काँग्रेस नेते कमलनाथ भाजपच्या वाटेवर ?
पुत्रासह भोपाळहून दिल्लीत आगमन, ‘एक्स’ खात्यावरुन हटविला काँग्रेसचा उल्लेख
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ काँग्रेस पक्षाचा त्याग करणार असून भारतीय जनात पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शनिवारी ते आपल्या पुत्रासह मध्यप्रदेशची राजधानी भोपाळहून दिल्लीत आल्याचेही वृत्त आहे. येत्या 48 तासांमध्ये ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याची घोषणा करतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण गेल्या सोमवारी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात आले होते. त्यानंतर हा काँग्रेसला दुसरा धक्का असल्याचे मानले जात आहे. कमलनाथ यांनी अद्याप काँगेस सोडल्याची घोषणा पेलेली नाही. मात्र, त्यांच्या पुत्राने त्यांच्या ‘एक्स’ खात्यावरुन काँग्रेसचा ध्वज आणि नाव हटविले आहे. त्यावरुन ते काँग्रेसचा त्याग निश्चितपणे करणार, अशी चर्चा आहे.
स्पष्ट नकार नाही
दिल्ली विमानतळावर पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यांनी योग्य वेळ येताच सर्व बाबी आपल्यालाच प्रथम सांगू, असे उत्तर देत विषय टाळला. मात्र, भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता त्यांनी स्पष्टपणे फेटाळलेली नाही. दिल्लीत ते काही दिवस राहणार असून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय जनता पक्षाकडून ते त्यांचा बालेकिल्ला असलेल्या छिंदवाडा या मध्यप्रदेशातील लोकसभा मतदारसंघातच निवडणुकीत उतरतील, अशी शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
त्यांचे स्वागत करु
कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ भारतीय जनता पक्षात आल्यास त्यांचे स्वागतच केले जाईल, अशी प्रतिक्रिया पक्षाच्या मध्यप्रदेश शाखेच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे. कमलनाथ हे ज्येष्ठ नेते आहेत. मध्यप्रदेशात काँग्रेसविरोधी वातावरण असताना त्यांनी त्यांच्या प्रभावक्षेत्रात चांगली कामगिरी बजावली आहे. त्यांच्यासारखा नेता पक्षात आल्यास पक्षाचे बळ वाढणारच आहे. त्यामुळे त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करु, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
एकमेकांवर नाराजी
सध्या कमलनाथ आणि काँग्रेस एकमेकांवर मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. गेल्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजयी करण्याचे उत्तरदायित्व कमलनाथ यांच्यावर होते. पण ते अपयशी ठरले. भारतीय जनता पक्षाने 230 पैकी 163 जागा मिळवून प्रचंड विजय मिळविला. त्यामुळे काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज झाले असल्याचे बोलले जाते. तर दुसऱ्या बाजूला कमलनाथही काँग्रेसवर नाराज आहेत. त्यांना राज्यसभेचे तिकिट नाकारण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील पराभवाला आपल्याइतकेच पक्षश्रेष्ठीही उत्तरदायी आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
काँग्रेसमधून गळती सुरुच
गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेसला देशभरातच मोठी गळती लागलेली आहे. अनेक राज्यांमधून मोठे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अन्य पक्षांमध्ये जात आहेत. भारतीय जनता पक्षात जाणाऱ्यांची संख्या यात मोठी आहे. आता लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपलेली असताना काँग्रेसमधून अशा प्रकारचे बहिर्गमन होणे हे पक्षासाठी हिताचे नाही, असे अनेक राजकीय तज्ञांनी बोलून दाखविलेले आहे.
पक्षश्रेष्ठींचे दुर्लक्ष कारणीभूत ?
लोकसभा निवडणूक आता तोंडावर आलेली असताना काँग्रेसला एकत्र ठेवण्यासंदर्भात पक्षश्रेष्ठी गंभीर नाहीत, असा आरोप केला जात आहे. पक्षाच्या बांधणीकडे लक्ष देण्याऐवजी राहुल गांधी हे त्यांच्या यात्रेत गुंतले आहेत. त्यांचे हे धोरण कितपत योग्य आहे, असाही प्रश्न विचारला जात आहे. केवळ काँग्रेसमधूनच नेते बाहेर पडत आहेत असे नाही, तर विरोधी पक्षांनी मोठा गाजावाजा करुन बनविलेल्या आघाडीतूनही अनेक पक्ष निसटत आहेत, तर आणखी अनेक पक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत, अशीही चर्चा आहे. बाहेर जाणारा हा ओघ रोखण्याची जबाबदारी कोणाची, अशीही पृच्छा होत आहे.
रोखण्याची आवश्यकता
ड काँग्रेसमधून बाहेर पडणारा नेत्यांचा ओघ रोखण्याची आवश्यकता
ड पक्षश्रेष्ठींनी गंभीरपणे लक्ष देण्याची पक्षातीलच अनेकांची मागणी
ड विरोधी पक्षांच्या आघाडीतूनही आतापर्यंत अनेक पक्ष पडले बाहेर
ड लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना धोरण आवश्यक
Home महत्वाची बातमी काँग्रेस नेते कमलनाथ भाजपच्या वाटेवर ?
काँग्रेस नेते कमलनाथ भाजपच्या वाटेवर ?
पुत्रासह भोपाळहून दिल्लीत आगमन, ‘एक्स’ खात्यावरुन हटविला काँग्रेसचा उल्लेख ► वृत्तसंस्था / नवी दिल्ली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ काँग्रेस पक्षाचा त्याग करणार असून भारतीय जनात पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शनिवारी ते आपल्या पुत्रासह मध्यप्रदेशची राजधानी भोपाळहून दिल्लीत आल्याचेही वृत्त आहे. येत्या 48 तासांमध्ये ते भारतीय जनता […]