‘गोव्यातील दोन्ही जागा काँग्रेसच जिंकणार’
काँग्रेसचे गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांचा विश्वास : ‘इंडिया’पक्षांकडून निवडणूक एकत्रिपणे लढण्याचा निर्धार
पणजी : लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा ‘इंडिया’ आघाडी जिंकणार, असा विश्वास व्यक्त करून काँग्रेसचे गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी काल बुधवारी सांगितले की मतांचे विभाजन करण्यासाठी भाजप देशभरात त्यांच्या ‘बी टीम’ असणाऱ्या पक्षांचा वापर करत आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला. ‘इंडिया’ युतीला पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षांच्या काल पणजीत झालेल्या बैठकीनंतर ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा, आमदार अॅल्टन डिकॉस्ता, आपचे अध्यक्ष अमित पालेकर, आमदार वेन्झी व्हिएगस, आमदार क्रुझ सिल्वा, गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत, राष्ट्रवादीचे (पवार गट) अध्यक्ष जुझे फिलिप, राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश भोसले, शिवसेना (ठाकरे गट) अध्यक्ष डॉ. जितेश कामत उपस्थित होते.
भाजप लोकशाही संपवू पाहतोय
ठाकरे म्हणाले की, भाजप लोकशाही संपवू पाहत आहे. ती वाचवण्यासाठी इंडिया आघाडीचे भागीदार एकत्र आले आहेत. आम्हाला जनतेचा चांगला पाठिंबा मिळत आहे आणि आमच्यासाठी सकारात्मक परिस्थिती आहे. दक्षिण गोव्यात उमेदवार मिळत नसल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. आम्हाला विश्वास आहे की गोवा आणि देशात शांतता राखण्यासाठी लोक इंडिया आघाडीसोबत राहतील, असेही ते म्हणाले.
दोन्ही उमेदवार एकाच यादीत
गोवा हा निर्णायक घटक आहे. येथे इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आमच्या बंधुभावाचे रक्षण करण्यासाठी आणि विभाजनाचे राजकारण नष्ट करण्यासाठी गोव्यातील जनता भाजपचा पराभव करून काँग्रेसच्या दोन्ही जागा निवडून देतील. विरोधी पक्षांच्या समन्वय समित्या प्रचाराला पुढे नेण्यास मदत करतील. गोव्यातील दोन्ही उमेदवार एकाच यादीत जाहीर केले जातील, असेही ठाकरे यांनी सांगितले.
भाजपमध्ये अस्वस्थता : पाटकर
अमित पाटकर म्हणाले की, भाजपने देशातील लोकशाहीची हत्या केली आहे. त्यामुळे तिचे रक्षण करण्यासाठी एकत्र येण्याची गरज होती. आम्ही विरोधी पक्षांची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे निवडणूक एका आवाजात लढण्यास मदत होईल. आम्हाला मिळालेला पाठिंबा पाहून भाजप नेते दररोज आपली विधाने बदलत आहेत. भाजप अस्वस्थ झाला आहे आणि म्हणूनच दक्षिणेसाठी महिला उमेदवार शोधत आहे, असेही पाटकर म्हणाले.
आरजीपी भाजपची बी टीम : ठाकरे
रिव्होल्यूशनरी गोवन पार्टी (आरजीपी) ही भाजपची ‘बी’ टीम आहे. बहुतेक राज्यांमध्ये मतांचे विभाजन करून त्याचा फायदा मिळवण्यासाठी भाजपने अशा अनेक ‘बी टीम’ तयार केल्या आहेत. म्हणूनच हे लहान पक्ष (भाजपच्या बी टीम्स) लोकसभा निवडणूक लढवत असल्याचे दिसून येत आहे. जर ते ‘बी टीम’ नसतील आणि भाजपला हरवायचे असेल तर त्यांनी आमच्यासोबत यावे, असे ठाकरे म्हणाले.
Home महत्वाची बातमी ‘गोव्यातील दोन्ही जागा काँग्रेसच जिंकणार’
‘गोव्यातील दोन्ही जागा काँग्रेसच जिंकणार’
काँग्रेसचे गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांचा विश्वास : ‘इंडिया’पक्षांकडून निवडणूक एकत्रिपणे लढण्याचा निर्धार पणजी : लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा ‘इंडिया’ आघाडी जिंकणार, असा विश्वास व्यक्त करून काँग्रेसचे गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी काल बुधवारी सांगितले की मतांचे विभाजन करण्यासाठी भाजप देशभरात त्यांच्या ‘बी टीम’ असणाऱ्या पक्षांचा वापर करत आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला. ‘इंडिया’ […]