासाहेबांनी मनुस्मृति जाळून बहुजनांना आणि माता भगिनींना जातीयवादी संकुचित विचारसरणीतून मुक्त केले असल्याचे म्हणाले, पण या देशात पुन्हा एकदा मनुवाद्यांनी डोके वर काढले असून, बाबासाहेबांच्या क्रांतीला संपविण्याचे कारस्थान करुन देशात प्रतिक्रांती करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी केला. यावेळी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटचे सहकारी कै. सुरबानाना टिपणीस यांचे नातू मिलिंद टिपणीस यांचेही भाषण झाले. त्यांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी कशाप्रकारे मनुस्मृति जाळली, त्यावेळी त्यांचेसोबत कोणकोण होते, याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
क्रांतिस्तंभावर झालेल्या सभेमध्ये रिपब्लीकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, विश्वनाथ सोनावणे, विनोद मोरे, मारुती जोशी, मिलिंद खांबे यांचीही यावेळी भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्तविक बौध्दजन पंचायत समितीचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी, तर सूत्रसंचलन भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष सुनिल जाधव यांनी केले. या मनुस्मृति दहन आंदोलनात आनंदराज आंबेडकर यांच्या पत्नी सौ. मनिषा आंबेडकर यांच्यासह महाड, पोलादपूर, खेड, दापोली, मंडणगड, म्हसळा, श्रीवर्धन तळा, रोहा येथील आंबेडकरी संघटनांचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.