290 जागा स्वबळावर लढविण्याची काँग्रेसची तयारी

100 जागांकरता आघाडीची साथ घेणार : लोकसभा निवडणुकीसाठी योजना वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारींवरून काँग्रेस पक्षात बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. यादरम्यान काँग्रेसच्या आघाडी समितीची अंतर्गत बैठक झाली असून यात पक्षाने 290 जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या जागांवरील उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना या समितीने पक्षनेतृत्वाला केली आहे. काँग्रेसचे […]

290 जागा स्वबळावर लढविण्याची काँग्रेसची तयारी

100 जागांकरता आघाडीची साथ घेणार : लोकसभा निवडणुकीसाठी योजना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारींवरून काँग्रेस पक्षात बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. यादरम्यान काँग्रेसच्या आघाडी समितीची अंतर्गत बैठक झाली असून यात पक्षाने 290 जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या जागांवरील उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना या समितीने पक्षनेतृत्वाला केली आहे. काँग्रेसचे पारंपरिक बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघांमधील उमेदवार निवडीची प्रक्रिया गतिमान झाल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
काँग्रेस पक्ष जवळपास 290 जागा स्वबळावर लढवू इच्छित आहे. तर सुमारे 100 जागा घटक पक्षांची साथ घेत लढवू पाहत आहे. आघाडीच्या अंतर्गत 100 जागा मिळतील अशी अपेक्षा काँग्रेसला आहे. म्हणजेच काँग्रेस पक्ष एकूण 390 जागांवर निवडणूक लढविण्याची रणनीति आखत आहे. 290 पारंपरिक मतदारसंघांसोबत उर्वरित जागांवरील उमेदवार निवडप्रक्रियेला वेग देण्यात येत आहे. तर ईशान्येतील जवळपास सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. काँग्रेस 10 राज्यांमध्ये स्वबळावर तर 9 राज्यांमध्ये आघाडी अंतर्गत निवडणूक लढविण्याची रणनीति तयार करत आहे.
गुजरात, हरियाणा, आसाम, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड आणि ओडिशामध्ये स्वबळावर निवडणूक लढविण्याची काँग्रेसची योजना आहे. उर्वरित राज्यांमधील जागांकरता संभाव्य घटक पक्षांसोबत आघाडी करण्याची रणनीति आहे. दिल्लीतील 5, बिहारमध्ये 9-10, पंजाबमध्ये 8-9, तामिळनाडूत 9-11, उत्तरप्रदेशात 10-15, पश्चिम बंगालमध्ये 3-5, जम्मू-काश्मीरमध्ये 3, झारखंडमध्ये 9, महाराष्ट्रात 24-26 जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी काँग्रेस करत आहे.